जयदीप पाटील 

जयदीप पाटील 

धन्यवाद दीपा ताई देशमुख आणि बुक गंगा !!
आणि कल्याणेहोळ गाव आणि विज्ञानाचे काम पुस्तकात पोहोचले.....
कोणतंही काम करताना पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या पाठीराख्यांची गरज असते.समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार आणि तुम्ही जे करत आहात ते "नक्कीच चांगलं काम आहे"हा विश्वास देणारी माणसं पाठीमागे उभी असली की काम करायला अजुन हुरूप येतो. कितीही म्हटलं तरी माणूस हा शेवटी माणूसच, कौतुकाची प्रेरणा असतेच. आमच्या सारख्या तरुण मुलांचे वेळोवेळी कौतुक करणारी आईच आहात दीपाताई आपण. आमचं सामाजिक मातृत्व ज्यांनी घेतलं त्या दीपाताई देशमुख!! दीपाताईंनी पाथफाईंडर्स भाग१ आणि २. या दोन पुस्तकातून समाजामध्ये वेगळ्या वाटेवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रवासाची कथा लिहिलेल्या आहेत. आपल्या सभोवतालचं संकुचित जग यांनी बदलून जगावेगळ्या वाटेवर एक उत्तम काम उभारलेल आहे, असे पन्नास लोक या दोन पुस्तकातून भेटतात. या पुस्तकात माझ्यासारख्या अतिशय 'किरकोळ' माणसाला दीपाताईंनी आणि बुक गंगा ने स्थान दिलं याबद्दल मी शतशः ऋणी राहील.
या पुस्तकात हिमालयाच्या उंचीची माणस आहेत यात स्वर्गवासी जगन्नाथ वाणी काका, नाटकावर प्रेम करणारे धनंजय सरदेशपांडे सर, प्रज्ञाचक्षू साठी स्वतंत्र जग निर्माण करणारे स्वागत थोरात सर ,स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी सर, दीपस्तंभाचे यजुर्वेद महाजन सर , यांच्यासारखे अनेक पिढ्या घडविणारे लोक या ग्रंथात भेटतात. चित्रपट क्षेत्रातील ध्रुवतारा नंदू माधव या पुस्तकात आहेत ,कर्तव्यकठोर आयपीएस अधिकारी महेश भागवत देखील आहेत .माझा मित्र बुकलेट गाय अमृत देशमुख ,हत्ती मित्र आनंद शिंदे हे अशी किती नावं घेऊ अशा अनेक ध्येयांची प्रवासाची कहाणी या पुस्तकांमुळे समाजासमोर आलेली आहे. अशा ग्रंथात कल्याणेहोळसारख्या अतिशय लहान खेड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या युवकाला स्थान मिळालं हे मी भाग्य समजतो. माझ्या कल्याणे होळ गावाचे हे सर्व यश आहे. दीपाताई आपण आम्हा गावकऱ्यांना आपण हे भाग्य दिलं आणि समस्त गावकरी आपले आभार मानतो !!धन्यवाद !
जयदीप पाटील 
नोबेल फाउंडेशन, जळगाव