पुन्हा एकदा कोकण...

पुन्हा एकदा कोकण...

पुन्हा एकदा कोकण...
अचानक आदल्या दिवशी ठरलं आणि दृष्यममधला विजय साळगावकर जसा फॅमिलीसह 2 ऑक्टोबरला सत्संगसाठी रवाना होतो, तसेच अपूर्व, सायली आणि मी असे आम्ही 2  ऑक्टोबरला सकाळी सात वाजता पुण्याहून  ताम्हिणी घाटातून हरिहरेश्वरकडे जायला निघालो. दृष्यमचा सत्संग बनावट होता, मात्र कोकणातला आमचा प्रवास खराखुरा असणार होता.
पुण्यात सकाळचे सात वाजले असतानाही सगळीकडे धुकंच धुकं होतं. त्या धुक्यातून वाट काढत ताम्हिणी घाटात पोहोचलो, तर स्वागताला जागोजागी सर्वत्र धबधबे उभेच होते. हरिहरेश्वर येईपर्यंत रस्ता जणू आमच्यासाठीच खुला ठेवला असावा इतका रिकामा होता. अवघ्या चार तासात आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो. इथेच सावित्री नदीचं भव्‍य दर्शन झालं.
अपूर्व आणि सायली यांनी यूट्यूबवरून अभ्यास करून कुठे उतरायचं, कसं जायचं ही सगळी प्लॅनिंग केलेली असल्यामुळे आम्ही कुटुंबे होम स्टे च्या गेटमधून आत पोहोचलो. तिथे व्‍हेन्यू ही त्यांची पांढऱ्या रंगाची गाडी आमच्या कुशाक स्कोडाला कंपनी देण्यासाठी उभी होती. दुर्गेश आणि त्याच्या पत्नीने आमचं स्वागत केलं. उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ असलेली ही जोडी मला खूपच आवडली. याचं कारण त्यांचं अगत्य आणि आतिथ्य बघून आम्ही आमच्याच एखाद्या स्नेह्याकडे खूप दिवसांनी गेल्यासारखं आम्हाला वाटलं. थंडगार कोकमचं सरबत पिवून आम्ही घराच्या मागे अवघ्या दीड मिनिटांवर असलेल्या माराळच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो.
कोकणातले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ असतात असं सगळ्यांनी म्हटलेलं असतानाही हा किनारा जरा जास्तच स्वच्छ होता असं वाटलं. आमच्याशिवाय अर्थातच इथेही कोणीही नव्‍हतं. इथून हलूच नये अशी आमची अवस्था झाली. मात्र पोटातले कावळे भूकेची सूचना देत असल्यामुळे आम्ही दुतर्फा असलेल्या हिरव्‍यागार झाडीतून वाट काढत पुनश्च कुटुंबेंकडे पोहोचलो. कुटुंबे यांचा वाडा अगदी वाडा चिरेबंदी या नाटकाच्या सेटप्रमाणे नटलेला होता. बसायला दोन बंगई होत्या. आमच्या राहण्याच्या खोल्या देखील मोकळ्याचाकळ्या आणि स्वच्छ होत्या. फ्रेश होऊन आम्ही वाड्यासमोरच्या डायनिंग एरियात पोहोचलो. गरमागरम जेवणाचा बेत होता. ताजे ताजे उकडीचे मोदकही स्वीटडिश म्हणून पुढ्यात होते. अगदी 
अनलिमिटेड आणि आग्रहाने वाढणाऱ्या तायांकडे बघून आम्ही मनसोक्‍त ताव मारला. त्यानंतर आम्ही कुटुंबेंची वाडी बघण्यासाठी घराच्या मागच्या बाजूने चालायला सुरुवात केली. इतकी सुरेख नारळाची बाग की आम्ही एखाद्या रंगिबेरंगी जंगलातून चालतो आहोत असं वाटायला लागलं. दोन्ही बाजूंनी लालसर रंगाची कमरेइतक्या उंचीची शोची झाडं, त्याच्या आसपास खूपशी नारळाची, आंब्याची, माडाची, काजूची, केळीची आणि सुपारीची झाडं, तसंच तिथे काही ठरावीक अंतरावर असलेल्या चार विहिरी, एक रहाटाची विहीर...त्यांना असलेलं भरपूर पाणी, सर्वत्र केलेली ठिबक सिंचनची व्‍यवस्था, किती कष्ट घेत असणार हे कुटुंब याची कल्पना आली. घराच्या समोरच गायीगुरांसाठी असलेलं स्वतंत्र घर...हो घरच होतं ते गोठा नव्‍हता तो. थंडी, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावं म्हणून ते एक घरच त्यांनी उभं केलं होतं. आम्ही थोडा आराम केला आणि साडेचार वाजता श्रीवर्धनकडे जाण्यासाठी सज्ज झालो.
