मिलिंद फडके

मिलिंद फडके

साद चित्रकलेची दृष्टी रुजवण्याची!
सरस्वतीच्या प्रांगणात साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य आणि नाट्यकला अशा साऱ्या कलांची अभिव्यक्ती अत्यंत मुक्त व उत्साही वातावरणात होत राहवी, या सर्व कलांचा विकास होत राहावा. संस्कृतीची जडणघडण करण्यामध्ये या साऱ्या कलांचं योगदान असावं. समाजामध्ये कलाकारांचा आदर असावा, त्यांना मानाचं स्थान असावं. समाजातल्या कलेच्या प्रसारामुळं, समाज अभिरुची संपन्न व्हावा. प्रत्येकाच्या जीवनाला कलेचा स्पर्श व्हावा, ज्यामुळं जीवन जगण्याची रुची वाढावी. एकंदरीत समाजाला शांतता व स्वस्थता लाभावी. प्रत्येक सुजाण, सुसंस्कृत, सुविद्य व रसिक मनाच्या माणसाला अशी अपेक्षा असावी, असं मनापासून वाटतं.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मराठी माणसानं आपल्या कर्तृत्वानं आणि पराक्रमानं केवळ महाराष्ट्रात वा भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही यशाचे झेंडे लावले आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रातल्या कलाकारांनी आपल्या प्रतिभेचे झंकार रसिकांच्या मनात उमटवले आहेत. चित्रकला, शिल्पकला, मुद्राचित्रण किंवा ग्राफिक आर्ट या दृक्‌कलांच्या बाबतीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. या दृष्यकलांमधील मराठी चित्रकारांचं नैपुण्यही सरस आहे. उत्तम आहे. पण या क्षेत्रातली वाटचाल संथ व रेंगाळलेली आहे. याची कारणं अनेक असू शकतील, परंतु या कलांकडं पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन अनास्थेचा आहे आणि फार आश्‍वासक नाही असं म्हणावसं वाटतं ! अगदी ब्रिटिश कालखंडापासून चित्रकलेच्या प्रवासावर नजर टाकली, तर रावसाहेब धुरंधर, आबालाल रेहमान, गोपाळ देऊसकर, हळदणकर पिता-पुत्र, ज. द. गोंधळेकर, व्ही. सी. गुर्जर, एम. आर. आचरेकर, माधव सातवळेकर, शंकर पळशीकर, बाबूराव सडवेलकर, एच. ए. गाडे, सदानंद बाकरे, मोहन सामंत, वासुदेव गायतोंडे, बी. प्रभा, लक्ष्मण पै, रवींद्र मिस्त्री, संभाजी कदम, प्रभाकर बरवे यांच्यासारखे प्रतिभावंत मराठी कलावंत निर्माण झाले ते याच महाराष्ट्रात. शिल्पकार करमरकर, फडके, गोरेगांवकर बंधू, बाळाजी तालीम, बी विठ्ठल या नामवंताचं शिल्पकलेतलं श्रेष्ठत्व याच मातीत आकाराला आलं. पण या साऱ्या दिग्गजांच्या योगदानाचा परिचय, मराठी जनमानसात रुजला नाही. या सर्व दृष्यकलांमध्ये रस घ्यावा, प्रतिसाद द्यावा, माहिती घ्यावी, समरसता घ्यावी, या माध्यमातून आपली अभिरुचि व जीवन समृद्ध करावं, अशी इच्छा मराठी मनात अभावानंच जागृत झाली. ही मात्र चिंतेची बाब आहे.
मराठी रसिकांचं दृष्यकलांच्या बाबतीत प्रबोधन व्हावं, यासाठी नामवंत चित्रकार, लेखक, प्रकाशक निश्‍चितपणे प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसाही करायला हवी. परंतु, या प्रयत्नांचा आवाका वाढायला भरपूर वाव आहे, हेही तितकंच खरं आहे. या दृष्टिकोनातून, अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. या पुस्तकात त्यांनी, चित्रकला व शिल्पकलेतल्या जागतिक पातळीवरच्या दिग्गज कलाकारांचा आणि त्यांच्या कलासाधनेचा सुबोध परिचय करून दिला आहे. यामध्ये नऊ विदेशी चित्रकार व शिल्पकारांचा समावेश आहे. ज्यांनी आजच्या दृष्यकलेतील इतिहासाचा, संकल्पनांचा, तंत्रांचा आणि कौशल्यांचा, तत्त्वज्ञानाचा आणि विचारसरणीचा पाया रचला आहे !
