माझ्या (अयशस्वी) आत्महत्त्या

माझ्या (अयशस्वी) आत्महत्त्या

'आत्महत्त्या' हा चार अक्षरी शब्द! इतरांना कदाचित भीती वाटणारा असू शकतो. पण मला हा शब्द फारच मोहक वाटतो. खून करणं एक वेळ सोपं, कारण तो दुसर्‍याचा करायचा असतो. पण आत्महत्त्या? हा खून स्वतःच स्वतःचा करायचा असतो. फारच कठीण काम!

आत्महत्त्या करणार्‍या व्यक्तींबद्दल मला पहिल्यापासूनच खूप आदर वाटत आलाय. रोजचं वर्तमानपत्र वाचायचं झालं, तरी मी पहिल्यांदा कोणी कधी आत्महत्त्या केलीये याविषयी आलेल्या बातम्या वाचते. खरं तर आत्महत्या करणार्‍या व्यक्तींची आत्महत्या करण्याची कारणं एकदमच ठरावीक आणि पांचट असतात. उदाहरणार्थ, प्रेमभंग, कर्ज, बेकारी, गृहकलह, जीवघेणा आजार वगैरे वगैरे. पण तरीही ज्या प्रकारे धाडसाने ही लोक मरणाला सामोरं जातात, त्याबद्दल त्यांना मरणोत्तर कोणतं का होईना ते चक्र द्यायला पाहिजे.

आत्महत्या करणार्‍या बहुतांशी व्यक्ती आपला हा नियोजित कार्यक्रम कधी कोणाला सांगत नाहीत. अगदी बायकासुद्धा! खरं तर बायकांच्या पोटात काही राहत नाही असं म्हणतात. पण त्या देखील आपला कार्यक्रम पार पडेपर्यंत या विषयावर कोणाशी बोलत नाहीत. काही मिळमिळीत लोक मात्र मरणापूर्वी एखादी चिठ्ठी वगैरे लिहून मरतात. पण होतं काय, या चिठ्ठीमुळे मरणार्‍याच्या मरणातलं सगळं थ्रीलच मुळी निघून जातं. चिठ्ठीतलं कारण वाचून तर सगळा फुसका बारच निघतो. त्यामुळे मरणार्‍यानं कधीच चिठ्ठी लिहून ठेवू नये. म्हणजे प्रत्येकाला मृत्यु चं कारण वेगवेगळं वाटेल. प्रत्येकजण तकर्वितर्क लढवू लागेल. अनेकजण सामूहिक चर्चा करतील. अनेकजण वाद घालतील. एकूणच काय हे मरण आणि त्याची चर्चा बरेच दिवस चालू राहील. ज्यांना जिवंतपणी नाव कमावता येत नाही, त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधीच आहे!

ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे किंवा ‘मुलाचे/मुलीचे पाय पाळण्यात दिसतात’ प्रमाणे मलाही वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीपासूनच आत्महत्या करावी वाटायला लागली होती. आत्महत्येच्या ध्येयानं मला झपाटून टाकलं होतं. पण त्याही वयात मला एक गोष्ट मात्र नक्की समजली होती. ती म्हणजे आत्महत्या करण्यासाठी माझ्याकडे कुठलंतरी ठोस कारण असणं आवश्यक होतं. आता प्रेमबिम करण्याचं माझं वय नव्हतं. तसंच नोकरीचंही वय नव्हतं. त्यामुळे प्रेमभंगानं आत्महत्या, किंवा बेकारीला कंटाळून आत्महत्या अशा कारणांसाठी मी एलिजिबल नव्हते. बरं तसं तापदायक आयुष्यात काही घडलंही नव्हतं. काही हवं असलं तर कधी लाडाने, कधी हट्ट करून तर कधी इमोशनल ब्लॅकमेल करून तर कधी चक्क भोकाड पसरून वसूल करता येत होतं. त्यामुळे या वयातला आत्महत्येचा विचार मी काही काळ बाजूला ठेवला.

त्यानंतरची सहा वर्षं मी कशी काढली, माझं मलाच माहीत. माझं दहावीचं वर्षं उजाडलं. दहावीत प्रवेश करताच इतर मुलामुलींना प्रचंड ताण येतो. मला मात्र सुरुवातीपासूनच आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरुवात झाली होती. कारण मी आत्महत्या करण्याच्या योग्य वयात आले होते! तसंच हे वयही तसं आत्महत्येला अनुकूल होतं. आता कारण शोधायला हवं होतं. पण कारणही अगदी चुटकीसरशी सापडलं. वर्षभर अभ्यास करायचा नाही. केला तरी परीक्षेत काय दिवे लागणार याची पक्की खात्री मला आणि घरातल्या सगळ्यांनाच होती. मग परीक्षेत नापास झालं की किंवा परीक्षेचा पेपर कठीण गेला की .........आपला कार्यभाग साधायचा! आत्महत्या करून टाकायची. आपला कार्यभाग कशा रीतीनं पार पाडायचं बरं, मी विचार करताच मला त्यावरही उत्तर सापडलं. साधन होतं ‘ लाईसिल’ उवानाशक केशरक्षक लायसिल! आता लायसिल उपलब्ध करणं फारसं कठीण नव्हतंच.

डोकं सारखं खाजतंय अशी आईजवळ कूरकूर करताच मातोश्रींनी हातात पन्नासची नोट ठेवली. इतर वेळी वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपास यांसारख्या महत्त्वाच्या आणि आवश्यक वस्तू आणण्यासाठीही ही बाई ‘पैसे नाहीत. पैसे काय झाडाला लागलेत’ असं म्हणून बरंच काही सुनावते. पण लायसिल म्हटलं की तिनं कुठलेही उपदेश न करता मला ताबडतोब मेडिकल स्टोअर गाठायला सांगितलं.

शुभकार्याची सुरूवात कशी विना अडथळा पार पडली होती. मला खूपच उल्हसित वाटायला लागलं. मी लगेच सायकलवर टांग मारली. आणि मेडिकल स्टोअरचा रस्ता पकडला. तिथे पोहोचताच, त्या चष्माधारक गंभीर दिसणार्‍या माणसानं माझ्या हातात एका मुलीचं चित्र असलेली शेवाळी रंगाच्या वेस्टनातली बाटली माझ्या हातात ठेवली. ती बाटली हातात पडताच अर्धी आत्महत्या पार पाडल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर झळकू लागला.

त्यानंतर आत्महत्येसाठी दिवस, वार, वेळ निश्चित करण्यासाठी मी डोकं खाजवू लागले. खरं म्हणजे चांगलं काम करण्यासाठी काळ वेळ बघायची गरज नसते म्हणतात. पण तरीही म्हटलं, नकोच. एवढे दिवस आपण कळ काढली, आता शेवटच्या क्षणी उतावळेपणा नको. माझ्या आयुष्यातला हा संस्मरणीय प्रसंग असणार होता. एखादा चांगल्यापैकी फोटो काढून ठेवणंही गरजेचं होतं. मी गेल्यानंतर भिंतीवर लटकवायला, हार घालायला शोभेसा फोटो हवाच ना. मी आईजवळ जाऊन मला एक चांगला फोटो काढायचा आहे असं सांगितलं. मात्र फोटो शब्द कानावर पडताच, ती ओरडली, 'अभ्यास करा अभ्यास. कशाला हवाय ग फोटो? महाराष्ट्रातून पहिली येणार आहेस का? फोटो बिटो काही नाही.'

