स्त्री शिक्षण संस्था, धुळे

स्त्री शिक्षण संस्था, धुळे

तारीख
-

९५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य करत असलेली धुळ्याची स्त्री शिक्षण संस्था यांच्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांचा आनंद साजरा करण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं. मी त्यांचं निमंत्रण दोन महिन्यांपूर्वीच अतिशय आनंदाने स्वीकारलं होतं आणि मी तिथं जावं अशी आसावरीची तीव्र इच्छा होती. नाशिकहून मी धुळ्यात पोहोचले. स्पीड ब्रेकर्सचा त्रास सोडला तर सुंदर रस्ता, मधोमध पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं, आसपास पावसाळी वातावरण आणि हिरवाई.... कधी पोहोचले कळलंच नाही.

सकाळीच शिल्पा म्हसकर, डॉ. मंदार म्हसकर आणि केतकी यांची प्रसन्न भेट झाली. मी मंदारला सिंफनी भेट दिलं. आम्ही संस्थेत पोहोचलो. संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांना भेटून, संस्थेच्या स्टाफला भेटून आणि त्यानंतर गर्दीनं फुलून गेलेल्या हॉलमध्ये मुलींना, माजी विद्यार्थिंनींना आणि कॉलेजच्या जरा मोठ्या मुलींना भेटून खरोखरंच मी माझं भान विसरून गेले. याची कारणं म्हणजे....संस्थेचा विस्तार कल्पवृक्षाप्रमाणेच झालेला दिसून आला. शिक्षणाच्या सगळ्याच शाखांना इथं स्थान होतं. कायदा असो, वा वाणिज्य शाखा, विज्ञान असो वा संगणक शाखा, इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स असो वा ड्रेस डिझायनिंग, पाककला असो वा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग....तो सगळा अफाट पसारा बघून मी थक्क झाले. संस्थेची इमारत आणि वर्गाखोल्या हवेशीर आणि ऐसपैस, परिसरातली बाग, तळ्यात उमलून आलेली जांभळी कमळाची फुलं यांनी मन तिथेच रमलं.....खरं तर ज्या वेळी संस्थेच्या परिसरात प्रवेश केला, तेव्हा संस्थेतल्या सगळ्या मैत्रिणी खूप छान नटूनथटून आलेल्या होत्या. प्रत्येकीचं टापटीप राहणं माझी नजर त्यांच्यावरून हटू देत नव्हती. त्यांच्या हालचालीतून, नजरेतून आणि हास्यातून आपुलकी जाणवत होती.

संस्थेचं प्रदर्शन बघत बघत आम्ही हॉलमध्ये पोहोचलो. बालवर्गातल्या मुलींपासून ते माध्यमिक शाळेच्या मुलींपर्यंत आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींपासून ते माजी विद्यार्थिंनींपर्यंत सगळ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हे कार्यक्रम म्हणजे आजकाल अनेक चॅनेलवर पाहतो तसे हिडीस प्रकारचे डान्स नव्हते. तर लोकगीतं, शेतकर्‍यांचे प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, योगाचं महत्व, देशप्रेम, राष्ट्रीय सण अशा विषयांवरची गाणी आणि नृत्य बघायला मिळालं. या मुलींनी, त्यांच्या शिक्षिकांनी घेतलेले परिश्रम बघून मी तर थक्क झाले. शिक्षिका आणि प्राध्यापिका यांनी कार्यक्रमाची सुरुवात 'नांदी'ने केली. योगाच्या मुली तर मला स्पायडर मॅन असल्याचा भास झाला. त्यांच्या शरीराची लवचिकता आणि चपळाई बघून मी स्तिमित झाले. वारीवर आधारित झालेल्या नृत्यानं भक्तिसंप्रदाय प्रत्यक्ष समोर उभा राहिला.

