हरी नरके

हरी नरके

अच्युत गोडबोले आणि दीपाताई देशमुख हे माझे अतिशय आवडते लेखक आहेत. हे दोघेही मराठीतले तगडे लिहिते लेखक आहेत.
आज पुस्तकपेठेत त्यांना ऎकणं हा एक अतिशय भन्नाट अनुभव होता. अनेकविध विषयांचा सखोल व्यासंग, प्रवाही आणि गतिमान शैली, जगण्याबद्दल अस्सल कळवळा आणि विषयांची कळकळ यांच्यामुळे त्यांचं लेखन दर्जेदार बनतं. ग्रंथ विषयांची निवड, पुर्वतयारी, लेखनप्रक्रिया आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद याबद्दल दोघंही तळमळीनं बोलले. आतुन बोलले.गप्पा इतक्या रंगल्या की दोनअडीच तास कधी संपले ते कळलंच नाही. 

काही जिनियस माणसं कोरडी असतात.   माणूसघाणी असतात.  मात्र हे दोघेही रसरसीत आणि मनु्ष्यवेडे आहेत. कला, ज्ञानाविषयीचं आणि माणसांबद्दलचं अपार कुतुहल आणि प्रेम यातून लिहिते झालेले. इंग्रजी-मराठीतलं अफाट वाचून ते आतमध्ये मुरवून सामान्य मराठी वाचकांचा आवाका वाढावा, त्याचं जगणं सुंदर, श्रीमंत, संवेदनशील व्हावं यासाठी धडपडणारे हे लेखक. ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविना प्रीति असं तुकोबा ज्यांच्याबद्दल म्हणाले असणार त्यातले हे दोघेही.
धन्यवाद पुस्तकपेठ, माधवराव वैशंपायन आणि सं.भा.जोशी.