राज कुलकर्णी

राज कुलकर्णी

जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख 
मनोविकास प्रकाशनाच्या अनेक ग्रंथाच्या लेखिका दीपा देशमुख यांचे त्यांच्या 'जग बदलवणारे ग्रंथ' या ग्रंथावरील व्याख्यान उस्मानाबादेत परवा सरस वाचक चळवळीने आयोजित केले होते. सरस वाचक चळवळीच्या सर्व पदाधिका-यांचे या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद. 
दीपा देशमुख यांच्या व्याख्यानाने उस्मानाबादकरांना ज्ञानाचे आणि माहितीचे प्रचंड मोठे ग्रंथालयच खुले झाले. जवळपास दिड तासाच्या त्यांच्या सुसुत्र आणि लयबद्ध अशा मांडणीने सर्व श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
जीनियस ,कँनव्हास अशा ग्रंथातून जगभरात विविध क्षेत्रात अतुलनिय कार्य करत मानवाच्या कर्तृत्वाची विविध क्षेत्र संपन्न करत ,ज्यांनी जग घडवलं, जगभरचा माणूस घडवला, अशा सर्व महान व्यक्तीमत्वाची ओळख त्यांनी करून दिली. 
जगात ज्यांनी मानवी कर्तृत्वाच्या कक्षा रूंदावणारे कार्य केले ,अशांचे कार्य नि लेखन समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीची जडणघडण, त्याचं मन, त्याचं भावविश्व ,स्वभाव समजून घ्यायला हवं ,ही त्यांची मांडणी खूप मुलभूत आहे.जी वाचकांसाठी नि खास करून अभ्यासकांसाठी खूप मार्गदर्शक अशी आहे. 
श्वानदंशावरील लस शोधणा-या लुई पाश्चर याच्या जीवनातील कठीण प्रसंगाचे वर्णन करताना त्याच्या प्रामाणिक नि सकारात्मक विचार पद्धतीबद्दलही माहिती दिली, जी खूप महत्वपुर्ण होती. पिसाळलेले कुत्रे पकडून, त्याची लाळ गोळा करून त्यावर विविध प्रयोग करत ,स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने जे संशोधन केले याची माहीती ध्येयासाठी परीश्रमाची तयारी असायला हवी, हे मनावर बिंबवले जाते. न्युटनची जडणघडण अशी होती की तो अत्यंत क्लीष्ट पद्धतीने तो विषयाची मांडणी करत असे. त्याचे प्रिन्सिपीया हे पुस्तक 1666 साली प्रकाशित झाले. त्यात त्याने पदार्थ विज्ञानातील नियमांबरोबर प्रकाश किरणांचे वस्तुमान स्वरूपही मांडले. त्यातून पुढे मँक्सवेल प्लँक ची क्वांटम थेरी मांडली गेली. न्यूटनच्या क्लिष्ट अशा सिद्धांताचे सुलभीकरण सी.चंद्रशेखर या भारतीय संशोधकाने मांडले. ता-याचे वस्तुमान आणि परीघ याचे गुणोत्तर ठरवणारे चंद्रशेखर यांचे संशोधन ,ता-याच्या प्रदिप्ततेची मर्यादा सांगते. यास आजही चंद्रशेखर लिमिट म्हणतात. खरे तर कृष्णविवाराच्या शोधाचे श्रेय चंद्रशेखर यांनाच मिळायला हवे असे माझे मत आहे. 
भारतीय शास्त्रज्ञ संशोधनात मुलगामी असले तरी पेटेंट बाबतीत निरुत्साही असे दीपा यांचे निरीक्षण अगदी वास्तव आहे. जगदीशचंद्र बोसाचे वनस्पतींच्या भावना बद्दलचे संशोधन आणि त्यांना ब्रिटीश इंडियात झालेला याबद्दचा त्रास या बद्दलची माहीती त्यांनी खूप रंजकपणे मांडली. 
मला असे वाटते की, वनस्पतींना भावना असतात असा मनात येणे नि यावर संशोधन करणे हे बोस यांना सुचले याचे कारण त्यांच्या भारतीय असण्यात आहे. भारतीय मनोविश्व हे जडवादापेक्षा अध्यात्मिक प्रेरणांनी जास्त भारावलेले आहे. सभोवार पसरलेलं लौकिक जीवन क्षणभंगुर आणि पारलौकीकतेला शाश्वत मानणा-या समाजात मनाचा कानोसा घेण्याची पद्धत परंपरेने विकसित होत असावी कदाचित ! 
