दिवाळीत दाखल होणार्‍या १२ जीनियसचे लेखक काय म्हणताहेत?

दिवाळीत दाखल होणार्‍या १२ जीनियसचे लेखक काय म्हणताहेत?

खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून मनात घोळत होता. या संदर्भातले तीन प्रकल्प आमच्या मनात होते आणि आहेत. लवकरच बाकी दोनही प्रकल्प वाचकांसमोर येतील. यातला पहिला प्रकल्प म्हणजे असे जीनियस की ज्यांनी जग बदलवलं. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, समाज/राज्यशास्त्र, व्यवस्थापन, संगीत, साहित्य, चित्र/शिल्पकला अशा अनेक क्षेत्रातले ७२ जगातले युगप्रवर्तक जीनियस आम्ही निवडले. त्यापैकी १२ जीनियस वैज्ञानिकांचा संच यंदाच्या दिवाळीत प्रत्येकी ६०-७० पानी १२ पुस्तकांच्या संचात आपल्यासमोर येतोय. असेच १२-१२ जीनियस दरवर्षी १ किंवा २ संच या दरानं वाचकांसमोर आम्ही सादर करूच. दुसर्‍या प्रकल्पात अशी पुस्तकं की ज्यांनी जग बदलवलं आणि तिसरा प्रकल्प ज्या संकल्पनांनी जग बदलवलं.

'कॅनव्हास’ या चित्र-शिल्प विषयावरच्या ग्रंथानंतर आम्ही ‘जीनियस’ प्रकल्पावर काम करायचं ठरवलं. विश्‍वाच्या निर्मितीबद्दल भाष्य करणारे, सूक्ष्मजंतूंच्या जगात जाऊन पोहोचणारे आणि लाखो/करोडो लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाढवणारे, अणुबॉम्बच्या निर्मितीत सहभागी असणारे असे  गॅलिलिओपासून ते फाईनमनपर्यंत १२ वैज्ञानिक आम्ही निवडले. या वैज्ञानिकांची शोधक दृष्टी आणि त्यांनी संशोधनासाठी घेतलेला ध्यास आम्हाला अचंबित करून गेला. अपुरी साधनसामग्री आणि प्रतिकूल सामाजिक परिस्थिती असतानाही त्यांनी कच न खाता आपली दमदार पावलं पुढेच टाकली. अनेक वेळा प्रयत्न फसले तरी मार्ग बदलला नाही. छी-थू झाली, जिवलगांचे मृत्यू झाले, अपमान झाले तरीही त्यांनी हार पत्करली नाही. हे सगळं आम्हाला स्तिमित करून गेलं.

इथे भेटतोय पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हटल्यामुळे आयुष्यभर चर्चच्या छळाला सामोरं जावं लागणारा गॅलिलिओ! त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा लावून जगभर आपला दबदबा निर्माण करणारा न्यूटन किती विचित्र, विक्षिप्त होता हेही जिनियस सांगणार आहे. त्यानंतर E=MC2  चं समीकरण घेऊन  सापेक्षतावादाचा सिद्धांत सोप्या पद्धतीनं उलगडवून आईन्स्टाईनवर आख्ख्या जगानं प्रेम का करावं हेही जीनियस आपल्याला सांगेल. आपल्या असाध्य अशा अपंगत्वावर मात करून आपल्या संशोधनानं संपूर्ण जगाला चकित करणारा स्टीफन हॉकिंगही आपल्याशी संवाद साधणार आहे. कित्येक शतकं देवीसारख्या रोगानं लाखो/करोडो मृत्यूमुखी पडणार्‍या लोकांना वाचवणारा एडवर्ड जेन्नर इथेच भेटणार आहे. कॉलरा, अँथे्रक्स, टीबी, सिफिलीस आणि घटसर्प यावर अफाट संशोधन करणारा विनम्र रॉबर्ट कॉख हा जर्मन वैज्ञानिक आपली भेट घेणार आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून ती लाळ काढून घेत आपला जीव धोक्यात टाकून रेबीजसारखी लस शोधणारा लुई पाश्‍चर आपल्याशी गप्पा मारणार आहे. नोबेल पारितोषिकानं गौरवलेला ब्रिटिश सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ ऍलेक्झांडर फ्लेमिंग हा जीनियसही आपल्याला पेनिसिलीनच्या शोधाची गोष्ट सांगणार आहे. जीनियसमध्ये वाचकाला अस्वस्थ आणि स्तिमित करणार आहेत मेरी क्युरी आणि लीझ माइट्नर या भौतिकशास्त्रज्ञ! अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखला जाणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर हाही आपल्याला हायड्रोजन बॉम्बला विरोध करत आपल्याशी हितगुज करणार आहे. मानवता हाच धर्म मानणारा रिचर्ड फाईनमन आपल्याला विज्ञानावर प्रेम कसं करावं हे सांगणार आहे.

जीनियस ही मालिका अतिशय सोप्या, साध्या, सुलभ, अभ्यासपूर्ण तरीही रंजक आणि रसाळ पद्धतीनं लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही मालिका विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, उद्योजक आणि इतर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. लिहिता लिहिता आम्ही केवळ माध्यम झालो कारण या १२ ही वैज्ञानिकांचं आयुष्य आणि त्यांनी लावलेले शोध यांची गोष्ट इतकी विलक्षण होती की आमचं ते श्रेय कसलं, आम्ही केवळ लोकांसमोर ते आणतो आहोत इतकंच!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.