सुनंदा जोशी

सुनंदा जोशी

"जीनियस" सोबत "दीपावली" - "मी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी...अणूचे विघटन कसे होते हे मला अच्युत गोडबोलेंनी समजावून सांगितले व ते समजल्यावर मला खूप आनंद झाला...येईल त्याला मी ते पुन्हा समजावून सांगत होते...काम करणाऱ्या बाईला पण चहा देऊन थांबऊन, तिला कळो न कळो, हे किती छान आहे म्हणून सांगत होते...इतका मला आनंद झाला होता..."
दीपा भरभरून बोलत होती...निमित्त होते "जग बदलणारे 72 जीनियस" ह्या मालिकेतील 12 'जीनियस' चा जीवनपट उलगडणाऱ्या पहिल्या संचाचे प्रकाशन...
श्री. अच्युत गोडबोले व दीपा देशमुख लिखित ह्या 12 पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन मा. दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांच्या हस्ते व डाॅ. अनिल अवचटांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते...प्रकाशक श्री. अरविंद पाटकर, लेखक द्वयी व सन्माननीय दोन्ही प्रमुख पाहुणे ह्या सर्वांचेच ऐकताना ज्ञानात भर पडत होती...जोडीला आसावरी कुलकर्णीचे खुमासदार सूत्र संचालन! 
हे सर्वचजण खूप छान, अनौपचारिकपणे बोलत होते - पण त्या informal संवादातून, सहजपणे ते अत्यंत मोलाची माहिती देत होते. त्यामुळे कुठलाही भपकेबाजपणा नसतानासुद्धा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला, सोहळ्याचा लखलखीतपणा होता. त्या लखलखीतपणात आम्ही श्रोते पण उजळून निघत होतो. 
दिवाळीचा पहिलाच दिवस (07/11/2015) होता, त्यामुळे 'जीनियस' च्या प्रकाशनाच्या निमित्ताने खरोखरंच ज्ञानदीप प्रज्वलीत होत होते. अंतरंग उजळून निघाले की बाहेरची रोषणाई नसली तरीही आपला दीपोत्सव साजरा होत असतो.
दिवाळी वर्षातून एकदाच साजरी होते. पण अच्युत गोडबोले व दीपा देशमुख ह्यांच्या लेखनामुळे त्यांच्या आधीच्या व पुढे येणाऱ्या अनेक पुस्तकांमुळे आपण हा 'ज्ञानदीपोत्सव' रोजच celebrate करत आहोत व पुढेही नेहमीच celebrate करणार आहोत...आणि किती छान नं की आपला रोजचा दिवस हा उत्सवी असणं...प्रदूषण करणारे, कानठळ्या बसवणारे मोठ्ठया आवाजाचे फटाके फोडून - शांतपणे जळणाऱ्या इवल्याश्या मातीच्या पणत्यांऐवजी, विजेचा अपव्यय करत, डोळ्यांना त्रास होईल अशा उघडझाप करणाऱ्या लाईटच्या माळा सोडून त्याला कृत्रीम, यांत्रीक स्वरूप आणणाऱ्या दिवाळी पेक्षा हा 'ज्ञानदीपोत्सव' किती छान व लख्ख आणी उत्सवात सहभागी होणाऱ्याला उजळून टाकणारा, प्रकाशाकडे नेणारा असा आहे...आणी शेवटी काय नं, प्रत्येकाला उत्सवी, आनंदी आयुष्य हवे असते...
So, Deepa, let's have a celebration without any pollution enriching our realm of perception!!!          

(Sunanda Joshi)