गेटच्या बाहेर निघत असतानाच आम्हाला मुसळधार पावसाने तडाखा दिला. आम्ही गाडीत असलो तरी त्या पावसाचा जोर आतून जाणवत होता. इतका की एकाच मिनिटांत गाडीच्या व्‍हायपर्सनी कुरकूर करायला सुरुवात केली. आम्ही रस्त्यात असलेल्या एका छोट्याशा बॅटरीच्या दुकानात पोहोचलो. जाळीदार टोपी घातलेल्या तिथल्या एका तरुणाने व्‍हायपर काढून ते सरळ केले आणि गाडीला पुन्हा अडकवून दिले. त्याला नजरेनेच थँक्स म्हणत आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. 
आधीच हिरवीपोपटी असलेली झाडं पावसामुळे आणखीनच ताजीतवानी झाली होती. रस्ता काहीच मिनिटांत संपला आणि आम्ही श्रीवर्धच्या समुद्रकिनारी पोहोचलो. मुंबईच्या नेकलेस पॉइंटसारखा हा समुद्रकिनारा सजवला होता. पायऱ्या चढून थोडं वर जाताच एका भल्या मोठ्या खेकड्याच्या शिल्पाने आम्हाला दर्शन दिलं. भंगारामधून तयार केलेला हा खेकडा मला खूपच आवडला. तिथून डाव्‍या बाजूने वळताच मुलांसाठी खेळायची साधनं, व्‍यायामाची साधनं, सुरेखसे लँप, पावसापासून बचाव करण्यासाठी षटकोनी आकाराच्या लोखंडी झोपड्यासदृश छत्र्या, चालण्यासाठीचा मार्ग, मच्छिमार जोडपं जाळं टाकतानाचं सुरेखसं शिल्प. इथूनही पटकन जाऊ नये असंच वाटत होतं, मात्र मोह आवरून आम्ही पांढऱ्या वाळूच्या आरावि समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. हा प्रवास थोडाच असला, तरी रस्ता अगदीच अरूंद होता, जणूकाही पाऊलवाट. एकच गाडी कशीबशी जाऊ शकेल असा. आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी पोहोचत होतो, पण पावसामुळे सूर्याची ऐसी की तैसी झाली आणि आम्ही तो पाहू शकलो नाही. पण इथला आरावि समुद्रकिनारा देखील अप्रतिम असा होता. मन एव्‍हाना गुणगुणायला लागलं होतं:
सागर मे जितनी तरंगे है, मनवा मे उतनी उमंगे है
मोसम ये कितना सुहाना है, सब के लबोंपे तराना है
हम भी गाये, मिठे तराने मिलन के प्यारा समा रे
रात्री हरिहरश्वेशवरला कुटुंबेंकडे पोहोचल्यावर रात्रीचं जेवणही तितकाच आडवा हात मारून केलं. समुद्रकिनारी खूप पायपीट केल्यामुळे रात्री झोपही चांगली लागली. सकाळी उठून नाश्ता करून आम्ही वेसावि बागमंडल फेरीवर जाण्यासाठी तयार झालो. 15 मिनिटांत फेरीवर पोहोचून गाडी आत लावली आणि वरती जाऊन समुद्र आणि समोर दिसणारे हिरवेगार डोंगर न्याहाळत बसलो. अवघ्या पाच ते सात मिनिटांत आम्ही पलीकडल्या बाणकोट भागात पोहोचलो. गाडी बाहेर काढून आम्ही हिम्मतगडाकडे कूच केलं.
