कल्याण

कल्याण

“मला लिहायला आवडतं. मी पुस्तकं लिहीन…” 
माझ्या एका शिक्षकांशी बोलताना मी म्हणालो. 
“काय साध्य होणार पुस्तकं लिहून? किती लोक पुस्तकं वाचतात?” 
ते म्हणाले. 
समाजाच्या हिताची धोरणं बनवणारी, त्यांची अंमलबजावणी करणारी, प्रत्यक्ष कामं करणारी यंत्रणा तयार होत नाही होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे नुसती ‘खर्डेघाशी’ करण्याऐवजी माझ्या सारख्या विध्यार्थ्यांनी काही ‘ठोस’ काम करावं असा त्यांचा आग्रह असावा. 
तेव्हा मी वर्तमानपत्रांत, मासीकांमध्ये लेख लिहायचो. सरांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव एवढा की मी लिहणं हळूहळू पण पूर्ण बंद केलं. म्हटलं थोडं ‘काम’ करू… मग बघू. 
पण सरांचे प्रश्न मात्र मनांत फेर धरत राहीले. खरचं पुस्तकं लिहून काही साध्य होतं का? किती लोक पुस्तकं वाचतात? पुस्तकं लिहून कुठे जग बदलेल का? 
पुढे विचार करत राहिलो, प्रवास केला, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरं अक्षरशः एका वाक्यात देता येतील एवढी स्पष्टता आणि आत्मविश्वास आला. 
ज्या ज्या व्यक्तींनी जग घडवलं त्यांच्या त्यांच्या जडणघडणीत कोणत्यातरी एका पुस्तकाचा सिंहाचा वाटा होता ! 
त्यामुळे सरांनी केलेल्या कर्मयोगाच्या संस्काराचा आदर राखून म्हणावसं वाटतं की “किती लोक पुस्तकं वाचतात? पुस्तकं लिहून काय साध्य होणार?” हे प्रश्नच मुळात चुकिचे आहेत कारण ते कमी रचनात्मक (कंस्ट्रकटीव) आहेत. खरं तर ते डिकंस्ट्रकटीव्ह आहेत. 
त्याऐवजी “ज्या पुस्तकांनी माणूस घडवला, जग बदललं अशी कोणती पुस्तकं आपण वाचली? ती पुस्तकं कशी जन्माला आली? त्या पुस्तकांनी, त्याच्या निर्मीती प्रक्रीयेनी काय शिकवलं? आपल्या हातून असं एखादं पुस्तक लिहावं जावं म्हणून काय साधना करावी लागेल?” हे प्रश्न विचारणं जास्त योग्य आहे.
आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे दीपाताईचं  (Deepa Deshmukh) नवं पुस्तक - ग्रंथ ! मनोविकास प्रकाशनानं प्रकाशीत केलेलं हे पुस्तक आता पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे. 
जरूर वाचा. पुस्तकं जग बदलू शकतात का याविषयीचं तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल…