किशोर दिवाळी 2021 - दूर का राही

किशोर दिवाळी 2021 - दूर का राही

आभासकुमार गांगुली नावाच्या मुलाची ही एक गोष्ट! 4 ऑगस्ट 1929 या दिवशी मध्यप्रदेशातल्या खांडवा या गावी एका बंगाली कुटुंबात आभासकुमारचा जन्म  झाला. आभासकुमारचे वडील कुंजलाल गांगुली हे एक नामांकित वकील होते, तर आई गौरी देवी ही एक उत्तम गृहिणी होती. लहानपणापासून आभासकुमार खूप खोडकर आणि हट्टी स्वभावाचा होता. त्याच्या खोड्या कधी थांबतच नसत. शाळेत गेल्यावर इतर मुलांच्या वह्या लपवून ठेव, तर कधी परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिण्याऐवजी चित्रं काढून ठेव, अशा नाना प्रकारच्या करामती तो करत असे. 

रस्त्यानं जाताना आभासकुमार आपल्या वडिलांच्या खांद्यावर दोन्हीकडे पाय टाकून त्यांचं डोकं पकडून बसत असे आणि वडिलांच्या डोक्यावर तबला वाजवल्याप्रमाणे हाताने ठाकठूक करत असे. रस्त्यानं जाणारेयेणारे लोक ‘हे काय वकीलसाहेब, जरा लाड कमी करा मुलाचे` असं म्हणत. आभासकुमार वडिलांचा खूप लाडका असल्यानं ते त्याच्या अशा सगळ्या खोड्या खपवून घेत असत. आभासकुमारला पाण्याचे वाहणारे सुंदर झरे, स्टेशनवर उभी असलेली रेल्वे, सूर्यास्त, संगीतात लागणारी सगळी वाद्यं यांची चित्रं काढायला त्याला आवडत असे. गंमत म्हणजे त्याचा आवाज इतका भसाडा होता की त्यानं तोंड उघडलं की समोरचा माणूस पळून जात असे. तरीही आभासकुमार मात्र आपल्या भसाड्या आवाजात जोरजोरात गात असे. 

एके दिवशी आभासकुमारची आई भाजी चिरत होती. आभासकुमारने तिथे असलेले बटाटे उचलून नेहमीप्रमाणे कॅच कॅच खेळायला लागला. खेळण्याच्या नादात त्याच्या हातातला एक बटाटा हवेत उंच छतापर्यंत उडाला आणि विरूद्ध दिशेनं गेला. बटाटा पकडण्यासाठी खाली न बघता आभासकुमार धावला आणि चुकून त्याचा पाय आई भाजी चिरत असलेल्या विळीवर पडला आणि आभासकुमारला खूप खोलवर जखम झाली. हळद लावून, बर्फ लावून आणि सगळे घरगुती उपाय करूनही त्याच्या पायाचं रक्त काही केल्या थांबेना. त्यातच भसाड्या आवाजातलं त्याचं रडणंही थांबेना. अखेर आभासकुमारला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. जखम खूप खोलवर झाल्यामुळे त्याला टाके घालण्यात आले. त्या वेळी वेदनाशमक औषधं नसल्यानं डॉक्टरही काही करू शकत नव्हते. आभासकुमारची जखम भरून यायला जवळजवळ एक महिना लागला. या महिन्याभरात त्याला जमिनीवर पाय देखील टेकवता येत नव्हता. चुकून पाय टेकवला गेला की वेदना असह्य होत आणि मग आभासकुमार जोरजोरात किंचाळत आणि ओरडत असे. मात्र या सगळ्या प्रकारात एक विलक्षण गोष्ट घडली. म्हणजे पुढे आभासकुमारच्या खोड्या थांबल्या नाहीत, पण त्याचा भसाडा आवाज मात्र एकदम बदलला आणि त्या आरडाओरड्यानं त्याचा आवाज कमालीचा सुरेल झाला. त्यानंतर तो जे काही गायचा ते ऐकायला घरातलेच नाही तर बाहेरचेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. खरं तर आभासकुमारनं शास्त्रीय संगीतच काय, पण कुठल्याही प्रकारचं संगीताचं रीतसर शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण तो भारतीय असो की, पाश्‍चिमात्य असो, सगळ्या प्रकारचं संगीत तासन्तास ऐकत असे. 

