द डिसायपल - नितांत सुंदर अनुभव

द डिसायपल - नितांत सुंदर अनुभव

नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘द डिसायपल’ हा चैतन्य ताम्हाणे लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट काल रात्रीच बघितला. ‘कोर्ट’नंतरचा त्याचा हा चित्रपट. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या चित्रपटात आहे. खरं तर या चित्रपटाचं कथानक सांगण्यापेक्षा चित्रपट बघून तो अनुभवण्यासारखा जास्त आहे. यात गुरू-शिष्याचं नातं, संगीताचं घराणं, संगीत परंपरा, आजचं बदलत चाललेलं जग, कला आणि कलाकार यांची होणारी फरफट, मनातली आंदोलनं, अनेक गोष्टी चित्रपट बघताना जाणवत राहतात. त्या कुठेही ठळकपणे किंवा बटबटीत पणे समोर येत नाहीत, तर अतिशय सहजगत्या आणि जसं आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडतील तशाच घडत राहतात. म्हणजे हिंदी चित्रपटात जसं एखादा सनसनाटी प्रसंग दाखवताना तितकंच जोरदार संगीत वाजवून त्या प्रसंगाची तीव्रता दाखवली जाते, तसं इथं काहीही घडत नाही. न बोलताही तो तो प्रसंग खूप काही सांगून जातो. आजच्या काळात गुरू-शिष्य नातं हरवलं आहे की काय असं वाटावं इतक्या गोष्टी आसपास दिसत राहतात. विशेषत: झटपट सगळं हवं असणारा समाज आणि त्यात गुरूचीही किंमत करणारे पालक, आपल्या मुलांना या रॅटरेसमध्ये ढकलणारे पालक यातल्या शरदच्या क्लासमधल्या एका प्रसंगातून भेटतात. पण विनायक प्रधान आणि शरद नेरूलकर ही चित्रपटातली गुरू-शिष्याची जोडी बघितली की खऱ्या नात्यावरचा विश्वास दृढ होतो. आपल्या गुरूला आदर्श मानणारा, शेवटपर्यंत त्यांच्यासाठी सगळं काही करणारा शरद इथे बघायला मिळतो. शरदचे गुरूही त्याच्या गाण्याचं परखड परीक्षण करणारे असे. मात्र हळूहळू वृध्दावस्था जगणं किती केविलवाणं करते हेही अनेक प्रसंगातून जाणवत राहतं.... हा चित्रपट फ्लॅशबॅकने अनेक गोष्टी सांगत राहतो. त्यात शरदचं लहानपण, खेळात रमलेला, पण तितकाच वडिलांबरोबर गाणं समजून घेण्याची धडपड करणारा, वडिलांचं आणि त्याचं संगीतमय नातं, वडिलांबरोबर त्यानं ऐकलेल्या अनेक मैफिली आणि गप्पा...शरदच्या वडिलांची भूमिका किरण यज्ञोपवितने उत्तमरीत्या साकारली आहे,....माई म्हणजे एका दिग्गज पण लाईमलाईटमध्ये न आलेल्या गायिका..त्यांचं गाण्याबद्दलचं स्वत:च्या अनुभवातून आलेलं तत्‍वज्ञान आणि त्याच्या ध्वनिफिती रोज ऐकणारा शरद...संगीत कसं आपल्यात मुरलं पाहिजे, ते आत्म्याच्या अनुभुतीसाठी गायलं पाहिजे याचा फिल प्रेक्षकांना येत राहतो. आपल्या गुरूच्या सहवासात आपली अस्वस्थता, गोंधळ लपवून गाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा आणि त्याच गाण्याला बरोबर घेऊन मॅच्युअर होत जाणारा शरद या चित्रपटात खूप चांगल्या रीतीनं साकारला आहे. खरं तर चैतन्यने या संपूर्ण चित्रपटात संगीताचा जो माहोल उभा केला आहे तो आपल्यातच ते संगीत भिनवूनच संपतो. चित्रपट संपला तरी बागेश्री, यमन, जौनपुरी राग आपला पिच्छा सोडत नाहीत. शरदची अस्वस्थ मनस्थिती त्याच्या गाण्यावर कसा परिणाम करत राहते...