आसावरी कुलकर्णी

आसावरी कुलकर्णी

एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून उपस्थित राहण्यासाठी तुमची मैत्रीण निमंत्रण पाठवते. तुम्ही ऑफिसची कामं उरकून धावतपळत डायरेक्ट कार्यक्रमस्थळी जाता. तिथे गेल्यावर प्रेक्षक म्हणून समोरच्या खुर्चीत बसण्याऐवजी तुम्हाला एकदम थेट स्टेजवर जाऊन प्रमुख पाहुण्यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली, तर नक्की काय वाटेल? हा कल्पनाविलास अन या "wow effect" वाल्या भावना अनुभवण्याची संधी आज मला मिळाली बरंका !!!!! 'कशी' म्हणून विचारताय ????? अर्थातच लोकप्रिय लेखिका, माझी प्रिय सखी #दीपा देशमुख मुळेच!
रोटरी क्लब (प्रिस्टीन) तर्फे 'सेवासदन'च्या सभागृहात आज ती लेखक म्हणून तिचा प्रवास उलगडणार होती. ते ऐकायला मी गेले होते. 
तिथे पोचल्याबरोबर शुभांगी मॅडमनी दिलखुलास हसत माझं स्वागत केलं.
ज्ञानेश्वर मुळेंवर लिहिलेलं 'सर्जनशील जगनमित्र' या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी खूपवेळा बोलणं झालं होतं. मात्र समक्ष आजच भेटत होतो.
त्यांचे यजमान श्री. नितीन आणि उत्साहाचा खळखळता झरा असलेल्याआईची पण भेट झाली आज. दीपाच्या कंपूचा अविभाज्य भाग असलेल्या शास्त्रीची आईपण भेटली.
आमच्या गप्पा सुरु असतानाच दीपा मॅडमचे आगमन झाले आणि त्यांनी आल्याबरोबर बॉम्बच टाकला....
तिने एकटीने लेखनप्रवासाचे टप्पे सांगण्याऐवजी मुलाखत स्वरूपात तो कार्यक्रम व्हावा आणि स्टेजवर मी तिची मुलाखत घ्यावी, असे फर्मान तिने काढले...
मग काय, मैत्रिणीची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही सभागृहात गेलो.
राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवीन किंवा पहिल्यांदाच तिथे आलेल्या पाहुण्यांचं कॅडबरी देऊन स्वागत केलं गेलं. रोटरी क्लब ऑफ पुणे - प्रिस्टीन मार्फत राबवल्या गेलेल्या उपक्रमांची आणि होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती नितीनजी देत होते. उल्लेखनीय काम केलेल्या रोटरी सदस्यांनाही कॅडबरी देण्यात आली.
त्यानंतर दीपाची औपचारिक ओळख करून दिल्यावर आम्ही दोघी स्टेजवरच्या खुर्च्यांवर विराजमान झालो.
औरंगाबाद ते मासवण, मग via मुंबई ते पुणे हा तिचा प्रवास..... यादरम्यान सुपर हिरो, कॅनव्हास, देश आणि परदेशातले जिनियस, तंत्रज्ञ जिनियस पासून सिम्फनी पर्यंत विविध विषयांवरची हजारोंच्या संख्येत विकली जाणारी पुस्तकं..... तसंच विविध मासिकं, वृत्तपत्र, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले लेख, कथा आणि नुकताच ऍमेझॉन किंडल वर प्रकाशित झालेला ebook स्वरूपातील कथासंग्रह 'गुजगोष्टी'..... नजीकच्या भविष्यात  येऊ घातलेली पुस्तकं आणि बरंच काही!
या प्रवासातला काही भाग माझ्या डोळ्यासमोर झालेला.
तिच्या आयुष्यावर, लेखनावर प्रभाव  टाकणाऱ्या व्यक्ती, तिने सर्व अडथळ्यांवर मात करत साहित्यिक आणि सामाजिक क्षितिजावर गाठलेली उंची.... हे सगळं उपस्थितांसमोर तिच्या ओघवत्या शैलीत उलगडत होतं.
तिचं बोलणं असंच सुरू राहावं, असं वाटत असतानाच वेळेच्या मर्यादेचे भान ठेवून ही मुलाखत शेवटाकडे आली.
'गुणगुणावे मी तुला अन तू मला...' ही वैभव देशमुखची कविता दीपाच्या सुरेल आवाजात ऐकत असताना कार्यक्रम कधी संपला ते कळलंच नाही.
विविध पुरस्कार विजेती, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी, कुठल्याही अंधश्रद्धांना अजिबात थारा न देणारी अन त्याचवेळी इतरांच्या श्रद्धांना धक्का न लावणारी, वेगवेगळ्या विचाराधारांचा सन्मान करणारी, आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक भेदभावांपलिकडे जाऊन सर्वांशी असलेले मैत्र जपणारी ही माझी सुगरण, सहृदय मैत्रीण!
आज तिला स्टेजवर बोलतं करण्याची संधी दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे-प्रिस्टीन, शुभांगी मॅडम आणि नितीन सरांचे मनःपूर्वक आभार 👍💐
आज हा कार्यक्रम आहे, हे कळल्याबरोबर खास भोसरीहून आलेला, 'निर्माण' प्रकल्पात दीपाच्या सोबत असलेला शंकर .... त्याला शिवाजीनगरला सोडून घरी आलीये. त्यानी सांगितलेल्या दीपाच्या सहावासातल्या आठवणी मला अजून समृद्ध करून गेल्यात.
मैत्रीण म्हणून दीपाशी खूप जवळीक आहे. मात्र आयुष्यात तिच्याएव्हढी उंची गाठायला अजून खूप पायऱ्या चढाव्या लागणार आहेत, याची जाणीव झाली. तिचं हे 'मोठे'पण समोरच्याला न्यूनगंड देणारं नाही तर प्रोत्साहित अन आश्वस्त करणारं आहे, याचीही नव्यानं खूणगाठ पटली आज.