कुंजलाल गांगुली वकील असल्यानं त्यांचे इतर वकील मित्र अनेकदा घरी येत. त्या वेळी कुंजलाल आभासकुमारला जवळ बोलावत आणि गाणं गायला सांगत. विख्यात गायक कुंदनलाल सहगल यांचा आभासकुमार जबरदस्त चाहता होता. कुंदनलाल सहगलचं ‘किसने सब ये खेल रचाया` सह त्यांची अनेक गाणी त्याला खूप आवडत असत. त्या वेळी आभासकुमारनं सहगलचं गाणं गायलं तर त्याचे वडील त्याला बक्षीस म्हणून एक रुपया देत असत. आभासकुमारच्या मोठ्या भावाचं खरं नाव कुमूद होतं, पण घरातले सगळे त्याला दादामुनी या नावानं हाक मारत. दादामुनी हा देखील गायचा. दादामुनीचं गाणं गायलं तर आभासकुमारला चार आणे बक्षीस म्हणून वडील देत असत. घरी जेव्हा पाहुणे येत, तेव्हा कुंजलाल त्याला जवळ बोलावून कौतुकानं गाणं गायला सांगत, तेव्हा आभासकुमार ‘कुठलं गाणं गाऊ, सहगलसाहेबांचं की दादामुनीचं?` असा प्रश्‍न विचारत असे. पैसे वाचवण्यासाठी कुंजलाल त्याला ‘दादामुनीचं गाणं गा` असं सांगत असत. आभासकुमार मुळातच खट्याळ असल्यानं तो, ‘नाही मी आधी सहगलसाहेबांचं गाणं गातो आणि मग दादामुनीचं गाणं गातो` असं म्हणून किमान पाच तरी गाणी सहगलची गात असे आणि त्यानंतर एखादं दादामुनीचं! अशा रीतीनं तो भरपूर पैसे वडिलांकडून बक्षिसाच्या निमित्तानं उकळत असे! 

एकदा तर कुंजलाल गांगुली यांच्याकडे चक्क कुंदनलाल सहगल आले. आपला मुलगा तुमचा प्रचंड चाहता असून तो फक्त तुमचीच गाणी ऐकतो आणि गात असतो असं कुंजलाल यांनी सहगल यांना सांगितलं. आभासकुमारला हाक मारून गाणं गायला त्यांनी सांगितलं. आभासकुमार सहगल यांच्याकडे बघतच राहिला. आपण स्वप्न तर बघत नाही ना असं त्याला वाटायला लागलं. त्यानं सहगलनंच गायलेलं ‘किसने सब ये खेल रचाया` हे गाणं गावून दाखवलं. गाणं संपल्यावर सहगल यांनी त्याला शाबासकी दिली. आपल्या धाकट्या भावाला लागलेलं गाण्याचं वेड पाहून दादामुनीनं त्याला एक हार्मोनियम (गाण्याची पेटी) भेट दिली.

आपला भाऊ - दादामुनीमुळे आभासकुमारला अभिनयक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. चित्रीकरणाच्या वेळी आभासकुमार खूपच धमाल करत असे. वेगवेगळे विनोद सांगून सगळ्यांना हसवत असे. कित्येकदा तर तो एखाद्या लहान मुलाशी बोलावं तसं स्वतःशीच बोलत बसे. थोडक्यात, गाणं रेकॉर्ड करत असताना ते गाणं जर त्याला आवडलं नाही तर तोच लहान मुलाचा आवाज काढून स्वतःच ‘बाबा, हे गाणं चांगलं नाहीये` असं म्हणत असे आणि मग स्वतःच नॉर्मल आवाजात ‘बाळा, असं नाही बोलायचं. घरी गेल्यावर बोल हं.` असंही म्हणायचा. त्यानं हे पात्र स्वतःच निर्माण केलेलं असायचं. या पात्राचं नाव कधी नंदू तर कधी काही नाव तो ठेवायचा. 

