‘रोजी-रोटी’ प्रकाशन समारंभ

‘रोजी-रोटी’ प्रकाशन समारंभ

तारीख
-
स्थळ
‘रोजी-रोटी’ प्रकाशन समारंभ मुंबई

आज विजय कसबे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित रोजी-रोटी या पुस्तकाचं प्रकाशन डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते संपन्न झालं. डॉ. मुणगेकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, अर्थतज्ज्ञ, भारतसरकारच्या प्लॅनिंग कमिशनचे सदस्य, कार्यकर्ते, व्‍याख्याते म्हणून आपल्याला माहिती आहेतच. पण त्यांच्याबद्दल बोलताना एक उदाहरण द्यावंसं वाटतं. विख्यात शास्त्रज्ञ लुई पाश्चर याला लोकांनी म्हटलं होतं, की तुझं  संशोधन चार भिंतीच्या आत कुठल्यातरी गोष्टीसाठी होत असेल आणि त्याचा उपयोग आम्हाला दैनंदिन जगण्यात जर होत नसेल तर तुझ्या संशोधनात आम्हाला काहीच स्वारस्य नाही. लुई पाश्चरला त्या लोकांचं म्हणणं पटलं आणि त्याने त्यांचे रोजच्या जगण्यातले प्रश्नही अभ्यासपूर्वक प्रयत्न करून संशोधनाद्वारे सोडवले. तद्वतच भारतात, महाराष्ट्रात अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञ आहेत, पण तळागाळातल्या लोकांचे प्रश्न समजून घेणारा, गाव/शहर/देश/विदेश फिरत परिस्थितीचं अवलोकन करणारा, अभ्यासू आणि जगण्याकडे कसं बघायला हवं याची दृष्टी देणारा हाडाचा कार्यकर्ता मुणगेकरांमध्ये आहे आणि त्यांची ही ओळख मला जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे विजय कसबे यांच्या पहिल्याच पुस्तकाचं प्रकाशन इतक्या मान्यवर व्‍यक्‍तीच्या हस्ते होणं हा खूप आनंदाचा क्षण होता.
रोजी-रोटी हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्घ केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. वाचक चळवळीतून गावोगाव ग्रंथांना पोहोचवणारे, वाचन संस्कृती रुजवणारे, वाढवणारे म्हणून ग्रंथालीचा नावलौकिक आहे. ग्रंथालीची धुरा आता सुदेश या आमच्या मित्राने खूप समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. 
खरं तर कोरोना - कोविड-१९ च्या विळख्यात आपण २ वर्षं जखडले गेलो होतो. खूप विदारक अनुभव आपण घेतले, बघितले, खरं तर जे कधी कल्पनेतही बघितलं नव्‍हतं असं भयानक, भयंकर चित्र वास्तवात भोगावं लागलं. कोरोनाने आपली आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडी पार विस्कटून टाकली, आपलं जगणं ठप्प करून  टाकलं आपल्या जीवलगांना आपल्यापासून हिरावून नेलं आणि एक अस्थिर वातावरण निर्माण केलं. स्थलांतर, अपघाती मृत्यू, आत्महत्या, मानसिक अनारोग्य, बेरोजगारी, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अशा सगळ्या वातावरणात स्वत:मधला आशावाद टिकवून याच काळात विजय कसबे यांनी रोजी-रोटी हे पुस्तक लिहिलं.
रोजी-रोटी पुस्तकाचे लेखक विजय कसबे आणि माझी ओळख कार्यकर्ता या नात्याने १५ वर्षांपूर्वी झाली. अतिशय मृदू आणि सौम्य व्‍यक्‍तिमत्व, तळागाळातल्या लोकांविषयी, त्यांचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असलेला हा हाडाचा कार्यकर्ता. कसबे यांचं वाचन, निरीक्षण खूप खोलवर आहे हेही मी या प्रवासात बघितलंय. 
जेव्‍हा एखादा कार्यकर्ता आपली लेखणी उचलतो, तेव्‍हा त्याला साहित्यिक वारसा किती आहे, त्याने यापूर्वी कशा पद्घतीचं लेखन केलंय, त्याची भाषा किती सौंदर्यपूर्ण आहे, हे महत्वाचं नसून काम करत असताना त्याला आलेले अनुभव, त्याची तळमळ, त्याची त्या प्रश्नाकडे/समस्येकडे पाहण्याची दृष्टी, त्याचं निरीक्षण, त्याचा अभ्यास आणि त्याने वास्तवाचा घेतलेला वेध मला महत्वाचा वाटतो आणि त्यातून जे उमटेल, निर्माण होईल ते अस्सलच असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे रोजी-रोटी हे पुस्तक म्हणजे विजय कसबे यांच्या लेखनप्रवासाची एक सुरुवात आहे, असं मी म्हणेन.