‘कॅनव्हास’चा आवाका खूप मोठा आहे. या विषयाचा विविध अंगांनी केलेला सखोल अभ्यास आपल्याला इथं जाणवतो. चित्रकला शिल्पकला व सर्व कलांबद्दल दोघाही लेखकांना वाटणारं प्रेम व आस्था आपल्याला सातत्यानं जाणवते. या पुस्तकाच्या लेखनात त्यांनी स्वत-ला झोकून देऊन या महान चित्रकार व शिल्पकारांच्या कलाविश्‍वाचा वेध घेतला आहे. त्यामुळंच हे कलाकार त्यांच्याशी मूक संवाद करीत आहेत. त्यांच्या कलाकृतींतल विलक्षणपण, त्यातील भव्यदिव्यता स्वत- उलगडून दाखवत आहेत, असा अनुभव लेखकांच्या संवेदनशील मनांनं घेतला. कलाकार, त्यांच्या अवतीभवतीची परिस्थिती, तिथली माणसं, तो देश, ती युद्ध तिथले शासनकर्ते या साऱ्यांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांशी व कलाकृतीशी कसा निकटचा संबंध होता याचा अभ्यासपूर्ण आढावा त्यांच्या चरित्रांतून लेखकांनी मांडला आहे, चित्रशिल्पांच्या या अनुभवात.
या महान कलावंतांच्या भावविश्‍वात परिक्रमा करताना, स्वत-ला कधी ते मायकेल अँजेलोच्या ‘डेव्हिड’ बनवतांनाच्या प्रसंगाचे साक्षीदार झाले, तर कधी लिओनार्दोच्या ‘मोनालिसा’च्या स्मितहास्यात स्वत-च्या जीवनाचे संदर्भ शोधू लागले. कधी व्हॅन गॉगच्या चित्रातले गहिरे रंग बघून भावविभोर झाले. कधी रेम्ब्राच्या चित्रांतील गूढरम्य नाट्यमय प्रकाशानं प्रभावित झाले. लोत्रेकच्या आयुष्यातील उपेक्षा, त्यांना कधी निराश करून गेली, तर कधी पॉल सेजानच्या चित्रकृतींतील आशावाद प्रेरणादायी वाटला. कधी पिकासोच्या नवनिर्मितीच्या मार्गावरील वाटसरू होण्याचा अनुभव या लेखतद्वयीनं घेतला. रोदॅंच्या भव्य व अनोखा शिल्पांच्या दुनियेत ते हरखून गेले. गोगॅंच्या मानवाकृती व भोवतालच्या निसर्गाच्या चित्रणानं भारावून गेले. हेन्‍री मूरच्या अमूर्त शिल्पांकडं आकर्षित झाले. मोनेच्या प्रसन्न चित्रकृतींनी मन उजळून गेले. या पुस्तकाच्या लेखन व अभ्यासाच्या मुशाफिरीमध्ये, सॅल्वादोर दालीच्या स्वप्नील दुनियेमध्ये ते रममाण झाले ! वाचकांनाही ते या विश्‍वाची सफर घडवतात...