मला थोडंसं वाईटच वाटलं. माझ्यासाठी नाही तर याच लोकांची पळापळ कमी करण्याचा मी विचार करत होते. माझ्या मृत्युनंतर फोटोसाठी त्यांना किती धावाधाव करावी लागली असती. पण जाऊ द्या. आपण काय काय आणि कुठे कुठे लक्ष पुरवणार? तिने लायसिलला पैसे दिले, हेच खूप झालं म्हणायचं आणि गप्प बसायचं.

आत्महत्या सोहळा साजरा करण्यासाठी खूप विचार करून मी दुपारची वेळ निश्चित केली. कारण रात्री टीव्ही बघत सगळे जागत बसणार आणि आपण त्यांच्या झोपण्याची किती वेळ वाट बघणार? त्यापेक्षा दुपारच बरी. अगदी कोणाचाही त्रास नाही.

त्या वैशिष्ट्यपूर्ण दिवशी मी सगळं काही मनासारखं करायचं ठरवलं. कारण त्यानंतरचा दिवस किंवा रात्र कोण बघणार होतं? मरण जवळ आलेलं ज्यांना म्हणे कळतं, ते फारच मिळमिळीत वागायला लागतात. मीठ नसलेल्या पदार्थासारखे! त्याग, सोशिकपणा वगेरे गोष्टी करायला लागतात. मी तसं मुळीच करायचं नाही ठरवलं. शेवटची आंघोळ म्हणून मी चांगले दोन तास साग्रसंगीत आंघोळ केली. खरं तर आंघोळ करायची गरजच नव्हती. मरायचंच तर होतं. पण म्हटलं नाही, आंघोळ न करताच मेली असं कुणी म्हणायला नको. माझ्या आंघोळीला लागणारा उशीर आणि पाण्याचा केलेला भरमसाठ वापर पाहून आई हळूहळू तारसप्तकात पोहोचली. माझ्या नावाचा ती उद्धार करू लागली. तिचा आवाज ऐकून मला जास्तच चेव चढू लागला. ते स्फूरण की काय म्हणतात तेही चढू लागलं. माझ्यावर चिडणारी, माझ्यावर ओरडणारी, माझ्यावर संतापणारी ही बाई थोडयाच वेळात माझ्यासाठी धाय मोकलून रडणार होती. अहाहा! काय दृश्य असेल ते! आपुलेचि मरण पाहिले मी डोळा........असं काहीसं मी स्वतःशीच म्हणत राहिले. आईचं बोलणं आज मी मनावर घेणारच नव्हते. काय बोलायचं ते बोल म्हणा. कारण त्या बोलण्याचा पश्चात्ताप थोड्याच वेळात तिलाच होणार होता. आंघोळ करून बाहेर येताच, मी आईला फर्मान सोडलं, 'आई, मला भूक लागली. मला टोमॅटो ऑमलेट दे ना करून.'

'मला वेळ नाही तुझं तू घे करून. लहान नाहीस आता.' असं काहीसं बोलून ती पुटपुटत तिथून निघून गेली.

त्यानंतर मी घरात हजर असलेल्या व्यक्तींना काहीना काही बोलून चिडवलं. रडवलं. मस्त धमाल केली. पुन्हा थोडीच ते माझ्या तावडीत सापडणार होते?

ठरलेल्या नियोजित वेळी मी बाबांच्या रुमचा ताबा घेतला. बाबांची रूम यासाठी की त्यांचा धाक आणि दरारा एवढा होता की ते असतानाच काय, पण नसताना देखील त्यांच्या रुममध्ये जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती. पूर्ण एकांत! कम्प्लीट प्रायव्हसी! रुममध्ये मी लायसिलची बाटली, प्यायला ग्लासभर पाणी, एक चमचा, लायसिल कडू लागल्यास थोडी खाण्यासाठी साखर अशी जय्यत तयारी करून ठेवली. तशी सगळ्यांची सकाळपासून भेट झालीच होती. फक्त बाबा दोन दिवसांपासून टुअरला गेल्यामुळे त्यांची भेट राहिली होती. पण सगळंच कसं मनासारखं होणार? काहीतरी राहणारच की.

रुममध्ये शिरताच मी दाराला आतून कडी लावली. पण लगेचच माझ्या लक्षात आलं की आपण मेल्यावर या लोकांना दार उघडता आलं नाही, तर उगाचच तोडफोड करावी लागेल. त्यापेक्षा हलक्या हातानं जराशीच कडी सरकवावी. म्हणजे दार जोरात ढकललं की ते आपोआप उघडल्या जाईल. नंतर आपल्यासाठी कोणाला मेहनत करायला नको. काय उदात्त विचार आहेत आपले. मीच माझ्यावर खुश झाले.

खुशीतच मी लायसिलच्या बाटलीचं झाकण उघडायला सुरुवात केली. पण बराच वेळ ते झाकण उघडेचना. काही वेळानं ते झाकण आटे असलेल्या रिंगसह गोल गोल फिरायला लागलं. जवळपास दहा मिनिट माझा वेळ त्यातच वाया गेला. त्यानंतरचा वेळ नेलकटर, स्व्रू ड्रायव्हर वगैरे शोधण्यात गेला. शेवटी कसंबसं एकदाचं ते झाकण उघडता आलं. चला, आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलं. आता मुख्य ‘घडी’ जवळ आली होती.

विनाकारण मला छातीत धडधडू लागलं. हाताला थरथर सुटली. हाताला सुटलेल्या थरथरीमुळे हातातली बाटली देखील हलू लागली. बाटलीतलं लायसिल सांडू नये म्हणून मी स्थिर व्हायचा प्रयत्न करू लागले. मनातल्या मनात रामरक्षाही म्हणू लागले. भीती दूर होण्यापेक्षा आपल्याला विघ्नहर्त्याची आठवण करायला पाहिजे ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी लगेच, प्रणम्ये शिरसादेवमं हे गणपतीचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आता बरंच स्थिर वाटायला लागलं होतं. वातावरणनिर्मितीसाठी मी त्यानंतर हळूच मुकेश के दर्दभरे गीत लावले. ती दुःखी गाणी ऐकून माझ्या आत्मविश्वास एकदमच वाढला. मी माझ्यावर कायम रागावणार्‍या आईचं नाव घेऊन लायसिलची बाटली तोंडाला लावली. गटागटा आवाज करत बाटली पूर्ण पिऊनच मी ती खाली ठेवली. वर चमचाभर साखरही खाल्ली.