फार अंतर नसलं, तरी रस्ता खूपच अरूंद आणि कठीण, वळणावळणाचा होता. तो घाट मोठ्या मुश्कीलीने पार करत आम्ही डोंगरमाथ्यावरती पोहोचलो. तिथेच हिम्मतगढचा मार्ग दाखवणारा बाण दिसत होता. बाणाच्या दिशेने जाताच गडाचं प्रवेशद्वार दिसलं. भव्‍य असं देखणं पण बंद असलेलं प्रवेशद्वार बघून, अरेच्च्या आता आपल्याला आतून हा किल्ला बघायला मिळणार नाही तर असा विचार मनात चमकून गेला. जाऊदेत, कमीत कमी या प्रवेशद्वाराजवळ उभं राहून एक फोटो तरी काढू असं म्हणून मी दाराजवळ गेले, तर तिथे असलेलं छोटं दार चटकन उघडलं गेलं. आतला नजारा क्षणात दिसला. त्या छोट्या दारातून प्रवेश करताच सगळीकडे गवताने आपलं साम्राज्य वाढवलेलं दिसलं. मात्र गडाचे बुरूज, तटबंदी, वर जाण्यासाठीच्या पायऱ्या, तोफ, आतलं पिटुकलं मंदिर, असं सगळं काही होतं. जशा शहरात छोट्या फॅमिलीज फ्लॅटमध्ये राहतात, तसाच हा छोट्या कुटुंबाला राहण्यासाठी बांधलेला किल्ला असावा असं वाटायला लागलं. आता वरतून परिसराचं दृश्य बघावं म्हणून पायऱ्या चढणार तोच अपूर्व बाजूच्या दारातून तिरासारखा धावत बाहेर आला, त्याच्यामागे धप्कन असा आवाज आला. तो पळाला म्हणून मी आणि सायली दोघीही तितक्याच वेगाने जीव मुठीत धरून पळायला लागलो. थोडं दूर थांबून धापा टाकत अपूर्वला काय झालं असं नजरेनंच विचारलं. तेव्‍हा गवताबरोबरच माकडांचं राज्य असलेल्या त्या भागात आम्ही प्रवेश केल्यामुळे एका भल्यामोठ्या माकडाने अपूर्वला बघून घाबरून झाडावरून खाली उडी मारली होती. आणि अपूर्वने आता तो हल्ला करणारा या भीतीने त्याला घाबरून पळायला सुरुवात केली होती. तो पळतोय म्हटल्यावर आम्हीही जीव मुठीत धरून पळालो होतो. माकडाच्या भागात जायचं नाही असं ठरवून आम्ही गडाच्या पायऱ्यांनी वर गेलो. या गडाला चहू बाजूंनी वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. वर गेल्यावर खरोखरंच एका वेगळ्या जगात गेल्याचा अनुभव आला. अतिशय थंडगार झुळझुळणारा वारा, समोरच्या बाजूने दिसणारा समुद्र, वरती निळंशार आकाश, त्यापलीकडे दिसणारे हिरवेगार डोंगर आणि त्यांचं समुद्रात पडलेलं प्रतिबिंब....नजर वळवली, तर एक पांढरीशुभ्र हिरव्‍या रंगाच्या काठात उभी असलेली मशीदही दिसली. कितीतरी वेळ आम्ही चोहीकडून दिसणारी दृश्यं बघत राहिलो.