अभिनय करण्यात आभासकुमारला जराही रस वाटत नसे. त्याचा खरा ओढा संगीताकडेच होता. ‘अभिनय म्हणजे खोटं खोटं सगळं करणं, तर संगीत म्हणजे अंतःकरणातून आलेली खरी खरी ऊर्मी` असं तो म्हणत असे. पण त्याची खरी आवड संगीत असल्यामुळे तो दिग्दर्शकाला मी तुमच्या चित्रपटात काम करतो, पण मला एक तरी गाणं गाऊ द्या अशी विनंती करत असे. त्यानं सतत लावलेल्या लकड्यामुळे अखेर त्यांनी त्याला आपल्या चित्रपटातलं एक गाणं गायला द्यायचं ठरवलं. खरं तर शास्त्रीय संगीताचा अभ्यास नसलेला, सराव नसलेला हा तरुण कसं काय गाणार हा प्रश्‍न त्यांना पडला होता, पण केवळ त्याचं मन राखण्यासाठी त्यांनी त्याला संधी दिली. त्या वेळी त्यानं गायलेलं गाणं प्रचंडच लोकप्रिय झालं. त्या गाण्याचे शब्द होते, ‘छोटासा घर होगा बादलोंकी छाँवो मे`! 

आभासकुमारला गाण्यानं झपाटून टाकलं होतं. गाणी गाताना तो त्यात वेगवेगळे प्रकारही करून बघायचा. याच आभासकुमारकडून प्रसिद्घ गायक मुहम्मद रफी यांनी यॉडलिंग शिकून घेतलं होतं. यॉडलिंग हा पाश्‍चिमात्य गाण्यातला कठीण प्रकार असून युरोपीयन कलाकार अतिशय कौशल्यानं तो गातात. एकाच वेळी खालचा स्वर आणि वरचा स्वर घेत गावं लागतं. मुहम्मद रफी आभासकुमारच्या घरी गेले आणि मला यॉडलिंग शिकवशील का असं विचारलं, तेव्हा त्यानं ‘त्यात काय विशेष, आत्ता शिकवतो` असं म्हणत दोनच दिवसांत रफीला यॉडलिंग शिकवलं. युरोपातला यॉडलिंग हा प्रकार आभासकुमारनं प्रथमच चित्रपटसंगीतात आणला.

हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीत आभासकुमार स्थिरावत चालला होता. गाण्याबरोबरच त्याने अनेक चित्रपटांमधून कामही केलं. एकीकडे चित्रपट निर्मात्याने पैसे दिले नाही, तर काम करणार नाही असं आभासकुमार त्यांना ठणकावून सांगायचा, पण त्याच वेळी अनेकांसाठी तो एक पैही न घेता गाणी गायचा. काही निर्मात्यांना चित्रपट पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडले तर पैसेही द्यायचा. अरूणकुमार मुखर्जी या बंगाली अभिनेत्याचा जेव्हा मृत्यू  झाला, तेव्हा आभासकुमारने भागलपूरला राहत असलेल्या मुखर्जी कुटुंबीयांना नियमितपणे पैसे पाठवले. जणू काही ते कुटुंब म्हणजे त्याचीच जबाबदारी होती! 

भारतरत्न आणि ऑस्कर पुरस्कारसह अनेक पुरस्कारांनी गौरवल्या गेलेल्या सत्यजीत रे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘चारुलता` या बंगाली चित्रपटासाठी ‘आमी चिनी गो चिनी तोमारे ओ गो विदेशिनी तुम थाको सिंधू पारे ओ गो विदेशिनी` हे नितांत सुंदर गाणं आभासकुमारनं गायलं. तसंच त्यानं गायलेलं ‘बिधीर बांधोन काटबे तुमी आमून शक्तिमान` या गाण्याला तर पार्श्‍वसंगीतही नव्हतं. तरीही ते गाणं ऐकायला खूपच श्रवणीय वाटतं. सत्यजीत रे यांच्या चित्रपटांसाठी गाताना आभासकुमारला ठाऊक होतं, की चित्रपट बनवताना अनेक आर्थिक अडचणींमधून जावं लागतं, तेव्हा त्यानं सत्यजीत रे यांच्याकडून मानधन घ्यायला नकार दिला होता. आणि ही गोष्ट सत्यजीत रे यांनी स्वत: एका जाहीर मुलाखतीत सांगितली होती.

1975 ते 1977 या दोन वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली. त्याआधी त्यांनी त्यांच्या वीस कलमी कार्यक्रमात आभासकुमारनं सहभाग घ्यावा असा आदेश काढला. वीस कलमी कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करण्यासाठी आभासकुमारच्या आवाजात काही फीलर्स गाऊन घ्यायचे होते. पण त्यासाठी त्यानं चक्क नकार दिला आणि सरकार जे करतंय ते योग्य नाही असंही ठणकावून सांगितलं. परिणामी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी आभासकुमारवर नाराज होऊन त्याची कुठलीच गाणी आकाशवाणी आणि विविध भारती रेडिओवरून प्रसारित होऊ नयेत असे आदेश काढले. पण आभासकुमारनं या गोष्टींची पर्वा केली नाही आणि कोणाचं लांगूलचालनही केलं नाही.