चला आता काही सेकंदातच खेळ खल्लास! मी माझ्या मरणाची वाट बघू लागले. पण सेंकदच काय काही मिनिटं झाली तरी मला काहीच होण्याची चिन्हं दिसेनात. एवढं सगळं करूनही मी जिवंतच! हे म्हणजे अतिच झालं. पुस्तकात, गोष्टींमध्ये, टीव्ही मालिकेत, किंवा चित्रपटात विषारी औषध घेतलं की तो माणूस किंवा ती बाई कशी गळा पकडून धाडकन जमिनीवर कोसळतो किंवा कोसळते. त्यानंतर त्याच्या किंवा तिच्या तोंडाला फेस येतो आणि मग सगळा खेळ आटोपतो. पण माझ्यात मात्र अशी कुठलीच लक्षणं दिसेनात. आता वाट तरी किती बघायची? काहीच वेळात मला बंद रुममध्ये गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. मग मोकळी हवा घेण्यासाठी मी रुमबाहेर पडले. हॉलमधल्या भिंतीवरच्या घड्याळात चार वाजत आले होते. तिथेच आई कुठलीशी पालेभाजी निवडत बसली होती. माझी चाहूल तिला  लागली असावी. माझ्यावर नजरही न टाकता ती म्हणाली, 'कार्टे झोप झाली असेल तर सगळ्यांसाठी चहा टाक.' विष प्यायल्यावर देखील या बाईला माझी दया येऊ नये? अशा अवस्थेत देखील तिनं मला चहा करायला सांगावा? मला ते आतून की काय म्हणतात ना तसं वाईट वाटायला लागलं.

मी आहे त्याच जागी उभी पाहून ती माझ्यावर खेकसली, 'भिंतीसारखी उभी काय राहिलीस? की कान फुटले? एक काम करायला नको, नुसतं खाणं, खेळणं आणि झोपणं. नुसती कोडगी झालीये. उद्या लग्न झालं तुझं तर तुझं काय? तुला काहीच फरक पडणार नाही. पण माझ्या नावाचा मात्र उद्धार होईल तिथं.' असं बरंच काहीतरी ती बोलत सुटली. जाऊ देत. नेहमीचंच. एवढं मनावर घेण्याचं कारण नाही. मी माझ्या जागेवरून तसूभरही हलले नाही. तसा तिचा राग जास्तच अनावर झाला आणि ती ओरडली, 'अग बहिरी झालीस का, सांगितलेलं ऐकायला येत नाही. बघतेच आज मी कशी चहा करत नाहीस ते.'

माझा होणारा छळ बघून आपण केलं (लायसिल घेऊन) ते योग्यच केलं याची खात्री पटली. पण निष्कर्ष हाती न आल्यामुळे मी गोंधळून गेले होते. त्यातच आईचा तो रणचंडिकेचा अवतार पाहून ती आपल्याला चहा करायला लावणारच हेही नक्की होतं. काहीतरी हालचाल करणं भाग होतं. मी तिच्या जवळ गेले आणि हळू आवाजात तिला म्हटलं, 'आई, मी ते लायसिल आणलं होतं ना...’ माझं पुढचं बोलणं व्हायच्या आतच ती म्हणाली, 'हे बघ, आता तू काही लहान नाहीस. चांगली १५ वर्षांची घोडी झालीस. तुझं तू रात्री झोपताना ते लायसिल डोक्याला लावून घे. कामं टाळण्यासाठी बहाणे करू नकोस सांगून ठेवते. चल, चहा टाक.’

मी नेटानं प्रयत्न करत पूर्ण वाक्यात तिला सांगितलंच, 'मी जे लायसिल आणलं होतं ना, ते पूर्ण पिऊन टाकलं.’

माझ्या या वाक्यानं तिच्या हातातली भाजी गळून पडेल, तिचा चेहरा पांढराफटक पडेल, असं चित्र मला अपेक्षित होतं. पण तिनं जराही माझ्याकडे लक्ष दिलं नाही.

आता मात्र मी चिडून बाबांच्या खोलीत ताडताड पावलं टाकीत गेले. पुरावा म्हणून तिथं असलेली रिकामी लायसिलची बाटली हातात घेतली आणि परत तिच्याजवळ येऊन ती नाचवत म्हटलं, 'हा घे पुरावा. तरीही मला सांगतेस चहा कर म्हणून?'

खरं तर मला रागावून आणखी बरंच काही बोलायचं होतं. पण त्याच क्षणी माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. घशातही मळमळून आल्यासारखं वाटू लागलं. आईचा राग येऊनही तिच्याच नावानं मी ‘आई’ करत ओरडले आणि खाली कोसळले.

जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मी कॉटवर आणि माझ्या सभोवती गोलाकार आई, बाबा, डॉक्टर, भाऊ, मैत्रिणी असे सगळे उभे होते. मी डोळे उघडलेले बघताच सगळ्यांनी एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि जो तो आपापल्या कामाला लागला.

कथा, कादंबर्‍यांमध्ये अशा प्रसंगाचं किती कौतुक झालं असतं. सांत्वन करणं, समजून घेणं या पाषाणहृदयी मंडळींना कधी जमावं? सहानुभूतीपूर्वक त्यांनी नंतरही कधी माझ्याकडे बघितलं नाही. जेव्हा घरात माझ्या आत्महत्येचा विषय निघे, तेव्हा त्या विषयावरून सगळेजण माझी मनसोक्त टिंगल करत. माझी नक्कलही करत. मला अतिशय राग येई. पण काय करणार? आपलाच प्रयत्न फसला होता ना. अपयशी माणसाच्या वाट्याला अशीच वागणूक येणार. त्यात त्यांचा तो दोष काय? पहिलावहिला प्रयत्न असल्यामुळे ते पहिलंवहिलं अपयश पचवण्यात मी हळूहळू यशस्वी झाले.

त्यानंतरचे बरेच दिवस मी माझ्या ध्येयाला जरा बाजूलाच ठेवलं. अधूनमधून तसा विचार मनात डोकावत असे. आपोआपच माझे डोळे चमकू लागत. माझ्या मनातले विचार कळल्यागत आई खेकसून म्हणे, 'कसले अभद्र विचार चाललेत डोक्यात अं? जे काही करायचं ते नवर्‍याच्या घरी जाऊन करा. इथं कुठली थेरं नको.’ मीही मग विचार केला. म्हटलं ठीकय. इतके दिवस थांबलोच ना. तसे अजून काही दिवस. काय फरक पडतो? नाहीतरी माझ्या पहिल्यावहिल्या प्रयत्नांची या लोकांनी काय किंमत केली होती? या अरसिक लोकांना माझ्या कर्तृत्वाची काय जाणीव असणार आहे? जाऊ देत. आपण आपल्या हक्काच्या म्हणजेच नवर्‍याच्या घरीच पुढचा प्रयत्न करायचा.