हिम्मतगडाच्या बाहेर आलो, पण त्याच रस्त्याने खाली परत जाऊ शकू याची खात्री नव्‍हती. त्यामुळे हिम्मतगडावरून जाणाऱ्या पठारावरच्या रस्त्याने आपण जाऊया असं आम्ही ठरवलं. हा वेगळाच रस्ता होता. तो कुठे नेत होता ठाऊक नव्‍हतं. पण आम्ही जात राहिलो. रस्ता अरूंद असला, तरी आजूबाजूची हिरवाई डोळ्यांना आणि मनाला सुखावत होती. हिरव्‍या रंगांच्या इतक्या छटा दिसत होत्या की डोळे आणि मन दोन्हीही तृप्त तृप्त होत होतं. कधी दुतर्फा वाऱ्याबरोबर डुलणारं जास्त उंचीचं गवत, तर कधी दोन्ही बाजूंनी असणाऱ्या पोपटीलालसर वेली, तर कधी दोन्हीकडे रांगेत उभी असलेली सुपारी आणि नारळाची उंचच उंच झाडं अशा रस्त्यावरून आम्ही जात होतो. मध्येच एखादी नदी लागत असे. मात्र पूर्ण रस्त्यात एकही दुकान, एकही मनुष्य दिसला किंवा भेटला नाही. गाडीत पिण्याचं पाणी घ्यायला विसरलो होतो आणि घशाला कोरड पडली होती. थोडं पुढे येताच एक टपरीवजा दुकान दिसलं आणि चक्‍क बिसलेरीच्या पाण्याच्या बाटल्या आम्हाला मिळाल्या. पाणी पिऊन पुढे निघालो. आता चांगला मोठा रस्ता आम्हाला लागला होता.
काहीच वेळात आम्ही गणपती पुळे इथे पोहोचलो. ओ’नेस्ट या चेनमधल्या नक्षत्र नावाच्या एका सुरेखशा हॉटेलच्या गेटमधून आम्ही प्रवेश केला. आदल्या दिवशीच केलेल्या बुकिंगमुळे तिथल्या सहाय्यकांनी आम्हाला आमच्या सामानासहित आमच्या स्वतंत्र बंगलारूपी जागेत पोहोचवलं. चार पायऱ्या चढून आत प्रवेश करण्याऐवजी मागे वळून बघितलं आणि आश्चर्याचा धक्‍काच बसला. समोर इतका विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला होता आणि आपल्या लाटा झेपावून तो जणूकाही भेटायला येऊ पाहत होता. रिसोर्टच्या उजव्‍या बाजूला स्विमिंग पूल खुणावत होता. अंगातला थकवा जाण्यासाठी आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो. काहीच वेळात सगळा थकवा दूर झाला. बघता बघता सायंकाळ झाली आणि तिथून दिसणारा सूर्यास्त अप्रतिम असा होता. मी अपूर्व आणि सायली यांचे सूर्यास्तासोबत काही फोटो काढले. खरं तर आम्ही खूप उंचावरच्या रिसोर्टमध्ये असलो, तरी समोर दिसणारा समुद्र लाटांनी उसळत कोणत्याही क्षणी आम्हाला भेटायला वरपर्यंत येईल असं वाटत होतं. त्याची गाज कानाला सुखावणारी होती. 
रात्री जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये येऊन गुडूप झालो. सकाळी सात वाजताच आम्ही आरेवारे पूलावरून आरे बीचवर पोहोचलो. उंचच उंच फरच्या झाडांमधून वाट काढत आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो. हाही समुद्रकिनारा इतका स्वच्छ, इतका स्वच्छ होता, की आजवर इथे कोणी आलंच नसावं असा फील आला. आम्ही तिघंही या समुद्राचा, लाटांचा आणि वाळूचा स्पर्श घेण्यासाठी आतुर झालो आणि पायातल्या चपला काढत धावत सुटलो. खरं तर इथला अनुभव इतका शब्दातीत होता, की बस्स. तरीही जगातल्या सगळ्या लोकांना फोन करून सांगावंसं वाटत होतं. सगळ्यांनाच या आनंदात सहभागी करून घ्यावंसं वाटत होतं. सायलीने अनेक शंखशिंपले गोळा केले. अपूर्वने मित्रांना व्‍हिडिओ कॉल करून समूद्र दाखवला. मी मात्र चालत राहिले, या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत....