सुरुवातीच्या काळात आभासकुमारला स्टेजवर जाहीररीत्या गाणं गायची खूप भीती वाटायची. एकदा सैनिकांसाठी स्टेज शो करायचा असं सुनिल दत्त या अभिनेत्यानं ठरवलं. सुनिल दत्त त्याला म्हणाला, ‘तुझा आवाज लोक दऱ्याखोऱ्यांतून आणि पर्वताआडून ऐकताहेत. आज प्रत्यक्ष समोर तुला ऐकू दे की!` तेव्हा आभासकुमारनं म्हटलं, ‘त्या तिथे एवढ्या बर्फात माझ्या तोंडून थंडीनं शब्दही फुटणार नाही. मग मी कसा गाणार? तू असं कर, स्टेजवर माझ्यासमोर उभा रहा आणि ओठ हलव. मी तुझ्या मागे उभा राहून गात राहीन.` सुनिल दत्तनं त्याची अट मान्य केली. स्टेज शो सुरू झाला. आभासकुमार मागे आणि समोर सुनिल दत्त ओठांची हालचाल करत उभा राहिला. समोर मरणाच्या थंडीत लोक हा स्टेज शो ऐकायला आणि बघायला आले होते. आभासकुमारनं डोळे मिटले आणि गायला सुरुवात केली. सुनिल दत्त ओठ हलवत उभा राहिला. एका क्षणी सुनिल दत्तनं हळूच मागे वळून बघितलं. आभासकुमार डोळे मिटून गाण्यात तल्लीन झाला होता. हळूच सुनिल दत्त स्टेजवरून बाजूला झाला. लोकांना आता गाताना प्रत्यक्ष द ग्रेट आभासकुमार दिसत होता. लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेनासा झाला होता. दुसऱ्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. आभासकुमारनं डोळे उघडले. लोक बेफान होऊन टाळ्या वाजवत आपला आनंद व्यक्त करत होते. त्या क्षणी तेवढ्या थंडीतही आपलं स्वागत करणारे देशाचे सैनिक पाहून त्याला आपण उगाचंच टाळाटाळ करत होतो याचं वाईट वाटलं आणि त्यानं तेवढ्याच उत्साहाने पुढे गाणं सुरू ठेवलं! पुढे आभासकुमारनं देशविदेशात अनेक स्टेज शोज केले. स्टेजवर येताना तो सायकलवर येई, आल्यावर उलट्यासुलट्या उड्या मारे, अनेक गमतीजमती करत तो लोकांना हसवत असे आणि एवढं सगळं करून गाताना मात्र त्याचा एकही सूर बेसूर होत नसे हे विशेष!

एकदा कॅनडामध्ये आभासकुमारचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आभासकुमार इतका प्रसिद्घ झाला होता की त्याच्या सुरक्षिततेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातच कार्यक्रम सुरू असताना थिएटरमध्ये काही अतिरेकी बॉम्ब टाकणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. प्रत्येक प्रेक्षकाची कसून तपासणी केली जात होती. अशा वेळी पोलिसांनी आभासकुमारला  नाचतबागडत व्यासपीठावर वावरू नका, वगैरे सल्ले दिले. आभासकुमाननं पोलिसांसमोर होकारार्थी मान डोलावली, पण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात केल्यावर आपल्याबरोबर गाण्यासाठी, नाचण्यासाठी आणि मजा करण्यासाठी काही प्रेक्षकांना त्यानं व्यासपीठावर बोलावलं. पण पोलिसांच्या करड्या नजरेमुळे प्रेक्षकांची व्यासपीठावर येण्याची हिम्मत होईना. अशा वेळी आभासकुमारनं माईक हातात घेऊन म्हटलं, मी इथे तुम्हाला आनंद द्यायला आलोय. असं असताना तुमच्यातलाच कोणी माझा जीव घेईल यावर माझा विश्‍वास नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मला साथ द्यायला इथे येणार नाही, तोपर्यंत मी कार्यक्रम सुरू करणार नाही. असं बोलून आभासकुमार व्यासपीठावर चक्क मांडी घालून बसला. आभासकुमारनं आव्हान करताच काही प्रेक्षक त्याच्या आसपास येऊन बसले. मनासारखा माहोल तयार झाला आणि मगच त्यानंं गायला सुरुवात केली. त्यानं जेव्हा कार्यक्रम संपताना एक गाणं गायलं, तेव्हा उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला सुरुवात झाली होती. ते गाणं होतंः 

प्यार बाँटते चलो, क्या हिंदू क्या मुसलमान हम सब है भाई-भाई.....