तसा एक छोटासा प्रयत्न मी मध्येच करूनही बघितला. म्हणजे त्याचं काय झालं, प्रेमविवाहाला आपल्या घरून विरोध होणार अशी मला शंभर टक्के खात्री होती. तो विरोध झाला की आपण आपलं इप्सित साध्य करायचं असं मी ठरवलं. त्यानुसार मी माझ्या प्रेमाला घेऊन एके दिवशी सरळ घरीच आले. मला वाटलं मी घरावर जणू काही बॉम्बच टाकला आहे. आता सुतळी बॉम्बप्रमाणे मोठ्ठा आवाज होणार असं गृहीत धरून मी कानावर हातही ठेवले. डोळे घट्ट मिटून घेतले. पण कसलं काय, नुसतीच फुस फुस करत नुसती वात जळावी तसं काहीसं झालं. नाराज होण्याऐवजी ‘चला सुटलो एकदाचे’ असं म्हणत आईबाबांचे चेहरे उजळले आणि त्यांनी आमच्या प्रेमविवाहाला चक्क होकारच देऊन टाकला. (बरंच झालं ही ब्याद आता आपसूकच याच्या गळ्यात पडणार असं त्यांना वाटलं असणार.) त्यांचे चेहरे समाधानानं झळकू लागले.

........आणि माझी ही दुसरी आत्महत्या करण्यापूर्वीच रद्द झाली. पण या सगळ्यांतून माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे या अपयशी घरात माझी सुंदर इच्छा कधीही पूर्ण होणार नाही.

लग्न झाल्यावर पैशांची चणचण, नवर्‍याचा छळ, अशा गोष्टींमुळे आत्महत्या करावी म्हटलं पण तशी काही चिन्हंच दिसेनात. नवर्‍याच्या कोणा एका ब्रह्मचारी चुलत काकानं मरणापूर्वी सगळी संपत्ती आपल्या या पुतण्याच्या नावे केली आणि हे सगळं माझ्याच पायगुणानं झालं असं समजून माझ्या सासरची माणसं माझं जरा जास्तच कौडकौतुक करू लागली. वरवर मी हसत होते, मात्र मनातल्या मनात त्या नतद्रष्ट चुलत काकाच्या नावानं कडाकडा बोटं मोडत होते.

नवरा आणि सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या, हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने स्वतःला जाळून घेतले, या आणि यासारख्या बातम्या वाचून माझा जीव हळहळायचा. अशा बातम्यांमध्ये माझं नाव कधीच नाही का झळकणार या विचारानं माझा जीव कासावीस व्हायचा. मग माझं दुःखीकष्टी झालेलं मन त्या दुःखात मुकेशके, रफीके आणि आणखी कुणाकुणाके दर्दभरे गीत ऐकण्यात धन्यता मानू लागलं.

माझ्याकडल्या या जमणार्‍या दुःखी गाण्यांच्या संग्रहाकडे बघून माझ्या सासरच्या लोकांना माझं आणखीनच कौतुक वाटू लागलं. माझ्या छंदाच्या आड त्यांच्यापैकी कोणीही आलं नाही. उलट ते मला या संग्रहात भर घालण्यासाठी जास्त मदत करू लागले.

काय बरं माझी देवाकडे विशेष अशी मागणी होती? त्यानेच जन्म दिला आणि आता त्याच्याचकडे तर जायचं होतं. त्या यमाला इतके दिवस ताटकळत ठेवण्यापेक्षा किती पटकन मी त्याच्या यादीतलं माझं नाव कमी करण्याच्या मूडमध्ये होते. ‘जळो जिणे लाजीरवाणे’ स्वतःलाच मी दूषणं देत राहायची.

माझ्या या विचारी मुद्रेकडे बघणार्‍या माझ्या सासरच्या मंडळींना मी जास्तच बुद्धिमान वाटत असे. मी कोणी थोर विचारवंत असल्याचाही भास त्यांना होत असे. मग माझी तंद्री भंग होणार नाही याचीही ते काळजी घेत.

मी विचार करू लागले. माझी पहिली आत्महत्या आणि आता मी करणार असलेली भावी आत्महत्या यात बरंच अंतर तयार झालं होतं. सातत्या हवं कुठल्याही कामात. कामात सातत्य, नियमितपणा नसला की कुठल्याही कामाचे तीनतेरा वाजणारच. आपली चिकाटी, नियमितपणा आणि सातत्य कमी पडतंय की काय? आपल्याला जे काही करायचंय त्यासाठी आलतूफालतू कारणांची गरजच काय? नाहीतरी आपण शेवटची चिठ्ठी लिहिणारच नाही. त्यामुळे तशीही आपल्या जाण्याची चर्चा होईलच की. खरंच आम खानेसे मतलब, पेड गिननेसे नही. आत्महत्या करनेसे मतलब, कारण हो या ना हो. क्या?

चला करून टाकू या. या फायनल विचारांनी मला परत नव्यानं उत्साह आला. जवळ जवळ पाच ते सहा वर्षांनी मी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार होते. तेव्हा मी जरा लहान होते आणि माझे प्रयत्नही जरा कमी पडले होते. आता मात्र मी वयाने आणि अनुभवाने परिपक्व झालेय असं म्हणत मी माझ्यातला आत्मविश्वास जागा केला.

काय करावं बाई? डोक्याला ताण देण्याची वेळ तशी  आलीच नाही. कारण रोजच्या वर्तमानपत्रात दोन-तीन तरी आत्महत्येच्या बातम्या असतातच. मी वर्तमानपत्र उघडलं. बातमी होती, अमूक तमूकची गळफास घेऊन आत्महत्या. चला, गळफास खाली अंडरलाईन करून मी आत्महत्येचा प्रकार निश्चित केला. खर्चीक काम नाही. एक नायलॉनची दोरी, साडी किंवा अगदी ओढणी देखील चालते या प्रकारात. त्या लायसिलसारखं भेसळीचं काम नाही इथे. हे मात्र बरंच झालं. जाता जाता खर्च केल्याची चुटपूट देखील मनाला लागणार नाही.

दिवस आणि वेळ निश्चित करून मी कामाला लागले. पण लगेच माझ्या लक्षात आलं की आपल्या उद्दिष्टप्राप्तीसाठी दिवसाची वेळ योग्य नाही. दिवसा हे काम पार पाडणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. उठायच्या आतच पेपरवाला येणार. नंतर दूधवाला, त्यानंतर कामवाली, नंतर इाीवाला, भाजीवाली, गॅसवाला, कुरियरवाला, पोस्टमन, शेजारीपाजारी, कधी न येणारे नातेवाईक आणि त्यात भरीस भर म्हणून सेल्समन किंवा सेल्सगर्ल्स. ही सगळी अडथळ्यांची शर्यत कशी पार करायची?

