योगेश

योगेश

दीपा देशमुख मॅडम याचं नाव तसं परिचित होतं. फेसबुक वर त्यांचं लिखाण वाचलं होतं . पण पहिल्यांदा त्यांचं पुस्तक सापडलं ते आय. पी. एच. मध्ये गेलो असताना... सुपरहिरो डॉ आनंद नाडकर्णी हे त्यांचं खरंच नावाप्रमाणेच सुपर मांडणी करणारं पुस्तक मी आय पी एच मधून घेतलं आणि फक्त दोन बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून झालं. पुस्तकातले काही प्रसंग मला खूप रिलेटेबल होते. ते वाचून दोन तीनदा हलकेच डोळे ओलावले. मी खूप हुशार वगैरे नाही त्यामुळे एका साध्या वाचकाला वाचता यावी अशी पुस्तकं मी निवडतो . खूप जडबंबाळ वाचणं मला जमत नाही हि माझी मर्यादा.. पण एखादं पुस्तक वाचलं आणि आवडलं, की मग ते वाचून पूर्ण संपवतो.

काल असंच दीपा मॅडमचं एक मस्त पुस्तक मी ऐकून संपवलं . हो ऐकूनच..गम्मत आहे ना.. स्टोरीटेल ऍपची ऍड पाहून होतो . ते काल डाउनलोड केलं. यांची ऍड येत होती मध्यंतरी, तेव्हा काही ऍप घेतलं नाही. पर्वा काही पुस्तकं ऑनलाईन चाळत होतो. तेव्हा जिनियस हि सिरीज त्यावर असल्याचं पाहिलं. म्हणून मग ऍपची ट्रायल घेतली. फेसबुक वरून वाचलेलं दीपा मॅडम यांचं लेखन आवडत होतंच . सुपरहिरो डॉ आनंद नाडकर्णी हे पुस्तक सुद्धा मला सॉलिड आवडलं होतं. त्यामुळे पुन्हा काहीतरी त्यांचं लेखन वाचायची ईच्छा होती.

मला आरोग्यविज्ञान प्रकारची आवड आहे.त्यात लशींवरचा जनक ज्याला लसविज्ञानाचा बाबा म्हणतात त्या लुई पाश्चरवर दीपा देशमुख अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं पुस्तक पाहिलं. मग साहिजकच कुतूहल निर्माण झालं. लेखक आपल्याला आधीच आवडलेले. पुस्तकाचा विषय पण आवडीचा. मग घेतलं लुई पाश्चरवरचं पुस्तक ऐकायल.. . आणि दोन तासात पुस्तक ऐकून संपवलं.. पुस्तक लुई बद्दल आणि तेव्हाच्या काळाबद्दल वास्तवदर्शी वर्णन करतं . जेव्हा माणसाला सूक्ष्मजीव प्रकार माहीतच नव्हता तेव्हा ऑपरेशन केल्यांनतर लाखो माणसं मरत असत.प्रसूतीकाळात लाखो स्त्रिया इन्फेक्शनने मृत्युमुखी पडत. वेगवेगळ्या आजारांनी जनावरे मरत असत. तेव्हा डॉक्टर नसलेल्या लुई पाश्चर ने लाखो माणसांचे जीव वाचवणारे शोध लावले. सूक्ष्मदर्शीच्या खाली दिवसभर रोज असे वर्षानुवर्षे निरीक्षणे करत बसून त्याने सूक्ष्म जीव कसे असतात याचा शोध लावला. रेबीजचा शोध लावताना लुईने केलेली धाडसं तर जीवावर बेतता बेतता राहिली. प्राण्यांच्या मॉडेलवर वैज्ञानिक पद्धतीने केलेले त्याचे संशोधन करोडो लोकांचे जीव वाचवणारे ठरले याचं कुतूहल वाटले. त्याने दारूतले दारू खराब करणारे जीवाणू वेगळे काढले. रेशीम उत्पादकांना रेशीम खराब करणारी कीड शोधून दिली आणि लाखो करोडो पैसे वाचवले. विज्ञानाचा उद्योजकांना एवढा उपयोग झाल्याचे उदाहरण विरळाच.

लुई पाश्चर बद्दल इतक्या सखोल माहिती नव्हती. हि माहिती रंजक स्वरूपात मराठीत आणण्याचं निर्विवाद श्रेय या लेखकद्वयीला द्यायला हवे. ज्यांना विज्ञानाची आवड असेल आणि आरोग्य विज्ञानातला हा क्रांतिकारक संशोधक ज्यांना समजून घ्यायचा असेल त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा .

आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी वेडे होणारे तरुण जर विज्ञानाकडे आणि संशोधनाकडे वळले तर मग ते तरुण आणि पर्यायाने देश व मानवजामात समृद्ध होण्याची गती बरीच वाढेल हे नक्की.