दुष्यंत पाटील

दुष्यंत पाटील

अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली ‘जीनियस’ ही १२ पुस्तकांची मालिका येत्या दिवाळीत वाचकांसाठी येत असल्याची जाहिरात वाचली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि जीनियसविषयी विस्तारानं माहिती घेतली. ‘जीनियस’ची संकल्पनाच मला एकदम भन्नाट वाटली. ज्या लोकांच्या असामान्य प्रतिभेमुळे आणि वेडामुळे इतिहासात जागतिक स्तरावर बरीचशी उलथापालथ झाली, ज्यांनी आपल्या कार्यानं जग बदलवण्यास हातभार लावला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय ‘जीनियस’ या मालिकेतून वाचकांना होणार आहे. ‘जीनियस’ या प्रकल्पाचा आवाका बराच व्यापक असून आपल्याला यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, संगीत, गणित, साहित्य, कला आणि सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रातले ७२ जीनियस टप्प्याटप्प्यानं भेटायला येणार आहेत.

जीनियसच्या पहिल्या टप्प्यातल्या १२ पुस्तिका विज्ञानावर असून यात १२ वैज्ञानिक आपल्याशी गप्पा मारणार आहेत. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखक-द्वयींची लिखाणाची शैली नेहमीप्रमाणेच रोचक आणि रंजक आहे. अवघड वाटणारे विषय सोपे करून वेधक पद्धतीनं मांडण्याचा लेखक-द्वयींचा हातखंडा ‘कॅनव्हास’ या चित्र-शिल्प ग्रंथानंतर या मालिकेतूनही दिसून येतो. ‘जीनियस’च्या पहिल्या १२ पुस्तिकांमध्ये आपल्याला कॉस्मॉलॉजी,  सुक्ष्मजीवशास्त्र आणि अणुकेंद्रकाशी संबंधित भौतिकशास्त्र (न्युक्लिअर फिजिक्स) यातली वैज्ञानिक मंडळी भेटणार आहेत. यात गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग, मेरी क्युरी, लीझ माइट्नर, जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन हे दिग्गज आहेत. यांचं आयुष्य तर प्रेरणादायी आणि भारावून टाकणारं तर आहेच, पण त्यांचं कामही डोळे दीपवून टाकणारं आहे. विश्वातल्या अनेक गोष्टींची उकल करण्याचा ध्यास या मंडळींना लागला होता.

गॅलिलिओवरची पुस्तिका वाचताना त्या वेळचं वातावरण, त्या काळच्या लोकांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, चर्चचा असलेला प्रचंड प्रभाव या सगळ्यांमुळे गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञाला लोकांना सत्य पटवून देण्यासाठी करावा लागणारा आय्ाुष्यभराचा संघर्ष आणि त्यानं प्रयोगानं पटवून दिलेलं विज्ञान आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. तसंच न्यूटनच्या पुस्तिकेत त्याच्या गुरुत्वाकर्षणापासून ते त्यानं केलेल्या सर्वच कार्याची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर तो तुमच्याआमच्यासारखा हाडामांसाचा माणूस कसा होता, हे अतिशय सुंदर रीतीनं लेखक-द्वयींनी उलगडून दाखवलं आहे. न्यूटनच्या बालपणीच्या घडामोडींनी त्याच्यावर झालेला परिणाम, त्याच्यातला विचित्रपणा आणि विक्षिप्तपणा, त्याच्यामधला मत्सर आणि भांडखोरपणा हा आपल्याला खूप जवळ आणतो. कारण अशी माणसं आपण रोज बघत असतो. आपल्यामध्येही अशा प्रकारचा एक न्यूटन दडलेला असतो. पण त्याचबरोबर त्याची चिकाटी, त्याची जिज्ञासा, त्याची परिश्रम करण्याची प्रचंड ताकद, त्याची तहान-भूक विसरून काम करण्याची जिद्द आणि त्याची अफाट ताकद बघून त्याची वेगळं असण्याचीही साक्ष पटते. न्यूटनच्या स्वभावातले अनेक पैलू वेगवेगळ्या प्रसंगांमधून समोर येत राहतात. आईन्स्टाईनच्याही अचाट बुद्धिमत्तेचं दर्शन जीनियसमधून होतं. त्याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत लेखकांनी अतिशय सोप्या, सुबोध भाषेत समजावून सांगितला आहे. त्यामुळे तो चटकन समजतो आणि विज्ञान इतकं सोपं असतं होय हा विचार मनाला आनंदही देऊन जातो. अचानक करावा लागलेला दुर्धर अपंगत्वाशी सामना आणि त्यानं मानसिक आणि शारीरिक प्रश्नांनी करावा लागलेला झगडा स्टीफन हॉकिंगच्या पुस्तिकेमध्ये बघायला मिळतो. केवळ दुर्दम्य आशावाद जागवून आणि आपल्या अफाट कल्पनाशक्तीनं आणि बुद्धिमत्तेनं जगाला अचंबित करणारा हॉकिंग आपल्याला इथे भेटतो आणि नशिबाला दोष देत बसणार्‍यांचे डोळे खाडकन उघडवतो. त्याचं कृष्णविवराबद्दलचं संशोधन आपल्याला नकळत अवकाशात दूरवर घेऊन जातं आणि जणू काही आपण ती गोष्टच ऐकतो आहोत असा भास होत राहतो. या चारही भौतिकशास्त्रज्ञांची ओळख होत असतानाच भौतिकशास्त्र आणि  खगोलशास्त्र या विषयांबद्दल आत्मीयता आणि रुची वाढते.