परतताना घाटात दिसणारी डोंगराच्या कुशीत लपलेली कौलारू लाल रंगाची छोटीशी टुमदार घरं नजरेस पडत होती. निसर्गाला कुठेही बेरूप न करता ती त्यात सामावली गेली होती. मला अचानक सिमला आणि शिलाँग ही दोन्ही बघितलेली ठिकाणं आठवली. तिथल्या पर्वतांमध्ये हॉटेल व्‍यावसायिकांनी कोरून उभारलेली हॉटेल्स आठवली. पर्वतांना सोलून काढणाऱ्या त्या इमारती बघून खूप वाईट वाटलं होतं. इथे आम्ही कोकणातला जो जो भाग फिरलो तिथे सर्वत्र निसर्गाला बेरंग करणाऱ्या कुठल्याही गोष्टी किंवा वस्तू आढळल्या नाहीत. 
परत येऊन नक्षत्रमध्ये भरपेट नाश्ता केला आणि नंतर तयार होऊन ओ-नेस्टला बाय केलं. आता आम्हाला देवबाग, निवती या ठिकाणी जायचं होतं. प्रवास थोडा मोठा होता. मात्र मनाची तयारी असल्यामुळे आम्ही प्रवासाला लागलो. बघता बघता गाडी पणजी पावस मार्गाला लागली. काहीच वेळात कुडाळ आलं. मला रेणू गावस्कर यांची आठवण आली. आम्ही कोकोनट हॉटेलमध्ये जेवण केलं. हॉटेलच्या वेटरनी आम्हाला भरपूर मोदक खाऊ घातले. इथलं जेवणही अगदीच घरगुती पद्घतीचं होतं. ते सुग्रास जेवण करून आम्ही पुढल्या प्रवासाला लागलो.
कुडाळवरून 25 किमी अंतरावर असलेल्या आजपेवाडी इथल्या ग्रॅटिटयूड या होमस्टे च्या ठिकाणी पोहोचलो. इथे अद्वेत या तरुणाने आमचं स्वागत केलं. आम्हाला इथल्या सक्सेस या खोल्या आवडल्या. खास आर्किटेक्टने या खोल्यांचं डिझाईन केलं होतं. लालसर विटांमधल्या या खोल्या लंबगोलाकार आकाराच्या होत्या. ओबडधोबड असल्या तरी त्यांचं सौंदर्य काही औरच होतं. आतमध्ये खांब, कोनाडे, खुंट्या, बसायला चौथरा, आतमध्ये एका गोलात वॉशबेसीन आणि आरसा, बाजूलाच मोठा जमिनीपर्यंतचा आरसा, आणखी आतल्या गोलात गेल्यावर आंघोळीची जागा. सगळ्या गोलांमधून बाहेर आल्यावर झोपण्याची जागा. भिंतींमध्ये हिरव्‍यापिवळ्या लालसर रंगांच्या बाटल्याही फिट केल्या होत्या. तसंच जमिनीवर शंख, शिंपले, गारगोट्या, असं बसवलेलं होतं. रात्रीच्या वेळी या बाटल्यांमधून त्या त्या रंगाचा प्रकाश खोलीत झिरपत होता. सोलार सिस्टिममुळे गरमागरम पाण्याने फ्रेश होऊन आम्ही  किल्ले निवती बीच बघण्यासाठी सज्ज झालो.
इथेच आम्हाला गोल्डन फॉरेस्ट ची टेकडीवजा बेट दिसलं. समुद्रात पिवळ्या रंगात चमकणारी ती टेकडी बघून खूप आश्चर्य वाटलं. त्या गोल्डन फॉरेस्टवर गाई देखील फिरताना दिसल्या. काही लोकही तिथे फिरत होते. तर किनाऱ्यावर एक भलीमोठी बोटं हैय्या करत दहा-पंधरा माणसं काठावर आणत होती. तिथे फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत आम्ही होतो. नंतर आम्ही तिथून निघत भोगवे बीचवर गेलो. गाडी अगदी किनाऱ्यावरच नेली. पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा आणि स्वच्छ समुद्र...बाजूला दिसणारं लाईट हाऊस. समोरच्या बाजूला दिसणारं देवबागचं बेटासम दृश्य, एका बाजूने नदी आणि एका बाजूने समुद्र असं सगळं बघताना अंधारून आलं. तेवढ्यात एक बोटवाला धावत आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्याच्यासोबत देवबागला जायचं ठरलं. त्याचं नाव श्याम कुमठेकर.
