संजय भास्कर जोशी - पुस्तक पेठ

संजय भास्कर जोशी - पुस्तक पेठ

एक धोकादायक पुस्तक !
********
एक धोकादायक पुस्तक बाजारात आले आहे, त्याची जाणीव करून देणे आमचे कर्तव्य आहे. हे धोकादायक पुस्तक म्हणजे आमची मैत्रीण दीपा देशमुख यांचे मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले 'जग बदलणारे ग्रंथ' हे होय. 
ते धोकादायक का आहे ? सांगतो.
* पहिले म्हणजे ते इतके समृद्ध आणि देखणे असूनही केवळ ३९९ रुपयात असल्याने ते घेण्याचा मोह आवरणे जवळजवळ अशक्य आहे. 
* दुसरे म्हणजे जगावर प्रभाव टाकणाऱ्या ५० महाग्रंथांचा इतक्या सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे या पुस्तकात, की हे पुस्तक वाचल्यावर आपल्यापैकी बहुतेकांना आपण ती पुस्तके वाचलीच आहेत असे वाटण्याची दाट शक्यता आहे. 
* तिसरे म्हणजे याची अनुक्रमणिका पाहून दडपलेली छाती एकेक प्रकरणे वाचताच अभिमानाने भरून येऊ लागते, कारण आपण काहीतरी अद्भुत सुरेख वाचत आहोत याची जाणीव होऊ लागते. (अर्थात ५० महा ग्रंथांवर केवळ ४५० पानाच्या आत लिहिणे इतके कठीण आहे, की वेळोवेळी हे लेखन त्रोटक असल्याने तो मूळ ग्रंथ वाचायची इच्छा होणारच हा एक उपफायदा आहेच!) 
* चौथे म्हणजे हे पुस्तक वाचून फेसबुकवर ज्ञानी लोकांच्या ज्ञानसंपन्न पोस्टची लाट येणे संभवते, कारण हे पुस्तक वाचून माणसाच्या विविध ज्ञानक्षेत्रातील इतिहासाचा पटच उलगडतो. निदान जगात काय काय ज्ञान साठले आहे याची पुसट जाण येतेच येते. 
* आणि पाचवे म्हणजे दीपाच्या प्रेमात असलेल्या असंख्य मित्र मैत्रिणी, स्नेही जनांचा आपल्यावर असलेला अप्रत्यक्ष दबाव इतका असेल, की 'हे काय अजून तु हे पुस्तक वाचले नाहीस?' हा प्रश्न आपण टाळूच शकणार नाही ! 
तेव्हा सज्जनहो... लवकरात लवकर हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा.
टीप : पण एक धोका मात्र बहुतेक संभवत नाही हे पुस्तक वाचून. बहुतेक इथला कुणी, "हे काय, माझे पुस्तक नाहीये या यादीत !" असे म्हणणार नाही अशी आशा आहे 😉