शौनक कुलकर्णी

 शौनक कुलकर्णी

मनोविकास प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये गेलो असताना अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित ७२ युगप्रवर्तक ‘जीनियस’ या मालिकेतून टप्प्याटप्प्यानं आपल्या भेटीला येणार असल्याची माहिती मला प्रकाशकांकडून समजली. ‘कॅनव्हास’ पुस्तकानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांनी वाचकांसाठी ही जीनियस भेट आणली आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

इथे भेटतोय आधुनिक विज्ञानाचा पितामह गॅलिलिओ. विज्ञान हे प्रयोगाच्या आणि निरीक्षणांच्या आधारावर उभं असलं पाहिजे, असं गॅलिलिओ म्हणे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हटल्यामुळे त्याला आयुष्यभर चर्चच्या छळाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर येणार्‍या न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून आपला दरारा आपल्या मृत्यूनंतरही अनेक शतकं टिकवून ठेवला. एक लहान मुलाच्या कुतुहलानं विश्‍वातल्या गूढ गोष्टी बघा आणि ते उकलण्याचा प्रयत्न करा असं सांगणारा न्यूटन किती विचित्र आणि विक्षिप्त होता हेही जिनियस वाचताना वाचकांना कळणार आहे. त्यानंतर नोबेलपारितोषिक विजेता आईन्स्टाईन E=MC2 चं सूत्र घेऊन  सापेक्षतावादाचा सिद्धांत सोप्या पद्धतीनं उलगडवून दाखवत वाचकांची भेट घेतो आहेच. अफाट बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईनवर आख्ख्या जगानं प्रेम का करावं हेही जीनियस आपल्याला सांगेल. सध्या इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केंब्रिज विद्यापीठात ल्यूकेशियन प्रोफेसर म्हणून मानाचं पद भूषवत असलेल्या स्टीफन हॉकिंग या वैज्ञानिकानं आपल्या असाध्य अशा अपंगत्वावर मात करून सहा वेळा डॉक्टरेट मिळवली. इतकंच नाही तर त्याचं थिऑरॉटिकल कॉस्मॉलॉजी, क्वांटम ग्रॅव्हिटी आणि ब्लॅक होल्स यांच्यावरचं संशोधन संपूर्ण जगाला चकित करणारं आहे. ‘‘आयुष्य सरळ, साधं आणि सोपं मुळीच नसतं. पण मिळालेल्या आयुष्याला सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा’’ असं हॉकिंग जीनियसमधून आपल्याला सांगतो.

कित्येक शतकं देवीसारख्या रोगानं आख्ख्या जगाला संपवण्याचा जणू काही विडा उचलला होता. लाखो/करोडो लोक या रोगामुळे मृत्यूमुखी पडत असतानाच एडवर्ड जेन्नर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं देवीवरची लस शोधून जगाला वाचवलं. त्याच्या प्रचंड योगदानामुळे १९८० साली संपूर्ण जगातून हा रोग नाहिसा झाला. त्यानंतर आलेला नोबेल पारितोषिक विजेता रॉबर्ट कॉख या जर्मन वैज्ञानिकानं कॉलरा (पटकी), अँथे्रक्स, टीबी (क्षय), सिफिलीस (गुप्तरोग) आणि घटसर्प यावर अफाट संशोधन केलं आणि अनेक विकारांवर कशा पद्धतीनं संशोधन करायचं याच्या पद्धती सुचवल्या.  आयुष्यभर मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारा रॉबर्ट कॉख माणूस म्हणूनही कसा विनम्र आणि मानवतावादी होता हे आपल्याला जीनियसच सांगेल. ‘कल्पनेची भरारी घेणं खूपच चांगलं. पण ती कल्पना कितीही अद्भभुत असली, पण कार्यशील नसली तर तिचा काहीच उपयोग नाही’ असं म्हणणारा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असलेल्या लुई पाश्‍चर यानं हवेतल्या धुळीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात हे त्यानं सिद्ध केलं. पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून ती लाळ काढून घेण्याचा आणि जिवावर बेतण्याचं महाभयंकर धाडस पाश्‍चरनं केलं आणि  कुत्र्याच्या चावण्यानं होणार्‍या रेबीजसारख्या महाभयंकर रोगावरची लस शोधली. नोबेल पारितोषिकानं गौरवलेला ऍलेक्झांडर फ्लेमिंग हाही एक महान ब्रिटिश सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ होता. खरं तर त्याच्या पेनिसिलीनच्या शोधामुळे वैद्यकशास्त्रात प्रतिजैविकांचं (अँटिबायॉटिक्सचं) युगच चालू झालं आणि अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणं शक्य झालं. ‘पेनिसिलीन निसर्गानंच तयार केलं होतं. मी फक्त ते शोधून काढलं’ असं विनमपणे म्हणणारा ‘पेनिसिलीनचा जनक’ ऍलेक्झांडर फ्लेमिंग हा जीनियसही आपल्याला इथेच भेटणार आहे.

जीनियसमध्ये भेटताहेत मेरी क्युरी आणि लीझ माइट्नर यासारख्या भौतिकशास्त्रज्ञ! दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत नोबेल पारितोषिक मिळवणारी मेरी क्युरी ही पहिलीच स्त्री होती. विश्‍वाच्या कल्याणासाठी झटणार्‍या जगावेगळ्या मेरी क्युरीनं आपल्या शोधाचं पेटंट घ्यायलाही नकार दिला होता. लीझ माइट्नर हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यांत मूलभूत संशोधन केलं. पुरुषांची टीका, समाजाकडून पदोपदी अवहेलना आणि अपमान हे सगळं सगळं सहन केलं. या दोघींची भेट वाचकाला अस्वस्थ करून सोडते. तसंच ज्याला आख्खं जग अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखतं असा असामान्य बुद्धी आणि प्रतिभा असलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, व्यासंगी विचारवंत, लॉस ऍलॅमस इथल्या मॅनहटन अणुसंशोधन प्रकल्पाचा संचालक, अणुबॉम्ब निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेला वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि  त्यानंतरच्या काळात हायड्रोजन बॉम्बला विरोध करणारा अशा अनेक रुपात जे. रॉबर्ट ओपेनहायमर आपल्याला जीनियसच्या रुपात भेटतो. जन्मानं ज्यू असला, तरी मानवता हाच धर्म मानून विज्ञानावर प्रचंड प्रेम करणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन हा खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, चित्रकारिता घेऊन जीनियसमधून समोर येणार आहे. 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून केवळ मानवजातीच्या कल्याणासाठी झटणार्‍या या महान १२ वैज्ञानिकांची आयुष्याची गोष्ट आणि त्यांचं संशोधन बघितलं तर अवाक व्हायला होतं. विद्यार्थी, पालक, शिक्षक, गृहिणी आणि कुतूहल आणि जिज्ञासा असणार्‍या प्रत्येक मानवतावादी व्यक्तीला आवडेल अशा जीनियस मालिकेच्या स्वागताची तयारी करू या.

 शौनक कुलकर्णी