आभासकुमारमधला कलाकार जेवढा ग्रेट होता, तितकाच त्याच्यातला माणूसही ग्रेट होता. दुसऱ्या कलाकाराची इज्जत राखणं आणि त्याच वेळी आपल्या मर्यादा ओळखणं आणि मनापासून त्या कलाकाराची प्रशंसा करणं हे गुण त्याच्यामध्ये होते. आभासकुमारनं पहिल्यांदा देव आनंद या नायकासाठी गायलेलं ‘जिद्दी` या चित्रपटातलं ‘मरनेकी दुवा क्यू माँगू` हे पहिलं गाणं होतं. तसंच त्याच्याच ‘फंटूश` चित्रपटातलं ‘दुखी मन मेरे` हे गाणंही तितकंच हृदयाला कातर करून जातं. ‘ आ चल के तुझे मै लेके चलू` हे गाणं नवी आशा, नवा मार्ग दाखवतं, तर ‘रिमझिम गिरे सावन` हे गाणं किती अंतःकरणातून गायलंय याचा प्रत्यय ऐकणाऱ्याला येतो. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना` हे गाणं गायलं, तेव्हा ‘आपण गेल्यावर आपल्याला या गाण्यानंच लोकांनी आठवावं` असं त्यानं म्हटलं! चिंगारी कोई भडके, मेरे नयना सावन भादो, कोई हमदम ना रहा, मेरे महेबूब कयामत होगी, कोई होता जिसको अपना, वो शाम कुछ अजीब थी अािण बडी सुनी सुनी है ही त्याची स्वतःची काही आवडती गाणी होती! ‘इनामिनाडिका` या गाण्यातले निरर्थक शब्दही लोकांच्या पूर्णपणे लक्षात राहण्याची किमया आभासकुमारनं करून दाखवली. ‘नई दिल्ली` या चित्रपटामधलं त्यानं गायलेलं ‘नखरेवाली` या गाण्यानं तर प्रचंड लोकप्रियता मिळवली. चलती का नाम गाडी या चित्रपटातली ‘इक लडकी भीगीभागीसी, सोती रातोंमे जागीसी` पासून ‘पाच रुपेय्या बारा आना` पर्यंतची सगळीच गाणी एक से एक आहेत. ‘ रोना कभी नही रोना, चाहे टूट जाये कोई खिलोना`, ‘रोते रोते हसना सिखो, हँसते हँसते रोना` ही त्यानं गायलेली मुलांसाठीची गाणी तर अप्रतिम आहेत. ‘गंमतजंमत` या मराठी चित्रपटासाठी त्यानं ‘अश्‍विनी ये ना` हे गाणं गावून एकच धूम मचवली होती. 

एकदा आभासकुमार आणि त्याची पत्नी लीना दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले होते. सकाळी उठल्यावर लीनानं बघितलं, की आभासकुमार रूममध्ये दिसत नाही. तेव्हा ती त्याला शोधत बाहेर आली. बघते तर काय आभासकुमार त्या हॉटेलसमोरच्या बागेतल्या झाडांना पाणी घालत होता. लीनानं ते दृश्‍य पाहिलं आणि ती त्याला म्हणाली, ‘हे तू काय चालवलं आहेस? आपण काही इथे कायमचं राहणार नाही आहोत. आपण उद्या जाणार आहोत. हे काही आपलं घर नाही.` त्यावर तो म्हणाला, ‘तसं पाहिलं तर आपलं असं मालकीचं काहीच नसतं. पण तसं समजून आहे तो क्षण का नाही जगायचा?` गंमत म्हणजे तो बागेतल्या झाडांशी देखील गप्पा मारायचा. कोणी त्याच्या घरी आलं की तो त्यांना आपल्या बागेत घेऊन जायचा आणि प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्यांची नावं घेत ते आपले जीवलग मित्र आहेत असं सांगायचा. त्या वेळी येणारा आभासकुमारकडे चकित होऊन बघत राहायचा.