ग्रॅटिट्यूड होमस्टेला परतलो तर पार्किंगच्या मैदानातल्या कपांउंड वॉलवर एका पर्शियन मांजराने आमच्याकडे बघून ‘म्यॉव, आलात का?’ असं म्हटलं. आम्ही तिघंही एकदम खुश झालो. कारण मांजर हा आमच्या तिघांचाही खास जिव्‍हाळ्याचा विषय. गेट उघडून आत येताच तश्शाच जुळ्या मांजरानी पुन्हा एकदा ‘म्यॉव, या या जेवण तयार आहे’ असं म्हटलं. आम्ही चकित झालो. तेवढ्यात अद्वैत आला आणि त्याने पर्शियन जातीची चार मांजरं पाळलेली असून आम्हाला बाहेर भेटला तो मिठू, आतमध्ये असलेली स्विटी, आणखी एक चिकू आणि चौथा किटू असल्याचं सांगितलं. आंधळा मागतो एक आणि अद्वैत देतो चार अशी आमची अवस्था झाली. किटू ब्लॅकब्युटी असल्याचंही आम्हाला कळलं. आमचे सगळे अंदाज, समज या चारही मांजरांनी खोटे ठरवले. पर्शियन असूनही ही मांजरं, लाडावलेली आणि सुस्त नव्‍हती. ही सगळीजण झाडावर भराभर चढत होती, या छतावरून त्या छतावर स्पायडरमॅनसारखी उड्या मारत जातयेत होती. बरं इतकी प्रेमळ आणि माणसाळलेली होती की बस्स. तसंच सगळीजणं सुंदर असूनही त्यांच्यात जराही ॲटिट्यूड नव्‍हता. ती आमच्याशी अगदीच डाउन टू अर्थ राहून वागत होती. सायली एकटीच तिच्या खोलीच्या बाहेर खुर्चीवर बसली होती, तेव्‍हा बाजूच्या रिकाम्या खुर्चीत स्विटी येऊन बसली. ती चक्‍क सायलीशी गप्पा मारत होती. गप्पा मारता मारता स्वत:ची स्वच्छताही जिभेने चाटून करत होती. सायलीने तिच्या पाठीवरून हात फिरवला की ती सायलीचाही हात चाटून स्वच्छ करून देत होती. ते दृश्य बघून जणूकाही दोन जिवलग मैत्रिणी हितगुज करताहेत  असं वाटत होतं.
रात्रीच्या जेवणासाठी व्‍हेज आणि नॉनव्‍हेज असा दोन्हीही बेत होता. जेवणात मासे, चिकन, आमटी, बिन्स-तोंडली यांची भाजी, मऊसूत गरमागरम पोळ्या, शेवयाची खिर असं सबकुछ होतं. इथेही मागेपुढे न बघता आम्ही पोट फुटेल इतकं जेवलो. जेवताना समोर अतिशय मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरु होते. आजूबाजूची दोन स्थानिक मांजरं तिथे आली होती आणि पळापळीचा खेळ ती खेळत होती. अद्वैतकडून आम्हाला कळलं, की स्विटी, मिठू, किटू आणि चिकू ही त्यांची मांजर मंडळी इतकी तरबेज आहेत की ती बाहेरच्या मांजरांना आपल्या धाकात ठेवतात आणि ऐकलं नाही की त्यांच्यावर हल्लाबोल करून त्यांना पिटाळून लावतात. पर्शियन मांजरांचं हे रूप बघून मी खूपच चकित झाले होते, हे असं कसं वागतात असं विचारल्यावर अद्वैतने सांगितलं, मी पहिल्यापासून त्यांना खूप लाडावलं नाही, किंवा स्पेशल ट्रिटमेंट दिली नाही. त्यामुळे ते इथल्या वातावरणात एकरूप झाले आहेत आणि त्यांनी इथे स्वत:ला जुळवून घेतलंय. पुण्यामुंबईत फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या पर्शियन मांजरांना पिंजऱ्यात कोंडल्याप्रमाणे ठेवलं जातं आणि आपल्या आनंदासाठी त्यांचे हाल केले जातात हे मला करायचं नव्‍हतं असंही त्याने सांगितलं. या चौघांनाही मासे खूप आवडतात असंही सांगितलं.
