‘तुमचे-आमचे सुपरहीरो’ची मालिका - सकाळ सप्तरंग 

‘तुमचे-आमचे सुपरहीरो’ची मालिका - सकाळ सप्तरंग 

कुमारवयीन मुलांसाठी चरित्रात्मक पुस्तकांची मोठी रेंज आपल्याकडे उपलब्ध असली, तरी त्यात आजच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाची संख्या कमी आहे. जी चरित्रात्मक पुस्तकं उपलब्ध आहेत तीही मागच्या कालखंडातली आहेत. गेल्या पन्नास वर्षातल्या नामवंत व्यक्तिंची माहिती देणाऱ्या चरित्रात्मक पुस्तकांची मालिका मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट, अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकर्णी आणि अच्युत गोडबोले अशी या मालिकेतली पहिली पाच पुस्तकं नुकतीच प्रकाशित झाली आहेत. ही चरित्रं लिहिली आहेत दीपा देशमुख यांनी.
हे सगळे पाचही चरित्रनायक आपल्या वेगळ्या कामानं महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. त्यामुळे मुलांना ह्या व्यक्तीचं वेगळेपण समजावं; त्यांचं काम, कामाकडं पाहण्याचा दृष्टिकोन, यशशिखरावर पोहोचण्यासाठीचा त्यांचा प्रवास, त्यांचे कष्ट, जिद्द आणि त्यांचं यश हा सगळा खडतर प्रवास मुलांनी समजून घ्यावा या हेतूनं ह्या व्यक्तींची चरित्रं करण्याचं ठरवलं. राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि साहित्य, चित्रकला, संगीत, नाटक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या आघाडीच्या व्यक्तींची चरित्रनायक म्हणून निवड करून त्यांची चरित्र लिहून घेण्याचं काम सुरू केलं आहे. ही निवड करताना त्या व्यक्ती आज कार्यरत आहेत असं पाहून, मुलांना त्याचं काम पाहता यावं, चरित्र वाचून घेऊन त्यांना समजून घेता यावं, भेटता यावं असाही हेतू ठेवला आहे. 
मुलांची वाचनक्षमता, त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेत एकूणच त्यांनी वाचनाकडे वळावं, असा विचार करूनच तयार केली आहेत. या चरित्रमालिकेचं नाव आहे ‘तुमचे-आमचे सुपरहीरो’ या पाच पुस्तकांनंतर टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा, गिरिप्रेमी गिर्यारोहक सुरेंद्र शेळके, विख्यात गायिका आशा भोसले, संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी, नारायणमूर्ती, अमीर खान असे अनेक ‘सुपरहीरोज’ चरित्ररूपानं मुलांना भेटणार आहेत.