‘दूर का राही` या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, गायक, प्रमुख अभिनेता असं सगळं काही आभासकुमार होता. आज भारतीय चित्रपटांच्या यादीत तो अभिजात चित्रपट म्हणून वाखाणला जातो. आय्ुाष्य जगताना ‘पंथी हूं मै इस पथका` असं म्हणत एक प्रवासी म्हणून ते आयुष्य जगावं आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक मोहाकडे अलिप्तपणे आणि तटस्थपणे बघावं; वाटेत येणाऱ्या त्या त्या मोहांना बाजूला सारून मानवतेची कास धरून चालत राहावं; या वाटेवर भेटणारे दलित, शोषित आणि वंचित, असे जे जे भेटतील, त्यांना आपलं करावं किंवा त्यांचं व्हावं, असं हा चित्रपट सांगतो. 

हिन्दी चित्रपटसृष्टीतला एक यशस्वी पार्श्वगायक, कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक, अभिनेता, अशा सगळ्याच क्षेत्रात आभासकुमारनं ठसा उमटवणारी मुशाफिरी केली. हिन्दीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमधून तो गायला. आपल्या कारकिर्दीत  8 वेळा फिल्मफेअर ॲवार्ड मिळवून त्यानं एक विक्रमच केला होता! आल्फ्रेड हिचकॉकचे चित्रपट बघायला त्याला प्रचंड आवडायचं. त्याच्यातला गायक जेवढा सरस होता, तितकाच त्याच्यातला अभिनेता सरस होता. मोजता येणार नाहीत इतक्या चित्रपटांसाठी तो गायला. त्याच्या गाण्याच्या शैलीवरून तो कोणत्या अभिनेत्यासाठी गाणं गातोय हे सहजपणे ऐकणाऱ्याला कळायचं. 

एके दिवशी हसतखेळत गप्पा मारत असताना अचानक आभासकुमारचा ह्दयविकारानं मृत्यू झाला. आपल्या मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार आपल्या मध्यप्रदेशातल्या खांडवा या गावी व्हावेत अशी त्याची इच्छा होती. तो म्हणाला होता, ‘मुंबईसारख्या मोठ्या शहरात एखाद्या कलाकाराच्या मृत्यूनंतर सगळी चित्रपटसृष्टी त्यांच्या अंत्यदर्शनाला गोळा होते. तसंच त्याच्या घराबाहेर, रस्त्यावरही लोक गोळा होतात अंत्यदर्शनासाठी जे जे अभिनेते तिथे येतात, त्यांना बघण्यासाठी देखील लोक गर्दी करतात आणि आपला आवडता अभिनेता दिसला की त्याच्या नावानं आरडाओरडा सुरू करतात. मला माझ्या मृत्य्ूाचा तमाशा करायचा नाहीये. मी खांडव्यासारख्या गावातून आलो होतो, त्याच गावाची माती माझ्यात आहे आणि  तीच मी माझ्या गावाला परत देऊ इच्छितो.` त्याच्या इच्छेनुसार आभासकुमारचे अंत्यसंस्कार खांडवा या त्याच्या जन्मगावी करण्यात आले. 4 ऑगस्ट 1929 या दिवशी जन्मलेला आभासकुमार 13 ऑक्टोबर 1987 या दिवशी लाखो चाहत्यांना पोरकं करून हे जग सोडून गेला. 

आभासकुमारच्या मृत्य्ूानंतर मध्यप्रदेश सरकारनं त्याच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्याच्या नावानं एक पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि दर वर्षी हा पुरस्कार एखाद्या कुशल कलाकाराला प्रदान करण्यात येतो! आजही खांडव्यामध्ये त्याच्या समाधीचं दर्शन घ्यायला जगभरातून अनेक चाहते, अनेक कलाकार जातात आणि त्याला आठवतात. डोळे मिटून समाधीचं दर्शन घेताना म्हणतात,‘तू कुठे गेलास, तू तर आहेसच आमच्या मनात आणि कायम राहशीलच!` या आभासकुमारला आज अख्खं जग ‘किशोरकुमार` या नावानं ओळखतं. ‘माझं गाणं हीच माझी ओळख` असं म्हणत ‘कुठल्याही कठीण प्रसंगात हार मानू नकोस, मी आहे ना सोबत` असं तो सांगतो आहे :

आ चल के तुझे, मै लेके चलूँ एक ऐसे गगन के तले
जहाँ गम भी ना हो, आसूं भी ना हो, बस प्यार ही प्यार पले

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.