खरं तर तसा मी प्रयत्न करूनही बघितला. पटापट कामं आटोपून दुपारच्या जेवणापूर्वीच बेत आटोपून घ्यावा असं ठरवलं. घरातले सगळे जेवायला बसले. आता अर्ध्याएक तासाची निश्चिंती होती. मी स्टूल उचलला आणि बेडरूममध्ये फॅनच्या खाली नेऊन पटकावला. चला, सेट तर छान तयार झाला. आता साडी किंवा ओढणी घ्यावी म्हणून कपाट उघडलं. हातात एक साडी घेऊन वळाले तर बघते तर काय, हातात स्टूल घेऊन नवरोजी बाहेर निघालेले. क्षणभर छातीत धस्स झालं. म्हटलं, आपला बेत कळला की काय? मी चाचरतच म्हटलं, 'अरे, हे काय करतो आहेस? तो स्टूल घेऊन कुठे चाललास? मला हवाय तो.' त्यावर नवरोजी उत्तरले, 'अग, पिंकूला आज खुर्ची नकोय. स्टूलवर बसूनच जेवायचं म्हणतोय. तू तुझ्या कामासाठी दुसरं काहीतरी घे.' नवरोजी माझ्या डोळ्यादेखत स्टूल घेऊन पसार झाले.

आता आत्महत्या करण्यासाठी स्टूलऐवजी काय घेऊ कप्पाळ. आत्महत्या करण्यासाठी फॅनखाली स्टूलच शोभून दिसतो की नाही?

एकूणच या सगळ्या मनस्ताप देणार्‍या गोष्टींमुळे मी दिवसाचा बेत रद्दच करून टाकला. रात्र झाली. या दिवसाची, नव्हे या रात्रीची मी चातकासारखी वाट पाहत होते. तसा माझा नवरा सरळ, साधा. कुठल्याही सीरियल फिरीयल न बघता रात्री दहा-साडेदहापर्यंत झोपतो. म्हटलं, चला झोपला असे. पण बेडरूममध्ये येऊन बघते तर काय, कॉटऐवजी आरामखुर्चीत बसून चक्क काहीतरी वाचत होता आणि खुदूखुदू हसतही होता. माझ्या जखमेवर जणूकाही मीठच चोळत होता.

भारतीय स्त्रीला तिचा नवरा कुठल्याही कामात साथ देत नाही म्हणतात ते हे असं. मी त्याला विचारलं, 'काय वाचतो आहेस?' तो हसतच म्हणाला, 'अग, बाळकोजीचं आत्मचरित्र.'

'अरे पण आत्मचरित्र वाचताना एवढं हसायला काय झालं? आणि आत्मचरित्र म्हणजे तरी काय रे? आपली चांगली वाईट लक्तरं वेशीलाच टांगणं नाही का?' अरेच्च्या, एवढं तात्विक बोलायची गरजच काय आपल्याला? नवीन कुठला विषय काढून चर्चा वाढवायची कशाला?

तो म्हणत होता, 'अग, या बाळकोजीनं बघ काय लिहिलंय. अग बघ बघ, भलतंच विनोदी व्यक्तिमत्व आहे बुवा.'

आणि मग माझ्या संमतीची वाटही न बघता, मला गृहीत धरून तो त्याच्या चिरचिर्‍या आवाजात मोठमोठ्यानं वाचू लागला. खिदळू लागला. मला मात्र संतापानं माझं संपूर्ण शरीर गदागदा हलतंय असा भास होऊ लागला.

जाग आली तेव्हा सकाळचे चक्क दहा वाजून गेले होते. म्हणजे? रात्रीच्या त्याच्या तारस्वरातल्या त्या अंगाईने आपण चांगलेच घोरत झोपलो म्हणायचं तर....आयुष्यातली एक महत्वाची रात्र फुकट गेली होती.

दुसर्‍या दिवशी मात्र कुठलीही रिस्क घ्यायची नाही असं मी ठरवलं. आज बेत तडीस गेलाच पाहिजे असा विचार करतेय तोवर स्वारी समोर येऊन म्हणाली, 'आज पक्याकडे पार्टी आहे. मी रात्री उशिरा घरी येईन.'

इतर वेळी पार्टी आणि उशीर या दोन शब्दांवरून मी त्याच्याशी कडाकडा भांडले असते. त्याचा रागराग केला असता. पण आता मात्र मी खुशीत हसले आणि त्याला म्हणाले, 'किती पण उशीर होऊ दे. आरामात ये. फारच उशीर झाला तर रात्री तिकडेच थांब आणि सकाळी आलास तरी चालेल.' माझं बोलणं ऐकून तो अविश्वासाने माझ्याकडे बघू लागला. तशी मी उत्तरले, 'अरे खरंच, तुला कितीही उशीर झाला तरी चालेल. मस्त एन्जॉय कर.'

तो गेला आणि मी कामाला लागले. स्टूल बेडरूममध्ये आणून ठेवला. कपाटातून आत्महत्या योग्य साडी काढून ठेवली. बेडरूमच्या सगळ्या खिडक्या आतून लावून घेतल्या. सासू, लहान दीर, यांना दूधात जायफळ घालून दिलं. आपली सून आपली कित्ती कित्ती काळजी घेते या भावनेतून त्यांनीही ते गटगट आवाज करत पिऊन टाकलं. माझा उद्देश एकच, या मंडळींना रात्रीची झोप चांगली यावी. माझ्या कार्यक्रमात उगाचच मोडता नको.

थोड्याच वेळात सगळे झोपले आहेत याची खात्री करून मी बेडरूममध्ये आले. आता काही वेळातच मी फॅनला लटकणार...अहाहा, काय दृष्य असेल ते. आपलं कित्येक दिवसांचं, नव्हे कित्येक वर्षांचं स्वप्न साकार होणार!

उद्या सगळीकडे चर्चा रंगणार. कोणी नवर्‍याला दोष देणार, तर कोणी सासूवर खापर फोडणार. जे आपल्या कुटुंबाला जवळून ओळखतात, त्यांना कुठलंच कारण सापडणार नाही. मग ते ओठाचा चंबू करून असं कसं झालं यावर आश्चर्य व्यक्त करणार. एवढ्या कमी वयात जीव गेला म्हणून काही बघे हळहळणार. वा, क्या बात है!

आता उगाच वेळ लावायचा नाही. नाहीतर नवरा लवकर पार्टी आटोपून घरी यायचा. मी स्टूलवर चढून फॅनवर साडीचा फास टाकला. गाठ बरोबर खालीवर सरकते की नाही याची खात्री करून घेतली. हो, पुन्हा नसती कटकट नको. पुन्हा थोडीशी हृदयाची धडधड वाढलीच. पण वाढणारच ना. जीव देणं काय चेष्टाय, तिथं पाहिजे हिम्मतीचे, येड्या गबाळ्याचे काम नोव्हे, बहोत पापड बेलने पडते है....असे बरेच डॉयलॉग मला सुचू लागले. पण मी मनाला आवरलं आणि प्रत्यक्ष कृती सुरू केली.

