डावकिनाचा रिच्या

डावकिनाचा रिच्या

पुस्तकं.. कोणी त्यांना मित्र म्हणतं, कोणी गुरू… आपलं भावविश्व, आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी ही पुस्तकं.. ज्याला वाचनाची आवड आहे, त्याला जीवनात कधीच  एकटेपणा वाटत नाही… मात्र हीच पुस्तकं असतात एखाद्या  अवजाराप्रमाणे, समाजाला आकार देण्यासाठी ज्यांचा मानवाकडून वेळोवेळी वापर होत गेला आहे. ज्ञान संक्रमित करतानाच समाजाला दिशा देण्याचं काम पुस्तकं करत आली आहेत. ज्या पुस्तकांनी मानवी इतिहासात अमुलाग्र बदल घडवला, अशा ५० पुस्तकांचा आढावा प्रसिद्ध लेखिका "दीपा देशमुख" यांनी आपल्या "जग बदलणारे ग्रंथ" या नव्या पुस्तकात घेतला आहे. 
जग बदलणारे ग्रंथ… चार दिवसापूर्वी पुस्तक हाती पडलं आणि अधाशाप्रमाणे त्याचा फडशा पाडला. आपल्याला जे आवडते ते इतरांना सांगितल्याशिवाय चैन पडत नाही, या मस्त पुस्तकाबाबत लिहिणे मस्टच आहे. मनोविकास प्रकाशनाने दिवाळीनिमित्त अतिशय सुंदर फराळ आपल्याला उपलब्ध करून दिला आहे.. त्याचे मुखपृष्ठ ❤️❤️❤️  ओहोहो.. काय सांगू.. एवढे सुंदर आहे, एवढे सुंदर आहे की तुम्ही हे पुस्तक दुकानात केवळ चाळून ठेऊ शकत नाही..  त्यावरून हात फिरवता तेव्हाच त्याने तुमच्या मनात एक वेगळी जागा तयार केलेली असते.. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर मुख्यपृष्ठ बनवलं आहे, ज्याला एम्बोसिंग करून थ्रीडी इफेक्ट दिला आहे.. अगदी भारी, महागडी इंग्रजी पुस्तकं असतात, त्याचा फील या मराठी पुस्तकाचं मुखपृष्ठ देतं.
मानवी संस्कृती समृध्द करणाऱ्या धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, उक्रांतीशास्त्र, गणित या विषयातील ५० ग्रंथांचा समावेश लेखिकेने केला आहे. या ग्रंथांची निवड खूपच काटेकोरपणे केल्याचं अनुक्रमणिकेमध्येच लक्षात येतं. आणि ग्रंथांची मांडणी त्यांनी विषयानुसार करता काळानुसार केली आहे, ही बाब खूप महत्त्वाची आहे. कदाचित इथं एखाद्या लेखकाला विषयानुसार मांडणी करण्याचा मोह झाला असता. मात्र कोणताही विषय सुटा कधीच नसतो, त्याची मांडणी जेव्हा केली जाते तेव्हा तत्कालीन इतर विषयांमधील ज्ञानाचा त्यावर पगडा असतो, वर्चस्व असतं. 
युक्लीड जेव्हा द एलेमेंट्स मधून त्याची भूमिका मांडतो, तेव्हा तो विषय केवळ गणितापुरता मर्यादित न राहता त्यात तो अप्रत्यक्ष तर्कशास्त्र देखील मांडत असतो. कौटिल्याचे अर्थशास्त्र असो, निकोलो मॅकियावेलीचे "द प्रिन्स" किंवा सन त्सू चे "द आर्ट ऑफ वॉर", तत्कालीन समाजाची मानसिकता त्यामधून दिसून येत असते. म्हणूनच "जग बदलणारे ग्रंथ" वाचताना आपल्या डोळ्यासमोर काळाचा मोठा पडदा सरकत असतो आणि त्यामध्ये घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांत्या तत्कालीन पुस्तकात कश्या प्रतिबिंबित झाल्या आहेत हे लक्षात येतं. धर्माची आणि धर्मग्रंथांची निर्मिती कोणत्या वातावरणात झाली हे समजून येतं. 
निवडलेल्या प्रत्येक ग्रंथ आणि ग्रंथकार यांना योग्य न्याय लेखिकेने दिला आहे. वात्सायनाचे कामसूत्र हे तत्कालीन भारतीय संस्कृती किती समृध्द आणि जिवंत होती याची आठवण करून देते. एखाद्या ग्रंथाची निर्मिती होण्यामागे तत्कालीन समाजाची रचना जशी कारणीभूत असते, त्याच प्रमाणे ग्रंथकारांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण देखील महत्त्वाचा घटक असतो. अर्थशास्त्रातील विविध प्रवाह अभ्यासताना हे प्रकर्षाने लक्षात येतं. मात्र अगदी  परस्परविरोधी विचारांच्या पुस्तकांची ओळख करून देत असताना त्या पुस्तकांचा तत्कालीन समाजावर कसा परिणाम झाला आहे याची लेखिकेने कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मांडणी केली आहे. 
या ५० पुस्तकातील ज्ञानाच्या अथांग सागरातून आपल्यासाठी मोती वेचून आणण्याचे काम दीपा देशमुख यांनी मोठ्या कौशल्याने केलं आहे. "जग बदलणारे ग्रंथ" हे पुस्तक वाचत असताना त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीची जाणीव होते. "जग बदलणारे ग्रंथ" हे पुस्तक वाचनावर प्रेम असणाऱ्या रसिकांच्या घरी तर असलेच पाहिजे. पुस्तकांची माहिती घेत असतानाच अनेक महत्त्वाची पुस्तकं आपण वाचली नाही, काही पुस्तकांची तर आपल्याला आजवर नावे देखील माहित नव्हती याची जाणीव होते. अनेक नव्या बाबी माहित होतात. हेन्री डेव्हिड थोरो आणि महात्मा गांधी यांचे वैचारिक नातं समजून येतं. मानसशास्त्रातील, मानववंशशास्त्रातील झालेली प्रगती लक्षात येते. 
संदर्भ म्हणून वापरण्यासाठी देखील हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. जगातील वेगवेगळ्या विषयातील ५० तत्ववेत्ते  आणि त्यांची मौलिक ग्रंथसंपदा आपल्यासाठी केवळ एका पुस्तकामध्ये उपलब्ध झाली आहे. उच्च निर्मिती मूल्य आणि अतिशय महत्त्वाचा आशय असलेल्या या मौलिक ग्रंथाची किंमत अतिशय कमी केवळ रु. ३९९/- रुपये ठेवली आहे. मनोविकास प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेच. शिवाय आपल्या नेहमीच्या www.vaachan.com वर देखील हे पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल. सध्या दिवाळीनिमित्त या पुस्तकावर विशेष सवलत आहे, तरी या सवलतीचा लाभ घ्या. 
दिवाळीच्या सर्वांना सदिच्छा.. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, त्याला फटाक्यांचा उत्सव करू नका, कमीत कमी फटाके वाजवा. मोठ्या आवाजाचे फटाके कटाक्षाने टाळा. पुस्तकांची भेट एकमेकाला देऊन ज्ञानाचा प्रकाश वाढवा🙏
#richyabhau 
जग बदलणारे ग्रंथ 
लेखिका : दीपा देशमुख
मनोविकास प्रकाशन.