राहण्याची जागा इतकी हटके होती, की सूर्याची किरणं भासावीत अशा छताकडे बघत बघत कधी झोप लागली कळलंच नाही. रात्रभर पाऊस कोसळत होता. तरीही सकाळीच आम्ही भोगवे बीचला पोहोचलो. आमच्या आधी श्याम कुमठेकर बोटीसह येऊन पोहोचले होते. आम्ही निघालो आणि समोर दिसणारं देवबाग बघता बघता जवळ आलं. देवबागच्या किनाऱ्यावर आम्ही उतरलो. हिरव्‍यागार झाडीत लपलेलं ते बेट बघून खूप कुतूहल वाटलं. किनाऱ्यावर काही रिसोर्टस होते. इथूनच एका बाजूचा अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूने त्याला येऊन मिळणारी कार्ली नदी दिसत होती. खूप मज्जा वाटली. तिथून आम्ही तारकर्लीचा किनारा बघितला. त्यानंतर चिपी विमानतळ होतं. मग एका ठिकाणी समुद्राच्या मध्यभागी श्यामरावांनी बोट उभी केली आणि आम्हाला उतरायला सांगितलं. प्रश्नार्थक नजरेने बघताच ते म्हणाले, हा त्सुनामी पॉइंट आहे. त्सुनामीमुळे इथे उंचवटे तयार झाले आहेत. तुम्ही बुडणार नाहीत, उतरा खाली. मग आम्ही निर्धास्तपणे बोटीतून खाली उतरलो. खरोखरच आमची पावली बुडतील इतकंच पाणी त्या उंचवट्यावर होतं. आम्ही समुद्राच्या मधोमध उभे आहोत असा फिल मात्र येत होता. इथेच सिगल्स पक्षीही मोठ्या संख्येने येतात. तसंच समुद्राच्या खोलीत शिरलं की डॉल्फिनही नजरेस पडतात.
तिथून आमची बोट केरळ पॉइंट जवळ पोहोचली. त्सुनामी आली तेव्‍हा या किनाऱ्यावरच्या स्थानिक लोकांच्या जमिनीच्या भागात पाणी शिरलं आणि त्याचे दोन भाग पडले. या दोन भागांमधून पाणी आत शिरलं अणि केरळ पॉइंट तयार झाला. दोन्ही बाजूंनी नारळाची झाडी आणि मधून पाणी - असं केरळची आठवण देणारं दृश्य. ते दृश्य मनात साठवत आम्ही आणखी एका वाळूच्या गोलाकार छोट्याशा बेटावर पोहोचलो. इथे उतरलो तेव्‍हा श्यामरावांनी या वाळूमध्ये लोहकण असल्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र असून इथे पाणी येत नाही असं सांगितलं. इथेही उभं राहून चहोबाजूंचा समुद्र बघणं एक अविस्मरणीय अनुभव होता.
बोटीतून फिरत फिरत आम्ही लाईटहाऊसकडे नजर टाकली आणि समुद्रकिनारी जागी येऊन पोहोचलो. श्यामरावांनी एक नितांत सुंदर अनुभव घडवल्याबद्दल त्यांचे आभार मानत आम्ही आजपेवाडीतल्या ग्रॅटिट्यूडच्या रस्त्याला लागलो.