स्टूलवर चढले. साडीचा गोल फास वरमाला घातल्यासारखा गळ्यात घालून घेतला. पायाने जोरात स्टूल ढकलून दिला की झालं. काम फत्ते! मी जोरात स्टूलला रेटा दिला. पण मेला स्टूल पुढे सरकायचं नावच घेईना. किती वेळ त्यातच गेला. खरं तर आता स्टूलच्या नादी लागण्यात काही अर्थ नव्हता. मग मी स्टूल ढकलण्याचा बेत रद्द करून स्वतःच स्टूलच्या बाजूला उडी घेतली. आणि धड्डाम..........एकच मोठ्ठा आवाज झाला. कदाचित मरताना असा आवाज येत असावा. चला, आपण आता मरत आहोत. मृत्युनंतर आत्मा अमर असतो म्हणतात ते खरंच असावं. कारण मरूनही माझे विचार चालूच होते. माझा आत्मा सगळे विचार करत होता. चला, डोळे उघडून बघावं, आपलं शरीर कशा अवस्थेत आहे ते.

मी डोळे उघडले. जीव गेल्याचे, मान आवळली गेल्याची कुठलीही लक्षणं मला दिसेनात. उलट आपल्या अंगावर काहीतरी जड पडलं आहे याची जाणीव मला झाली. थोडी नजर खाली केली तर काय, मला फास बसण्याऐवजी स्लॅबच्या कडीसहित फॅन माझ्या अंगावर, मी जमिनीवर आणि स्टूल माझ्या पायांमध्ये अडकून बसलेला........मी ओरडत उठण्याचा प्रयत्न करू लागले. ठणकत्या अंकानं मी जोरजोरात हाका मारू लागले. पण माझा आवाज कोणालाही ऐकू येणं शक्यच नव्हतं. कारण मीच नाही का घरातल्या सगळ्यांना भरपूर जायफळ घालून आग्रहानं दूध पाजलं होतं. दोन तासांच्या खटपटीनंतर मी सगळ्या पसार्‍यामधून सहीसलामत बाहेर आले. माझी आवडती साडी जागोजागी फाटली होती. पुन्हा स्टूल जागेवर ठेवणं, फॅनमधून साडीचा फास सोडवणं, सगळं काही व्यवस्थित करणं ही सगळी कामं करताना माझ्या मनाला किती कष्ट झाले असतील याची कल्पना मीच करू जाणे. ही आत्महत्या पण अयशस्वी झाली होती. आपल्या नशिबी यशच नाही दुसरं काय!

मला खूप वाईट वाटू लागलं. फुटकं नशीब! मी माझ्या नशिबाला दोष देऊ लागले. लोक मेले किडामुंगीसारखे मरतात. कधी कोणाला ट्रकचा निसटता धक्का लागला की मर, कधी कोणी पोहायला गेला की बुडून मर, कधी कोणी झाडाखाली थांबला की त्याच झाडावर वीज पडून मर....आपल्या नशिबात मात्र असं मरण नसावं? इथे माझ्या फसलेल्या कार्यक्रमामुळे मला अतीव मनस्ताप झाला.

दुसर्‍या दिवशी जायफळाच्या प्रभावामुळे सगळेच जण उशिरा उठले आणि उठले तरी सगळेच सुस्तावलेले होते. त्यामुळे मलाच ठणकत्या शरीरानं आणि उदास मनानं घरातली सगळी कामं निमूटपणे करावी लागली. उशिरा केव्हातरी नवरा घरी आला. मीच मोठेपणानं 'कितीपण उशिरा ये, नाही आलास तरी चालेल' असं म्हटल्यामुळे त्याला जाबही विचारू शकत नव्हते.

नंतरचे जवळ जवळ १५ ते २० दिवस मी खिन्न अवस्थेत काढले. हळूहळू माझी मीच त्या अवस्थेतून बाहेर आले. मला एक कल्पना सुचली. खरं तर घरात हा कार्यक्रम मी करायलाच नको होता. कदाचित घरात आत्महत्या आपल्याला धार्जिण नसावी आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच आली नसावी याचं मला वाईट वाटलं. आता उगाच विषाची परीक्षा पुन्हा पाहायची नाही असं मी ठरवलं. भर रहदारीच्या रस्त्यात भरधाव येणार्‍या वाहनाखाली आत्महत्या करायची असं मी नक्की केलं. एका मिनिटांत खेळ खल्लास! सगळी साधनं दुसर्‍याची. गाडी दुसर्‍याची, रस्ताही दुसर्‍याचा - म्हणजे सार्वजनिक हो! आयती गर्दी देखील जमा होणार. कोणाला मुद्दाम निमंत्रणाची, बोलवायची गरजच नाही. सगळं कसं परस्पर होणार. वा, वा!

फार पूर्वीच ही गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी होती. ठीक आहे, देर आये दुरुस्त आये असं मी मनातल्या मनात म्हटलं. तशी या वेळी मी खूपच हळवी झाले होते. याआधीचे सगळे प्रयत्न असफल झाल्यामुळे माझी मनस्थिती बिघडणं साहजिकच होतं. आता हा शेवटचा आणि अंतिम प्रयत्न!

सतत अपयश आलं की माणूस कसा आपला आत्मविश्वास गमावतो आणि मग तो अंधश्रद्धेच्या मागे लागतो. झालेल्या घटनांमुळे मीही चांगलीच पोळले होते. त्या त्या वेळी मनानेच मुहूर्त निश्चित केल्याचा पश्चात्ताप मला होत होता. आपल्या संस्कृतीत मुहुर्ताचं महत्त्व किती मोठं आहे. डॉक्टर कठीणातलं कठीण ऑपरेशन सुरू करतात ते एखादा चांगला मुहूर्त बघूनच. एवढे मोठमोठे वैज्ञानिक, पण तेही अवकाशातल्या कसल्या कसल्या चाचण्या मुहूर्त बघूनच करतात. तसं केलं नाही तर त्या चाचण्या अयशस्वी होतात म्हणे. एवढंच कशाला नवी गाडी घेतली की, नवा कम्प्युटर घेतला की, प्रत्येकजण मुहूर्त बघून त्या वस्तूंची पूजा करतोच की. म्हणजेच या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या अखत्यारीतल्या नसून श्रद्धेच्या क्षेत्रात येतात. याच क्षेत्रात तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिषी देखील येतात. आता तर ही शास्त्रं म्हणे विद्यापीठातून रीतसर शिकवली जाणार आहेत असंही कुठंसं वाचलं होतं.