लहानपणी अनेकदा ऐकलेलं, 'किलबिल किलबिल पक्षी बोलती' या गाण्यावरचं नृत्य पाहून, त्या चिमुकल्या पर्‍यांसारख्या दिसणार्‍या मुलींचे गुलाबी गुलाबी फ्रॉक बघून मीही माझ्या लहानपणात पोहोचले आणि ते गाणं काही वेळ अक्षरशः जगले. दिवाळी असो वा ऋषीपंचमी, सणांचं महत्व आणि तो आनंद बालवर्गाच्या मुलींनी आपल्या नृत्यातून टिपला होता. समोरचा जोडीदार चुकला तर त्याला लाईनवर (वठणीवर) आणायचं काम नृत्य करत करत या चिमुकल्या सहजपणे करत होत्या. 'बहोत खुब', असं मी शंभर वेळा मनात म्हटलं असेल. निबंध आणि वर्क्तृत्व स्पर्धांची पारितोषिकंही या वेळी प्रदान करण्यात आली. माजी विद्यार्थिंनींची मनोगतं या वेळी सादर झाली. चार चार पिढ्या या संस्थेत शिकल्या होत्या. संस्थेविषयीची प्रत्येकीची आदराची आणि कृतज्ञतेची भावना त्यांच्या शब्दांमधून आणि चेहर्‍यामधून ओसंडून वाहत होती. संस्थेनं त्यांना प्रत्येकीला सुरेखशी भेटही दिली. मला शाळेतल्या मुलींसमोर सकाळच्या सत्रात बोलायचं होतं आणि दुपारच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींशी संवाद साधायचा होता.

सकाळी विंदा आणि आरती प्रभू यांच्या बालकविता आणि राजीव तांबेची टँकरची गोष्ट आणि नयननं सांगितलेला एक किस्सा गोष्टीरूपात मुलींना सांगितला. याच वेळी माध्यमिकच्या मुलींसाठी जगदीशचंद्र बोस आणि पिकासो त्यांच्याशी हितगुज करायला सज्ज झाले होतेच. दुपारच्या सत्रात मात्र विज्ञानाचं आयुष्यातलं स्थान सांगतानाच त्यातल्या गमतीजमती सांगितल्या. संवाद खूपच रंगला आणि शेवटाकडे जाताना मी माझं आवडतं चळवळीतलं ‘इसलिये राह संघर्ष की हम चुने, जिन्दगी आसू मे नहाई न हो’ हे गीत गायलं. पालक, माजी विद्यार्थिंनी, सद्य विद्यार्थिनी आणि संस्थाचालक सगळ्यांच्या चेहर्‍यावर माझ्याविषयीचं अपार प्रेम मला दिसलं. मला जिनं ऊर्जा दिली, जगात न डगमगता, न घाबरता चालायला शिकवलं, आत्मविश्वास दिला त्या मुंबईविषयी मी सांगत होते. माझं मूळ गाव कुठलं की माझ्या तोंडी चटकन मुंबई येतं असं मी तिथं सांगितलं. मात्र स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात, सान्निध्यात राहिल्यानं आता तुझं शिक्षण कुठे झालंय असं विचारलं, तर स्त्री शिक्षण संस्थेत असं म्हणावंसं वाटेल असंही सांगितलं.

निरोप घेताना पाय निघत नव्हता. कारण संस्थेच्या सगळ्याच जणी इतक्या प्रेमळ होत्या की त्यांनी हातात घट्ट धरून ठेवलेले हात, त्यांनी कुशीत घेऊन मायेनं केलेला स्पर्श सोडून मला निघावं वाटत नव्हतं. अलका बियाणी यांच्यातला खंबीरपणा, नेमकेपणा आणि उत्साह बघून तर खूप प्रेरणा मिळाली. अनुराधा गरूड, सुहासिनी देशपांडे, सुलभा भानगावकर, शिल्पा म्हसकर, नाबरियाजी, कल्पना मोरे, मनिषा जोशी, सीमा दिक्षित आणि सगळाच स्टाफ यांना भेटून खूप खूप समाधान मिळालं. काहींनी भेटून जीनियस मालिका आवडल्याचं सांगितलं, तर काहींनी 'आम्ही खूप जणांना जीनियस भेट देतो' असंही सांगितलं. अनेकजणी मला फेसबुकवर फॉलो करत असल्यानं त्याही आवर्जून येऊन भेटल्या. माझे लेख त्यांना आवडतात आणि आजचं माझं व्याख्यान आवडल्याचं त्यांनी सांगितलं. 'पुन्हा लवकर या' चा आग्रह केला.

परत येताना रस्त्याच्या मधोमध पुन्हा तीच गुलाबी, पिवळी फुलं भेटली. प्रत्येक फुलांमधून धुळ्यातल्या या सगळ्या मैत्रिणींचे चेहरे दिसत राहिले....त्या फुलांमधला सुगंध बरोबर घेऊन मी नाशिक गाठलं. ‘थँक्यू स्त्री शिक्षण संस्था’ असं गेस्ट हाऊसमध्ये प्रवेश करताना एकवार मनाशी म्हटलं!!!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो