दत्ता बाळसराफ

दत्ता बाळसराफ

लोकसत्तामध्ये फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर सध्या ‘जीनियस’ या अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित मालिकेबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतंच मी चित्रकार आणि शिल्पकार यांच्यावर लिहिलेलं ‘कॅनव्हास’ हे पुस्तक वाचलं होतं. या पुस्तकानं माझ्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या समस्त वाचकांच्या या लेखकद्वयींकडून अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांची भेट घेतल्यावर मला जीनियस मालिकेबद्दल समजलं आणि थक्क झालो.

विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, चित्र, संगीत आणि सामाजिक बदल या सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं असे ७२ युगप्रवर्तक ‘जीनियस’ या मालिकेतून टप्प्याटप्प्यानं आपल्या भेटीला येणार आहेत. जग बदलण्याचा ध्यास घेतलेले पहिले १२ जीनियस हे वैज्ञानिक असून त्यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य यांची सखोल ओळख करून देणारी ही स्वतंत्र १२ पुस्तकं  अत्यंत सोप्या, सुटसुटीत, रसाळ आणि खुमासदार शैलीत तीन संचांमध्ये येत असून चार-चारच्या जोडीनं ते आपल्याशी संवाद साधणार आहेत.

पहिल्या संचात विश्‍वाच्या निर्मितीबद्दल सांगणारे वैज्ञानिक आहेत, गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग! पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य सांगितलं म्हणून गॅलिलिओला चर्चच्या छळाला सामोरं जावं लागलं.  संपूर्ण आयुष्य उपेक्षा, तिरस्कार आणि छळ यांच्यात काढलेल्या गॅलिलिओनं मानव जातीच्या कल्याणासाठी विज्ञानाचा ध्यास घेतला आणि अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्यानंतर आलेल्या न्यूटनसाहेबांना कोण ओळखत नाही? न्यूटनचा गुरुत्वाकर्षणासह प्रत्येक शोध जग हादरवून सोडणारा होता. पण हाच न्यूटन स्वभावानं किती विक्षिप्त, विचित्र, विसरभोळा आणि भांडकुदळ होता हेही आपल्याला यात कळणार आहे. नोबेल पारितोषिक विजेता असलेल्या ‘बॉस’ आईन्स्टाईनची तर बातच और! त्याचं नाव घेतलं की  e=mc2 हेच समीकरण डोळ्यासमोर येतं. आधुनिक विज्ञानात कॉस्मॉलॉजीमध्ये त्याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत ओलांडून पुढेच जाता येत नाही. विसाव्या शतकातला प्रचंड बुद्धिमान म्हणून ओळखला जाणारा आईन्स्टाईन अत्यंत मिश्कील, विनोदी, विसरभोळा आणि गबाळा संशोधक म्हणूनही प्रसिद्ध होता. त्यानंतर येणारा स्टीफन हॉकिंग आज इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केंब्रिज विद्यापीठात ल्यूकेशियन प्रोफेसर म्हणून मानाचं पद भूषवत असून या वैज्ञानिकानं आपल्या असाध्य अशा अपंगत्वावर मात करून सहा वेळा डॉक्टरेट मिळवली ही गोष्ट आपण सगळेच जाणतो. हॉकिंगचं थिऑरॉटिकल कॉस्मॉलॉजी, क्वांटम ग्रॅव्हिटी  आणि ब्लॅक होल्स यांच्यावरचं संशोधन संपूर्ण जगाला चकित करणारं आहे.