दीपा यांनी चित्रकार नि शिल्पकार यांची माहीती देत असताना त्यांचे भावविश्व ही उलगडून दाखवले. पिकासो, वॉन गॉग यांची माहीती देताना त्यांनी मायकेल अँजेलो आणि त्यांच्या कला निर्मितीच्या प्रेरणा यांची उकल खूप प्रभावीपणे केली. 
लिओनार्दौ दा विन्सी या चित्रांबद्दल, संशोधनाबद्दल मिळालेली माहीती खूप थक्क करणारी होती. चित्रकार एकवेळ कलाकार तरी होतो किंवा खूप विध्वंसक तरी होतो, असं त्या म्हणाल्या. हे वाक्य मलाही वेगळा विचार करायला लावणारं होतं. कारण स्वत:ला हवं तसं जग रेखाटणा-या मेंदूत सभोवार पसरलेल्या समाजाच्या चित्रा बद्दल असुया वाटत असावी काय म्हणून तो विध्वंसक होतो ? माहीती नाही पण हिटलरच्या चित्रकाराच्या प्रेरणा नेमक्या काय असाव्यात यावर मी तरी कांही वाचलेले नाही. 
शिल्पकारांनी प्रमाणबद्ध शरीराचे मोजमाप घेण्यासाठी प्रेतांची मोजमापे घेत कित्येक रात्री जागून काढल्या हे दीपा यांनी सांगतलेच पण त्याच बरोबर शिल्पाबाबत भारतीय नि पाश्चात्य शिल्पकारांची मनोभुमिका ही स्पष्ट केली. हे खरेच आहे की, भारतीय नि पाश्चात्य शिल्पकलेचे मानक खूप वेगळे आहेत. भारतात शिल्प वा मुर्ती ही देवतेची या अनुषंगाने प्रामुख्याने पाहीले जाते पण पाश्चात्य शिल्पात सामान्य व्यक्तींची शिल्पे अधिक आहेत. 
समाजातील विचार हे समाजातील अधिकारी व्यक्तींचे विचार असतात असं कार्ल मार्क्स ने म्हटलं आहे. पारलौकीक जीवनाच्या अधिक प्रभावाखाली असणा-या समाजात शिल्प असो वा चित्र या कलांची अभिव्यक्तीही देवतांच्या भोवती फिरणे सहज स्वाभाविक आहे. असे असले तरी जागतिक इतिहास भारतीय कलाकारांचे कर्तृत्व जगाचा सांस्कृतिक वारसा ठरला आहे हे आपण अजिंठा, वेरूळ, ताजमहल याच्या उदाहरणातून अभिमानाने सांगू शकतो. 
नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय आणि अलेक्झांड्रिया इथले ग्रंथालय कसे नष्ट झाले याचा संदर्भही महत्वाचा होता. नालंदाचे उत्खणन पुर्ण झाले नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. जगभरातील मानवी संस्कृती विकसित होण्याचा वेग नि टप्पा जगभर वेगवेगळा आहे. कारण जगातील सर्व लोक वास्तव जीवनात एकसमान कँलेंडर वर्षात जगत असले तरी मनाने नि वर्तनाने ते एकाच कँलेंडर वर्षात जगत नसतात, त्यामुळे जगाचा इतिहास विविध स्वरूपाच्या सांस्कृतिक कलहाने भरलेला दिसून येतो. 
दीपा देशमुख यांचे हे व्याख्यान एकाच वेळी अनेक महान लोकांच्या कार्याचा परीचय करून देणारे आणि त्याच त्यांच्या महान असण्या नि महान होण्यामागची कारणमिंमासा करणारे तत्वचिंतक ,प्रबोधनपर असे होते. यातून खूप कांही शिकायला मिळाले. 
दुस-या दिवशी मी त्यांना भेटलो. सन्मित्र अरविंद पाटकर यांच्या समवेत माझ्या नेहरूंवरील प्रस्तावित पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा झाली. पण चर्चेच्या ओघात एक बाब समजली की आमच्या विचारात नि विचार करण्याच्या पद्धतीत खूप कांही साम्य आहे. त्यामुळे  एका समविचारी व्यक्तीशी मी अवगत झालो , असा भाव मनात निर्माण झाला. विचार नि स्वभाव जुळला , मग एकमेकांतील ज्येष्ठ कनिष्ठ हा भावही संपला. ही अवस्था, आम्हा एकमेकांना एकाच पातळीवर घेऊन आली आणि दीपा ही माझी चांगली मैत्रीण झाली. तीला खूप खूप शुभेच्छा. 
दीपा सोबतचा हा भाव, हा स्नेह , हे प्रेम सतत वृद्धींगत होत राहील हे नक्की ! 
सरस वाचक चळवळीचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन !
© राज