जसजसा मी विचार करू लागले, तसतसा माझा या क्षेत्रांवरचा विश्वास जास्त दृढ होऊ लागला. एखाद्या ब्राहृमणाकडे जाऊन मरणघटिका काढून आणावी असं तीव्रतेनं वाटू लागलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ब्राह्मण शुभघटिका काढून देतात, मरणघटिका नाही. आपण आपला उद्देश सांगितला तर देतील पोलिसांच्या ताब्यात. नकोच ते. त्या ब्राह्मणापेक्षा ज्योतिषी बरा. त्याला म्हणायचं, 'बाबा रे माझी जन्मपत्रिका कर आणि त्यातला वाईट काळ कुठला ते सांग. म्हणजे मला काळजी घेता येईल.' तो जेव्हा वाईट काळ सांगेल, तेव्हा तोच आपल्या आत्महत्येसाठी शुभकाळ असेल. वा, खरंच आपण किती हुशार आहोत. मनातल्या मनात मीच माझी पाठ थोपटून घेतली.

शुभस्य शिघ्रम म्हणत वर्तमानपत्रं, मासिकं यातल्या ज्योतिषांच्या जाहिराती बघायला सुरूवात केली. दोनच मिनिटांत मला डझनावारी ज्योतिषी सापडले. माझ्या आसपास जमा झालेला कागदांचा कचरा पाहून घरातल्या मंडळींना मात्र मी पीएचडी करणार असल्याचा संशय येऊ लागला. आपल्याकडे गल्लोगल्ली इतके ज्योतिषी आहेत याचा उलगडा मात्र मला पहिल्यांदाच झाला. त्या सगळ्यात डावा कोणता, उजवा कोणता असा कुठलाही भेदभाव न करता मी सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठया केल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलून तो ज्योतिषी निश्चित केला.

जाहिरातीत असलेल्या फोन नम्बरवर फोन करून मी त्या ज्योतिषाची अपॉइंटमेंटही घेतली. माझी सगळी माहिती सांगितली आणि माझी जन्मपत्रिका तयार करून मला माझा चांगला-वाईट काळ सांगा असंही आगाऊ सांगून ठेवलं. त्यानंही अत्यंत तत्परतेनं कम्प्युटरवर माझी जन्मपत्रिका तयार केली आणि मला ताबडतोब भेटायला यावं असा मेसेज केला. मीही लगेचच त्याच्या पत्त्यावर जाऊन पोहोचले. अत्यंत गोड शब्दांत मीच सांगितलेल्या माहितीच्या आधारे तो माझ्याबद्दल बोलू लागला. शब्दांची फिरवाफिरव करत माझं भविष्यही सांगू लागला. माझा वाईट काळ कोणता असं मी विचारताच तर त्याच्या उत्साहाला उधाणच आलं. तो मला येणारी साडेसाती, वक्री असलेला मंगळ, पापग्रह, राहूची महादशा, कालसर्पयोग असं बरंच काही सांगत मला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागला. मला मात्र ते सगळे प्रदोष-दोष, कोप ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तो सांगत असलेले सगळेच योग मला आपलेसे करावे वाटू लागले.

मात्र चेहर्‍यावरचा आनंद कसाबसा लपवत, चेहर्‍यावर गंभीर भाव आणत मी जास्त वाईट काळ कोणता असं विचारताच त्यानं त्याबद्दल थोडक्यात आणि उपायांबद्दल सविस्तर बोलायला सुरुवात केली. त्या विविध उपयांच्या पद्धती, त्यांचा खर्च, नारायण नागबळी असं बरंच काही तो बोलत सुटला. माझ्याकडून ते उपाय करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच त्यानं माझी सुटका केली.

खरं तर मी खूप मोठी म्हणजे जवळ जवळ अर्धी कामगिरी पार पाडली होती. घरी येताच मी एक वाईट दिवस आणि वाईट वेळ निश्चित केली. ज्या रोडवरून वाहनं जास्त जातात तो एअरपोर्ट रोड मी माझ्या कार्यक्रमासाठी नक्की केला. विमानतळावर जाण्यासाठी गाड्या कशा भरधाव वेगानं निघालेल्या असतात. त्यांना म्हणे एक एक मिनिट किमती असतो. असेना का आपल्याला आपलं काम साधायचं बस्स. विमानाच्या जाण्यायेण्याच्या वेळा देखील मी बघून ठेवल्या आणि त्याप्रमाणे दुपारी चारची वेळ मी नक्की केली.

'आज मला दुपारी काम आहे. त्यामुळे मी बाहेर जाणार आहे' असं मी घरात सकाळीच जाहीर करून टाकलं. कारण आयत्या वेळी निघाल्यावर येताना भाजी घेऊन ये, औषधं घेऊन येतेस का, पिंटूला बरोबर घेऊन जातेस का, दुधाची पिशवी आठवणीनं घेऊन ये बरं अशी कामांची यादी मागे लागू नये याची मी आगाऊ काळजीच घेतली होती म्हणा ना.

तशी घरातली माणसं समंजस असल्यामुळे त्यांनी काहीही आलतूफालतू प्रश्न विचारून मला त्रास दिला नाही आणि माझ्या नियोजित कार्यक्रमात कुठला अडथळा आणण्याचा प्रयत्नही केला नाही. कदाचित मी पीएचडीची चौकशी करण्यासाठी विद्यापीठात जात असावी असा अंदाज त्यांनी बांधला असावा. मागच्या आत्महत्येच्या वेळी मी सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, तशा आताही घेतल्या पाहिजेत असं काही केल्या मला वाटेना. तसाही वर्षानुवर्षं तेच ते चेहरे पाहून कंटाळाही आला होता. स्वर्ग खरोखरंच असेल तर जरा वेगळे चेहरे बघायला मिळतील, जरा वेगळं वातावरण नशिबी येईल आणि वेगवेगळ्या आत्म्यांशी ओळखही होईल. तेवढाच चेंज मिळेल.

खरं तर दैनंदिन कामं आटोपता आटोपता दुपार झालीच आणि बघता बघता माझी निघायची वेळही झाली. दुपारचे साडेतीन वाजले होते. पायातून स्लिप होतील अशा स्लिपर मी मुद्दाम पायात सरकवल्या. मी घराबाहेर पडले, तेव्हा माझ्या हृदयात धडधड वगैरे अजिबात होत नव्हती. कशी होणार? आता या प्रकाराला मी चांगलीच निर्ढावले होते ना. १० ते १५ मिनिटांत मी नियोजित स्थळी पोहोचले. रस्त्याच्या कडेला उभी राहून पक्षी निरीक्षणप्रमाणे मी रस्ता निरीक्षण करू लागले. तसं उन चांगलंच चटकलं होतं. प्रत्येक येणारी गाडी जिवाच्या आकांतानं धावत होती. समोरून एक ट्रक येत होता. काय मोठमोठी आणि सुंदर चाकं होती ट्रकची. एकाच ठिकाणी चक्क दोन दोन चाकं. आपल्याला ही गोष्ट माहितीच नव्हती. बे एक बे म्हणजे एकूण आठ चाकं की काय? की जास्तच? चांगली नवीकोरी दिसताहेत ही टायरवाली चाकं...ट्रकच्या समोर यायला हवं असं माझं मन सांगू लागलं. पण त्याच वेळी मला मुहूर्ताची वेळ आठवली. वेळेच्या आधी, समयसे पहले किस्मतसे ज्यादा किसीको कुछ नही मिलता वगैरे डॉयलॉग मला आठवू लागले. तोपर्यंत तो ट्रक तर निघून गेला होता.