चित्रकार व शिल्पकार यांची आयुष्य आणि त्यांच्या कलाकृती यावर लिहिताना, कलेमधील विविध प्रवाह, संकल्पना आणि ‘इझम्स’ या गोष्टीही समजत गेल्या. त्या लेखकांनी वाचकांना समजावून दिल्या आहेत. त्यासाठी पाश्‍चात्य कलेचा इतिहास त्यांनी पुस्तकाच्या उत्तरार्धात सादर केला आहे. हे योग्यच आहे. अशासाठी की, सामान्य रसिक वाचकांना, केवळ कला इतिहासापेक्षा, कलावंतांचं आयुष्य, त्यांचे विचार, त्यांच्या कलाकृती या अधिक रोचक वाटतील. अर्थातच पुढे दिलेल्या इतिहासातून, कलाकारांना समजून घेताना, त्यांच्या भोवतालची त्या वेळची परिस्थिती, तो काळ, त्या वेळची राज्यसत्ता, तेव्हाची युद्धं, तेव्हांची माणसं, त्या वेळची संस्कृती कळेल. या पुस्तकातल्या महानायकांबरोबरच इतर कलाकार व त्यांच्या कलाकृतीसंबंधीची संक्षिप्त माहिती उद्‌बोधकरीत्या देण्यात आली आहे. या बद्दल प्रख्यात चित्रकार आणि लेखक प्रभाकर कोलते यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.. ते म्हणतात, ‘‘अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखकद्वयीनं ‘कॅनव्हास’ या कलाविषयक ग्रंथात पाश्‍च्यात्य कलेचा धावता तरीही गुंतवून ठेवणारा रोचक इतिहास सांगितला आहे. लेखकांची अभिरुचीसंपन्न भाषा आणि सुगम भाषाशैली यामुळं सामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत सर्वांनाच हा इतिहास वाचतांना तो मन-चक्षुंनी पाहण्याचाही अनुभव ठरावा.’’ हा अनुभव ‘कॅनव्हास’ वाचताना आपण घेत राहतो.
शिल्पकार व चित्रकार व त्यांच्या कलाकृतींबाबत इतक्‍या तपशिलानं लिहिल्यानंतरही, लेखकांनी ‘आम्हाला सारंच कळलं आहे..’ असा कोणताही अभिनिवेश न ठेवता; या पुस्तकाचा समारोपामध्ये मांडलेले काही प्रश्‍न व मुद्दे विचारमूलक व अस्वस्थ करणारे आहेत. सध्याच्या दृष्यकलेच्या वाटचालीकडं पाहताना अशा प्रश्‍नांची सहज सोपी उत्तरं व प्रश्‍नांची उकल होण्याची अपेक्षा करता येणार नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही, कोणतं चित्र वा शिल्प चांगलं आहे, त्याचे काय निकष आहेत? सर्व नामवंत कलाकृती, सौंदर्यशास्त्राच्या नियमांच्याच अधिन असतील का? एखादी कलाकृती एकाला उत्तम वाटेल, तीच दुसऱ्याला अगदी सामान्य किंवा दर्जाहीन वाटेल, यात कोणाला खरं मानायचं? डोळ्यांना आनंद देणारी व हृदयाला जाऊन भिडणारी कलाकृती श्रेष्ठ असेल, की अज्ञाताचा शोध घेणारी किंवा अमूर्त आकारांतून कदाचित सहज न समजणारी कलाकृती हीच अधिक श्रेष्ठ असेल? एका काळातील एखादी ख्यातनाम कलाकृती पुढील काळात, सुमार अथवा अर्थहीन असू शकते का? कलाकृतीमध्ये सौंदर्य असावे की भाव? आणि ते सौंदर्य, आणि ते भाव कलाकृती निर्माण करणाऱ्याच्या मनातले असावे, की पहाणाऱ्या रसिकाच्या मनाला भावतील असे? सर्व कलाकृतींचा आनंद, अनुभव आपण घ्यावा, पण त्यांचा अर्थ आपल्याला समजेल असेच नाही. जसं एखाद्या अपरिचित भाषेतलं सुंदर काव्य, ती भाषा येत नसलेल्यांसाठी अर्थहीन वाटावं, असंच दृष्यकलेबाबतही म्हणावं का? हमखास उत्तर नसलेल्या, अशा प्रश्‍नांची न संपणारी यादी, दृष्यकलेबाबत प्रेम असणाऱ्या कलावंतांच्या आणि रसिकांच्या मनांत असू शकते, याची फक्त जाणीव यातून करून द्यायची आहे, हेही लेखकांना सांगायचं आहे.