मनातला कोलाहल त्याच्या गाण्याला न्याय देऊ शकत नाही.....एकीकडे गाण्याची निर्मोही मागणी आणि दुसरीकडे स्पर्धेचा महिमा सांगणारं जग...यात बंगालची एक मुलगी इंडियन ऑयडॉलमध्ये गायला येते आणि तिचं ते साधंसुधं असणं, तिच्या गळ्यातून बाहेर पडणारा तो शुद्घ, प्रामाणिक आवाज आणि मग ही माध्यमं तिला उचलून धरतात, तिच्या मुलाखती घेतात आणि अखेर तिचं लौकिक अर्थानं टॉपला पोहोचणं आणि त्या वेळी तिच्यातलं हरवलेलं स्वत्व, प्रामाणिक मन हेही खूप सुरेखरीत्या टिपलं आहे. यात बेगडीपणाच दर्शन घडवणारा, दिशाभूल करायला लावणारा एक प्रसंग खूप चांगल्या रीतीने उभा केला आहे. समाजातले काही लोक काहीही माहीत नसताना सातत्याने कलकसाई बनून नकारात्मक विचार पसरवण्याच काम करत असतात हे या प्रसंगातून लक्षात येतं. यात माई, शरदची आई आणि अनेक पात्रं आपल्याला दिसत नाहीत तर ती संवादामधून समोर येत राहतात. माईचं पात्र तर अखेरपर्यंत शरदबरोबर रोज रात्री दादरच्या निर्मनुष्य रस्त्यावरून येताना त्याला आपल्या आवाजातून सोबत करत राहतं. हा आवाज सुमित्रा भावे यांचा असून त्या आवाजातून त्यांचं जगण्यातलं आलेलं सार, त्यांची तळमळ आणि चमको जगापासून स्वत:ला दूर ठेवणं हे सगळं उमगत राहतं. यात संवादापेक्षाही वातावरण ज्या तऱ्हेनं उभं केलं आहे, तेच संवादाचं काम करतं आणि तसं करण्यात चित्रपटाचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. या चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स असले तरी हा चित्रपट बघायला भाषेची गरजच नाही. चित्रपटातून कुठल्याही प्रकारचा संदेश सांगितलेला नाही. तरीही हा चित्रपट त्यातल्या रुजत जाणाऱ्या संगीतासारखा आपल्या मनात भिनत जातो. ‘द डिसायपल’ या चित्रपटाचं विशेष म्हणजे यातला शरदचं काम करणारा आदित्य मोडक हा नायक हा खरोखरंच एक गायक असून तो सी. ए. देखील आहे. अरूण द्रविड यांनी त्याच्या गुरूची म्हणजे विनायक प्रधान यांची भूमिका साकारली आहे. अरुण द्रविड हे देखील जयपूरच्या अतरोली घराण्याचे गायक आहेत. इतकंच नाही तर ते आयआयटी बॉम्बेचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. एमआयटीतून त्यांनी पीएचडी केली असून सध्या त्यांचं वास्तव्‍य अमेरिकेत आहे. या चित्रपटाचा निर्माता हा विवेक गोम्बर असून त्यानं यापूर्वी ‘सर’, ‘कोर्ट’ या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटानं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. हा चित्रपट अनेकांना संथ वाटण्याची शक्यता आहे, पण या चित्रपटाची ब्युटी त्यातच आहे. तर, एक रसरशीत, जगणं समृद्घ करणारा अनुभव ‘द डिसायपल’ हा चित्रपट बघून नक्‍कीच घेतला पाहिजे असं मी म्हणेन. दीपा देशमुख, पुणे. #TheDisciple

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.