चार वाजायला एक-दोन मिनिटं कमी असतील. नाही म्हटलं तरी किंचितसं टेन्शन मला आलंच. खूप जबाबदारीनं वागायला हवं होतं. हा कार्यक्रम फसायला नको. मी मनाला पुन्हा पुन्हा बजावलं. मुहूर्त चुकता कामा नये. एक दोन साडे माडे तीन असं म्हणत आता रस्त्याच्या मधोमध घेप घ्यायची. की खेळ खल्लास होणार. तेवढ्यात दुरून मला लाल दिव्यांच्या गाड्यांचा ताफा वेगात येताना दिसू लागला. मंत्री महोदय आपला दौरा आटोपून विमान पकडायच्या गडबडीत होते म्हणायचे. वा, बहोत बढिया. मंत्र्याच्या गाडीखाली आत्महत्या...उद्या फ्रंट पेजवर आपल्या आत्महत्येची बातमी येणार तर! या आनंदात मला आपला मुहूर्त जवळ आल्याची जाणीव झाली आणि मी विजेच्या चपळाईने रस्त्यावर झेप घेतली.

बहुतेक या वेळी यमराज माझ्यावर प्रसन्न झाले असावेत. खेळ आटोपला होता तर....किती काळ, किती तप...मी या क्षणासाठी आसुसले होते. तो ब्रह्मानंद आता मला मिळाला होता. पुराणातल्या अहिल्येचा उद्धार जसा रामाने केला, तसा माझ्या या यशस्वी आत्महत्येचा उद्धारकर्ता हा मंत्री आणि त्याची गाडी! वा, वा, क्या कहने!

मेल्यानंतर म्हणे समोर लख्ख प्रकाश दिसतो. म्हणजे ते म्हणे परमेश्वराचं दर्शन असतं. हा लखलखीत प्रकाश आपण उघड्या डोळ्यांनी बघू देखील शकत नाही. माझ्या डोळ्यासमोरही हा प्रकाश चमकत होता. डोळे मिटावेत काय? पण मेल्यावर डोळे मिटले काय अन् उघडले काय, काय फरक पडणार आहे? माझ्या दोन्ही दंडाना दोन्ही बाजूंनी जखडल्याची जाणीव मला होऊ लागली. त्या प्रकाशला चुकवून मी माझ्या दंडांकडे नजर टाकली. दोन काळ्याकुट्ट राक्षसांनी माझे दंड पकडले होते. यमराजाचे हे दोन दूत किंवा असिस्टंट असावेत बहुतेक. ‘नीट प्रामाणिकपणे ड्यूटी करा रे’ मी दरडावून बोलले. माझ्या या वाक्यानं ते दोघंही गोंधळले असावेत. माझ्या दंडावरची त्यांची पकड जरा सैल झाल्याचं मला जाणवलं. मला आश्चर्यच वाटलं कदाचित न्यू अपॉइंटमेंट असावी. आणि हे काय, स्वर्गातही बरीच प्रगती झालेली दिसत होती. या यमदुतांनी चक्क गणवेश घातले होते. तो पारंपरिक राक्षसी ड्रेस, डोक्यावरचा जिरेटोप, बसायला रेडा, सगळं काही कालबाह्य झालं की काय? मला तर हसूच फुटलं. एवढ्यात देवाची मूर्ती माझ्यासमोर आली. या देवा, अहोभाग्यम! मी आनंदाने किंचाळले. हा देवही आधुनिकच झाला होता म्हणायचा. लेदर शूज काय, रेमंडचा सफारी काय?  देवाला वाकून नमस्कार करावा का? की हातात हात घेऊन शेकहँड करावा? की सरळ ‘हाय’ असं म्हणावं? तेवढ्यात देवाचाच हात पुढे आला आणि मी शेकहँड केला. तसा देव म्हणाला, 'अग, अजूनही होती तशीच आहेस की.'

म्हणजे मेल्यावर काही बदल होतो की काय? मी स्वतःकडे एकदा निरखून बघितलं. देव आल्यामुळे ते यमदूत माझे दोन्ही हात सोडून दूर पळून गेले होते. मी बाजूला नजर टाकली. माझ्या दोन्ही बाजूला ते उभे राहून मारक्या रेड्यासारखे माझ्याकडे बघत होते. मी पुनश्च देवाकडे नजर टाकली. देवाला थँक्यू म्हटलं. देवाचं चमकतं रूप पाहावं म्हणून मान वर केली. देवाचा चेहरा मला हळूहळू ओळखीचा वाटू लागला.

तू.....मी काही बोलणार तोच देव बोलला, 'अग, मी देव, देवेन. तुझा बालमित्र. आणि इतक्या वर्षांनी कसं ग मला ओळखून माझी वाट अडवलीस? लहानपणी खेळताना जे डेअरिंग होतं, तेच डेअरिंग अजूनही तुझ्यात आहे हं.’ तो बाजूच्या गणवेषधारी राक्षसांना सांगू लागला, 'बरं का कमिशनर साहेब, ही माझी बालमैत्रीण. आम्ही हे एवढेसे असताना शेजारी शेजारी राहायचो. त्या वेळी देखील रस्त्यात गाठून ही मला मारायची. मी मात्र त्या वेळी फार रडायचो. काय आठवतंय का?'

देव गडगडाट करत हसला.

मी भानावर आले. काय झालं हे हळूहळू माझ्या लक्षात आलं. दुःखाचा एक जोरदार झटका आला. पण त्याचा काही उपयोग नव्हताच. मी आयुष्यात काहीही करू शकत नाही याची जाणीव मला पुन्हा एकदा तीव्रतेनं झाली. देवेनने आपला नियोजित विमानदौरा रद्द केला आणि तो माझ्याबरोबर माझ्या घरी आला.

माझ्याच घरी, माझ्या नवर्‍याबरोबर, माझ्या सासूबरोबर आणि माझ्या दिराबरोबर तो आमच्या लहानपणचे किस्से सांगून त्यांना हसवत होता आणि स्वतःही खिदळत होता. मी मात्र अतीव दुःखाने आतल्या आत धाय मोकलून रडत होते.

पुढचं काय सांगू?

देवेन ज्या विमानानं दिल्लीला जाणार होता, त्या विमानाचा अपघात झाला होता. मी त्याची गाडी अडवली म्हणूनच त्याचा जीव वाचला असं वृत्त सगळीकडे पसरलं होतं. त्यानंतर माझा  अनेक ठिकाणी जंगी सत्कारही करण्यात आला. त्याचा जीव वाचला म्हणून तो हसत होता आणि माझा जीव का वाचला म्हणून मी खंत करत होते, रडत होते!

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.