डॉ. राजीव भिसे, चेन्नई.

डॉ. राजीव भिसे, चेन्नई.

सुरुवातीलाच आपल्या दोघांचे आभार मानतो.
मागच्या महिन्यात पुण्यात आलो असताना, मित्राने जग बदलणारे १२ जीनियस आणि भारतीय जीनियसचे तीन संच मला भेट दिले. त्याला दुखवायचे  नाही केवळ एवढ्याच भावनेनं ते घेऊन पुन्हा चेन्नईला परतलो. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझ्या दिनक्रमात बुडून गेलो. दर दोन दिवसांनी मित्राचा पुस्तके वाचलीस का? म्हणून फोन येत राहिला. वैतागून अखेर वाचायला सुरुवात केली आणि आपण ८ दिवस वाया घालवल्याची टोचणी मनाला लागली. या सगळ्यांची नावं माहीत होती. शोधही माहीत होते. पण त्यापलीकडे पूर्णपणे अनभिज्ञ होतो. गॅलिलिओपासून ते डॉ. नारळीकरांपर्यंतचे २४ शिलेदार यांनी माझी झोप उडवली. माझं यांत्रिकपणे चाललेल्या आयुष्यावर त्यांनी चक्क हल्लाबोल केला. फक्त पैसा मिळवण्याचे मशीन मी झालो होतो आणि माझ्या बायकोमुलांच्या इच्छा पूर्ण करणारा एक रोबोट! खरी ज्ञानलालसा काय असते हे आपली पुस्तकं वाचून मला समजले. माझ्यातला माणूस या २४ लोकांनी जागा केलाय. मी काय करायला हवे आहे याचा विचार सुरू झालाय. पोटासाठी मी अर्थाजन करेनच, ते करावेच लागेल. पण आयुष्याचा अर्थ सांगणारे लोक आपण आपल्या पुस्तकातून उभे केलेत. आपली लेखणी ओघवती, रसाळ तर आहेच, पण माणसाला उपदेश न करता ती त्याच्या स्वार्थी आयुष्यावर प्रहार करणारी आहे. 
दीपा मॅडम, चार दिवसांत मी हे सगळं वाचून काढलं आणि आता तुमची आणि सरांची इतर सर्व पुस्तकंही मागवली आहेत. कारण इतके दिवस मी फार वाचन करत नव्हतो. माझ्या मित्राचे प्रसादचे शतशः आभार ज्यानं मला ही अनमोल भेट दिली. पुण्यात आलो की आपली आणि सरांची भेट घेतल्याशिवाय परतणार नाही! आपण दोघे ग्रेट आहात.
आपला, 
डॉ. राजीव भिसे, चेन्नई.