यानंतर आपल्याला भेटतात आणखी चार सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ! एडवर्ड जेन्नरच्या पुस्तिकेमध्ये येणारा देवी हा महाभयंकर रोग त्याचा इतिहास आणि या रोगानं जगभर घातलेला राक्षसी धुमाकूळ यामुळे ही पुस्तिका खूपच लक्षवेधी बनली आहे. जेन्नरबद्दल वाचताना त्या काळात सूक्ष्मजंतूंमुळे होणार्‍या आजाराच्या गंभीर समस्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि त्याचे परिणाम बघितले की मन सुन्न होऊन जातं. रॉबर्ट कॉखसारख्या माणसानं कॉलरा, टीबी आणि गुप्तरोगावर संशोधन करून या रोगांचं समूळ उच्चाटन करण्याचा घेतलेला ध्यास आणि त्याची धडपड पाहून अचंबित व्हायला होतं. कुठेही स्वतःचा विचार नाही, स्वार्थाची भावना औषधालाही नाही असा रॉबर्ट कॉख बघताना ही माणसं किती थोर होती याची खात्री पटते. पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेनं अमर झालेला आणि कुत्र्याच्या चावण्यामुळे येणार्‍या मृत्यूला रोखण्याचं काम रेबीजसारखी लस शोधून काढणारा लुई पाश्चर आपल्याला याच मालिकेत भेटतो. आजकाल सर्रासपणे वापरली जाणारी अ‍ॅटिबायोटिक्स नेमकी कशी शोधली गेली याचाही रंजक इतिहास आपल्यासमोर अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंगच्या गोष्टींतून कळतो. सूक्ष्मजीवशास्त्रतली तत्त्वं, जिवाणूंच्या निरीक्षणाच्या पद्धती तर इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेत मांडण्यात आल्या आहेत की आपल्याला आपल्याही नकळत सूक्ष्मजीवशास्त्र खूप जवळचं वाटायला लागतं.

यातला तिसरा टप्पा अणुकेंद्रीय भौतिकशास्त्रज्ञांचा असून यात केवळ स्त्री असल्यानं जन्मभर उपेक्षा सहन करावी लागणार्‍या लीझ माइट्नरचा संघर्ष आपल्याला चटका लावून जातो. तब्बल पंधरा वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन होऊनही त्या सन्मानापासून दूर ठेवली गेलेल्या लीझची भटकंती आणि फरफट आपल्याला बघवत नाही. त्याचप्रमाणे किरणोत्सर्गावर झपाटल्यासारखं संशोधन करणारी मेरी क्युरी आणि तिचे पती प्येर क्युरी आपल्याला इथेच भेटतात. त्यांचे कष्ट, त्यांची साधी राहणी, त्यांचं सहजीवन आणि निस्वार्थीपण आपण विसरू शकत नाही. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातल्या संशोधनाबद्दल दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी ती पहिली स्त्री होती. यानंतर भेटतो अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा आणि अफाट बुद्धिमत्ता असलेला दुसर्‍या महाय्ाुद्धात अणुबॉम्ब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर. त्यानंतर भेटतो तो भौतिकशास्त्रबरोबरच गणित आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये प्रावीण्य असणारा रिचर्ड फाईनमन हा सर्वगुणसंपन्न, अभिरुचीसंपन्न, तत्त्वज्ञ, हळव्या मनाचा प्रियकर, खोडकर मुलगा आणि एक गुणी शास्त्रज्ञ.

या बाराही व्यक्तिमत्त्वांची ओळख झाल्यावर यातलं श्रेष्ठ कोण किंवा कोण आवडतं असा प्रश्न आपणच आपल्याला विचारला तर उत्तर देता येत नाही. या पुस्तिकांचं वैशिष्ट्यं असं की या पुस्तकातला इतिहास आपल्याला आधी त्या काळात घेऊन जातो. त्या काळात आपण जगायला लागतो, तेव्हा ही मंडळी आपल्या समोर येतात आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवर त्यांचा संघर्ष समजायला मदत होते. साधनांचा तुटवडा, दैनंदिन जीवनातले प्रश्न, आर्थिक विवंचना, समाजाकडून अवहेलना या सगळ्या गोष्टींशी सामना करत करत स्वतःला आपल्या संशोधनकार्यात पूर्णपणे झोकून द्यायचं असं या १२ लोकांचं आय्ाुष्य बघितलं की आपला विश्वास बसत नाही. ही माणसं आणि त्यांनी लावलेले शोध त्याचबरोबर त्यातलं विज्ञान आपल्याला खूप जवळचं वाटायला लागतं हे या जीनियसचं वैशिष्ट्य. या मालिकेमुळे वाचकांची जिज्ञासा नक्कीच वाढीस लागेल असा विश्वास मला वाटतो. शालेय विद्यार्थ्यांना तर या पुस्तिका विशेष उपयोगाच्या ठरणार आहेत. जागतिक स्तरावरचा इतिहास, प्रचंड मोठा आवाका, सुबोध, रंजक आणि रोचक भाषाशैली यामुळे ही मालिका विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि गृहिणी यांच्या मनात महत्त्वाचं स्थान पटकावेल यात शंकाच नाही. 

मानवी जीवनाच्या इतिहासात तार्‍यांप्रमाणे चमकणार्‍या या प्रतिभावंतांची ओळख करून देणारा हा प्रचंड मोठा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल अच्य्ाुत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचं मनापासून अभिनंदन एक वाचक या नात्यानं करावंसं वाटतं. त्याचबरोबर एकापाठोपाठ एक अशी दर्जेदार पुस्तकं वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभारही मानावेसे वाटतात. तसंच लोकांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यास मदत करणार्‍या मनोविकास प्रकाशनाचेही आभार. थोडक्यात, ‘जीनियस’ या मालिकेतून इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्या अचाट कार्याची ओळख व्हावी ही वाचकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.

दुष्यंत पाटील,

आय टी तज्ञ