असं असलं तरी, कला हा एकमेव असा प्रकार आहे, की ज्यामुळं माणूस पशूपेक्षा वेगळा ठरू शकतो. कला आयुष्यात खूप महत्त्वाची असून ती माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. स्वप्न पहायला आणि सत्यात आणायलाही कला शिकवते. कला ही प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग असायला हवी. असं असेल तरच तो समाज सुसंस्कृत, सुदृढ व कलासक्त म्हणता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रगतीनं भारावून गेलेल्या माणसाला, माहिती व तंत्रज्ञानाच्या ‘आभासी जगातून’, काही काळ दृष्यकलेच्या ‘अभिजात’ कलाकृती आणि त्यांच्या निर्मात्यांच्या जादुई दुनियेत हा ‘कॅनव्हास’ अपूर्वाईनं घेऊन जातो. या कॅनव्हासमध्ये आहेत, सारे इतिहास घडविणारे कलावंत. लिओनार्दो द व्हिंची, मायकेल एँजेलो, रेम्ब्राँ, पॉल सेजान, ऑग्युस्त रोदॅं, पॉल गोगॅं, व्हॅन गॉग, तुलुझ लोत्रेक आणि पाब्लो पिकासो. या साऱ्या शिल्पकार व चित्रकारांच्या आयुष्याची, त्यातील ठळक घटनांची माहिती हे पुस्तक देतं. त्यांच्या कलाजीवनाचं, त्यांच्या गाजलेल्या चित्रकृतींचं दर्शन घडवतो हा ‘कॅनव्हास’. या कलाकारांच्या विचारसरणी, त्यांचं कलाविषयक तत्त्वज्ञान, त्यांच्या कलाकृतींतून व्यक्त होणारं पुरोगामित्त्व, यांची चर्चा इथं होते. त्यांचे विचार व त्यांची कलाशैली यामध्ये काळाच्या पुढं जाण्याची क्षमता कशी होती याची महती आपल्याला कळते. पण काळानं त्यांची सततच परीक्षाही घेतली.
‘कॅनव्हास’मध्ये अवतरलेल्या बहुतांशी कलाकारांचं आयुष्य तसं उपेक्षित गेलं. त्यांच्या आयुष्यात समाजाकडून त्यांच्या कलेची कदर मनापासून केली असं झालं नाही. पण, तरीही या थोर कलावंतांनी अव्याहतपणानं कलासाधना सुरू ठेवली. ज्या उंचीवरून ते आपली कलासाधना करत होते, तिथं सामान्यांची समज पोचत नव्हती. साहाजिकच आयुष्यभर त्यांची उपेक्षाच झाली. आयुष्य कलेसाठी वेचणाऱ्या कलावंतांना नियतीनं तर कधी जनसामान्यांनी पायदळी तुडवलं. समाजाची अवहेलना सहन करत, येणाऱ्या अडचणींचा खुल्या दिलानं सामना करत हे महानायक चालतच राहिले. त्यांच्यातली ही जिद्द, ही शक्ती, अमर्याद चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्यामुळं प्रेरित झालेला त्यांचा नवनिर्मितीचा ध्यास आपल्याला आश्‍चर्यचकित करतो. या कलावंतांनी यश अपयशाची फारशी चिंता कधी केली नाही. कुणाला आर्थिक यश मिळालं, पण बहुतांश कलाकारांना आर्थिक हलाखीनं ग्रासलं. हा दैवदुर्विलास, एक नवीन विरोधाभास आपल्यासमोर उभा करतो. तो असा, की दारिद्य्रातील याच महानायकांच्या चित्रकृती आज अक्षरश- हजारो कोटींमध्ये विकल्या जात आहेत. या साऱ्या विस्मयकारक गोष्टींतूनही खूप काही शिकण्यासारखे असतं हे निश्‍चित.
अच्युत गोडबोले व दीपा देशमुख यांच्या ‘कॅनव्हास’ मधून, कलाकार व कलाकृती यांच्याकडं पहाण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार व्हावा. मराठी रसिकांमध्ये चित्रशिल्पांचा रसास्वाद घेण्याची इच्छाशक्ती वाढावी. दृश्‍यकलेच्या विविध अविष्कारांकडं रसिकतेनं पाहणारी चित्रास्वादी नवीन पिढी निर्माण व्हावी. कलात्मक व अभिरुचिसंपन्न समाज निर्माण व्हावा. जीवनाच्या व संस्कृतीच्या विविध अंगांनी तो बहरून यावा, ही अपेक्षा. ‘कॅनव्हास’मधून उत्सर्जित झालेल्या ऊर्जेतून ती फलद्रुप होईल, याची खात्री वाटते.
- मिलिंद फडके
रविवार, 23 ऑगस्ट 2015 » सप्तरंग »