रोजी-रोटी या पुस्तकामध्ये कोरोनाच्या परिस्थितीने लेखकामधला कार्यकर्ता उद्विग्न झाला आणि तो अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेसाठीचे उपाय शोधू लागला आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. लेखकाने बेरोजगारीबरोबरच असंघटित वर्गाकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या स्थैर्याचा विचार करायचा झाल्यास रोजगाराचे नवीन मार्ग शोधावे लागतील या विचाराने व्‍यवस्थेसमोर लेखकाने काही उपाय, उपक्रम सुचवले आहेत आणि ते खरोखरच खूप स्तुत्य आहेत. खरं तर हे उपाय किंवा पर्याय युरोपीयन देशात केव्‍हाच अंमलात आणले गेले आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कम्युनिटी किचन. कोरोना काळात जेव्‍हा लोक कॉरन्टाईन होते तेव्‍हा त्यांना घरपोच डब्याची सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देणं, प्रत्येक वस्तीत आणि सोसायट्यांमध्ये रिक्षा, गाडी यांचा उपयोग करून भाजी/फळं घेऊन जाणं सुरू झालं आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. या काळात हॉटेल्स बंद असल्याने झोमॅटो, स्विगी आणि डन्जो सारख्या घरपोच पार्सलच्या सोयी मिळायला लागल्या. आता जरी जनजीवन सुरळीत होत असलं, तरी या सुविधा कायमस्वरूपी राहतील कारण लोकांना त्यातून रोजगार मिळतोय आणि इतरांच्या गरजा पूर्ण होतायत. ओला/उबेर यासारख्या चारचाकींबरोबरच दोनचाकींवरूनही प्रवासाची सोय स्वस्तात प्रवाशांसाठी उपलब्ध झाली. 
घे भरारीसारख्या फेसबुक पेजवरून छोटे छोटे व्‍यवसाय करणाऱ्यांना एक व्‍यासपीठ मिळालं आणि अर्थातच ग्राहकांना घरपोच सेवा. यात डन्जोसारख्या सुविधांबद्दल मी बोलेन. मला एखादी वस्तू पुण्यातून पर्वतीजवळून एखाद्या मैत्रिणीकडून, दुकानातून हवी असल्यास मला वेळ आणि पेट्रोल यांची व्‍यवस्था करून जावं लागायचं. पण डन्जो या सुविधेमुळे हवी ती वस्तू हव्‍या त्या ठिकाणाहून मागवता येते आणि पाठवता देखील येते. यातून वेळ वाचतो, अतिरिक्त पैसा वाचतो आणि श्रम/उर्जाही वाचते. प्रतिकूल परिस्थितीतून अनेक शोध किंवा अनेक मार्ग निघतात, ते असे.
रोजी-रोटी या पुस्तकात लेखकाने रोजगार उपलब्ध व्‍हावेत यासाठी अनेक उदाहरणं देत काय काय करता येऊ शकेल याबद्दलही लिहिलं आहे. रोजी-रोटी पुस्तक वाचताना लेखकाप्रमाणेच वाचणाराही लेखकाच्या भूमिकेत जावून विचार करू शकेल आणि तो त्याच्या कल्पकतेतून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करू शकेल हे या पुस्तकाचं यश आहे असं मी म्हणेन.
डॉ. मुणगेकरांनी बोलताना, समाजसेवा ही आज एक फॅशन झाली असल्याची खंत व्‍यक्‍त केली आणि गेली ६ दिवस रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा निषेध करत ५ लाख लोकांच्या स्थलांतराविषयी सांगितलं. या काळात १० लाख लोकांनी स्थलांतर केलं, तर २०१५ ते २०२१ या कालावधीत २३ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले. डेव्‍हलपमेंटल इकॉनॉमिक्स किंवा विकासाच्या अर्थशास्त्राविषयी बोलताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. गरिबी, विषमता, बेरोजगारी, विकासाच्या नावाखाली चाललेलं विकृतीकरण, हंगर इंडेक्स, अशा अनेक मुद्दयांना स्पर्श केला. 