परतल्यावर घावण, चटणी आणि कॉफी असा भरपूर नाश्ता केला. त्या वेळी ग्रॅटिट्यूडमधली बाग बघितली. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं अद्वैतच्या वडलांनी लावली होती की बस्स. कदंब असो, की चाफा असो. आवळा असो, की आंबा असो, नारळ असो की सुपारी असो, वड असो की पिंपळ असो, बदाम असो की फुलांच्या वेली असोत, त्यांच्या जमिनीत सगळ्याच झाडांनी स्वत:ला रुजवून घेतलं होतं. त्यांचं रंगामधलं, दिसण्यामधलं वैविध्य अचंबित करणार होतं. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात सगळा कारभार सोपवून आता मी एकटा भटकंती करण्यासाठी मोकळा झालो आहे असं त्यांनी सांगितलं. इतकं निर्मोही होणं, अलिप्त होणं आणि तटस्थपणे जगणं कसं साध्य करता येतं याचं मला कुतूहल वाटलं आणि त्यांच्याविषयी आदरही वाटला.
नाश्त्यानंतर तयार होऊन आम्ही खूप जड अंत:करणाने ग्रॅटिट्यूड वास्तूचा निरोप घेतला. याचं कारण मला ती वास्तू इतकी आवडली की सगळ्या जगापासून दूर - इथे येऊन खूप वाचावं आणि खूप लिहावं असं वाटायला लागलं होतं. कधीतरी असं करून बघता येईलच.
ग्रॅटिट्यूड - अद्वैतचा निरोप घेत आम्ही अनास्कुरा घाट मार्गे पुण्याकडे निघालो. जेव्‍हा पुण्याची हद्द लागली, तेव्‍हा कोकणातले हिरवागार परिसर आता दिसणार नाही याचं खूप वाईट वाटायला लागलं. रस्त्यात आम्ही कऱ्हाडच्या त्रिकाया इथे जेवण केलं. जेवण चांगलं असूनही माझी स्वत:शी चिडचिड होत होती. मला कोकणातला आंबोळी, घावण यांचा नाश्ता, तिथलं आमसुलाची आमटी, भेंडीची हिंग टाकून केलेली हिरवीगार कुरकुरीत भाजी, तूप टाकलेले उकडीचे मोदक, सुरमई मासा, खेकडा असं सगळं आठवत होतं. मग कसंबसं स्वत:ला शांत केलं.
सायंकाळी आम्ही पुण्यात पोहोचलो. खरं तर खूप दिवस पुरेल इतका भरभरून निसर्ग् आमच्या डोळ्यात साठवून कोकण प्रवासाने सोबत दिलाय. पण तरीही, तिथे लावलेला बोर्ड मनातून जात नाहीये, ‘यावा कोकण आपलाच असा’ असं म्हणत तो पुन्हा बोलावतोय! आता लिखाण आणि भटकंती इतकंच करायचं असं दोन वर्षांपूर्वी मनाने नक्‍की केलं होतं. संधी मिळेल तेव्‍हा आणि ओळखीच्या-अनोळखी असलेल्या व्‍यक्‍तींबरोबर जायचं असंच ठरवलं होतं. ते आता घडतंय. दोनदा कोकण, कर्नाटकातलं हम्पी, पट्टडक्कल, आईहोळे, बदामी, नंतर ओडिसामधलं भुवनेश्वर, कोनार्क, जगन्नाथपुरी, दिल्ली, आसाम-मेघालय, चंदीगढ, हिमाचलची स्पिती व्‍हॅली आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा कोकण - असा प्रवास सुरू आहे. मज्जा येते आहे. रोज नवीन शिकवण निसर्ग देतो आहे. कोकणचा परिसर तर पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो आहे. अपूर्व, सायली आणि मी अशी आमची तिघांची एकत्रित ही पहिलीच निसर्गभ्रमंती, तीही खूप खूप आनंदाची!
शाहरूख खानच्या तोंडून ऐकलेला हा डॉयलॉग का कुणास ठाऊक पण इतक्या वेळा आधी ऐकलेला असतानाही आज मनाला जास्त भीडलाय. असं वाटलं, आपल्या बाबतीतही हे लागू होतंय की. 
अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो
पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने मे लग जाती है
दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.