यानंतर दुसरा संच आहे सूक्ष्म-जंतूंविषयी शोध लावणार्‍या एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्‍चर आणि ऍलेक्झांडर फ्लेमिंग या चार वैज्ञानिकांचा! देवी या रोगातून संपूर्ण जगाला रोगमुक्त करण्यात एडवर्ड जेन्नर या ब्रिटिश शास्त्रज्ञाचं फार मोठं योगदान आहे. देवीच्या या रोगानं जगभर लाखो/करोडो लोकांचा बळी घेऊन धुमाकूळ घातला होता. मानवजातीच्या इतिहासात एडवर्ड जेन्नरच्या शोधामुळे जितके प्राण वाचले, तितके इतर कुठल्याही संशोधनानं वाचले नसतील. कॉलरा (पटकी), अँथ्रेक्स, टीबी (क्षय), सिफिलीस (गुप्तरोग) आणि घटसर्प यावर अफाट संशोधन केलेल्या अतिशय नम्र आणि विनयशील असलेल्या रॉबर्ट कॉख या जर्मन वैज्ञानिकाला त्याच्या वैद्यकीय शाखेतल्या अमूल्य योगदानाबद्दल १९०५ साली नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्‍चर याला सूक्ष्मजतूंपासून होणारे रोग, त्यांची कारणं आणि त्यावरचे उपाय शोधणारा संशोधक म्हणून आज संपूर्ण जग ओळखतं. कुत्र्याच्या चावण्यानं होणार्‍या रेबीजसारख्या महाभयंकर रोगावर उपाय म्हणून परिणामकारक लस शोधण्याचं कामही लुई पाश्‍चरनं केलं. पाश्‍चरची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की फ्रान्सनं श्रेष्ठ व्यक्तींची यादी करायची ठरवलं आणि त्यासाठी लोकमत घेतलं, तेव्हा पाश्‍चर हा पहिल्या क्रमांकावर होता! ‘पेनिसिलीनचा जनक’ म्हणून आख्खं जग ज्याला ओळखतं असा नोबेल पारितोषिक विजेता ऍलेक्झांडर फ्लेमिंगच्या आयुष्याची आणि शोधांची चित्तरकथा आपल्याला इथेच अनुभवायला मिळणार आहे.

तिसरा संच आहे अणुविश्‍वाची गोष्ट सांगणार्‍या मेरी क्युरी, लीझ माइट्नर, जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन या चार वैज्ञानिकांचा! साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची तळमळ असलेली मेरी क्युरी ही भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिलीच स्त्री होती. किरणोत्सारी पदार्थ आणि त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम, रेडियमचं आण्विक वस्तुमान अशा महत्त्वाच्या विषयांच्या मुळाशी जाऊन तिनं शोध घेतला. त्यानंतर लीझ माइट्नर हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यांत मूलभूत संशोधन केलं. पंधरा वेळा नामांकन होऊनही केवळ ती स्त्री असल्याकारणानं तिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही. पुरुषांची टीका, समाजाकडून पदोपदी अवहेलना आणि अपमान हे सगळं सगळं सहन करत तिला पुढे जावं लागलं. मेरी क्युरी आणि लीझ माइट्नर यांचं आयुष्य बघितलं की प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्यांनी केलेलं अफाट संशोधन पाहून डोळे पाणावतात. अणुबॉम्बचा जनक म्हणून ज्याला संबोधलं जातं असा जे. रॉबर्ट ओपेनहायमर याचा प्रत्यक्ष अणुबॉम्ब निर्मितीत महत्वाचा सहभाग असला तरी, एकीकडे त्याला गौरवलं गेलं, तर दुसरीकडे मरणानंतरही त्याच्या वाट्याला अवहेलनाच आली! या मालिकेतला हीरो वैज्ञानिक कोणी असेल तर तो म्हणजे नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन शााज्ञ रिचर्ड फाईनमन! फाईनमननं क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयात सखोल काम केलं. रिचर्ड फाईनमन हा आपलं अस्थिर आणि वादळी आयुष्य, भरकटलेपण, पारदर्शी स्वभाव, खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, चित्रकारिता घेऊन जीनियसमधून भेटेल, तेव्हा त्याच्यातला संगीतकार, विद्यार्थी, शिक्षक आणि त्याच्यातला प्रियकर अनुभवताना वाचकांवर तो आपला अमीट ठसा उमटवेल हे मात्र निश्‍चित!

मनोविकास प्रकाशनानं देखण्या निर्मितीचं आव्हान स्वीकारून आगाऊ बुकिंग सुरू केली आहे. आता प्रतीक्षा आहे दिवाळीत भेटणार्‍या आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणार्‍या १२ जीनियसची!

दत्ता बाळसराफ

dattab28@gmail.com