रोजी-रोटी या पुस्तकाच्या समर्पक शीर्षकापासून ते कम्युनिटी किचन उद्योगांच्या महत्वाविषयी डॉ. मुणगेकर बोलले. विजय कसबे यांच्यातल्या संवेदनशीलतेमुळे कोरोनासारख्या कठीण काळातही त्यांना गरिबांचा/श्रमिकांचा विचार अस्वस्थ करत होता आणि केवळ समस्या मांडून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यावरचे उपाय देखील सांगितले आहेत. आज भारतातल्या ७० टक्के लोकांसमोर रोजी-रोटीचा प्रश्न असून तो विजय कसबेंसारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या पुस्तकामधून तो प्रश्न, परिस्थिती आणि उपाय सांगितले आहेत. आजची शिक्षणव्यवस्था आउटडेटेड असून ती जगण्यासाठी, रोजगारासाठी किती उपयुक्त ठरते या बद्दलही त्यांनी शंका व्‍यक्‍त केली. जसंजसं साक्षरतेचं प्रमाण वाढतंय, तसतशी बेरोजगारीही वाढतेय. सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे देशातल्या राज्यकर्त्यांना आर्थिक विषमता हा प्रश्न महत्वाचाच वाटत नाही. त्यामुळे ते त्यावरचे उपाय देखील शोधायचा चुकूनही प्रयत्न करणार नाहीत. 
डॉ. मुणगेकर अर्थतज्ज्ञ असले, तरी ते कोरडे आणि रूक्ष, कपाळावर आठ्या असलेले विद्वान नाहीत, तर त्यांचं साहित्यावरचं प्रेम ते बोलताना जाणवतंच, पण त्यांच्यातला मिस्कील स्वभावही अनेक उदाहरणांमधून जाणवत राहिला. त्यांनी खांडेकरांपासून शेक्सपिअरच्या हॅम्लेटपर्यंतची अनेक उदाहरणं देत त्यांनी गरिबी, बेरोजगारी आणि उपाय अशा मुद्दयांना स्पर्श केला. इतकंच काय, पण कम्युनिटी किचनबद्दल बोलताना त्यांना टपरीवरचा चहा, बटाटेवडे आणि कांदाभजीही आठवली. ते पदार्थ खाताना आपल्याला नंतर होणाऱ्या शारीरिक त्रासापेक्षा मिळणारं मानसिक समाधान महत्त्वाचं वाटतं असं ते म्हणाले.
ग्रंथालीच्या सुदेश इंग्लासपूरकर यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यानंतर रोजी-रोटीचे लेखक/कार्यकर्ते विजय कसबे यांनी आपल्या मनोगतात कोरोनाच्या कालावधीत हे पुस्तक लिहिलं, ते वातावरण, ती परिस्थिती आणि त्यातून रोजी-रोटीच्या प्रश्नांनी घेतलेलं गंभीर रूप मांडत कम्युनिटी किचनसारखे उपक्रम सरकारने कसे राबवले पाहिजे  याविषयी सांगितलं.
रोजी-रोटी ही पुस्तिका छोटेखानी असली तरी तिला तितकंच सुंदर आणि सुबक बनवण्याचं काम ग्रंथालीने केलंय. रेणुका माडीवाले या माझ्या चित्रकार मैत्रिणीने अतिशय समर्पक आणि स्थलांतरितांची वेदना दर्शवणारं मुखपृष्ठ तयार केलं. कार्यक्रमाचं अत्यंत नेटकेपणाने सूत्रसंचालन करणारी अस्मिता पांडे ही हुशार, प्रसन्न व्‍यक्तिमत्वाची असून तिने नारायण सुर्वेच्या भाकरीच्या चंद्राचा उल्लेख करत कार्यक्रम संपन्न झाल्याचं सांगितलं.
आजचा कार्यक्रम माझ्यासाठी संस्मरणीय ठरला, कारण पुस्तकाला मी दिलेल्या प्रस्तावनेची प्रशंसा डॉ. भालचंद्र मुणगेकरांसारख्या एका दिग्गज अर्थशास्त्रज्ञाकडून व्‍हावी यापेक्षा अधिक काय हवं? (मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात मी पुण्याहून ऑनलाईन सहभागी झाले होते!)
प्रशंसेमुळे वजनात ५ किलोची वाढ झालेली,
दीपा देशमुख, पुणे.
(पुस्तक खरेदीसाठी WhatsApp Number : 9004949656)

कार्यक्रमाचे फोटो