पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम!
अरुणाचलम मुरुगनंथम! भारतातल्या तामिळनाडू राज्यातल्या कोईम्बतुरमधल्या अरुणाचल मुरुगनंथम या तरुणानं भारतातले २३ राज्यात आणि १०६ देशांमध्ये आपली सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन तयार केली आणि पोहोचवली आणि अतिशय स्वस्त दरात स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची सुविधा निर्माण केली. स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला. पुरेसं शिक्षण नसतानाही केवळ स्त्रियांचं दुःख न बघवलं गेल्यानं मुरुगनंथमनं एकच ध्यास घेतला, पदोपदी वाट्याला अपमान, कुचेष्टा, उपेक्षा आणि बदनामी आली. पण तो काम करतच राहिला आणि अखेर आपल्या ध्येयप्राप्तीत तो यशस्वी झाला. २०१४ साली 'टाईम' मॅगझिननं जगभरात प्रभाव टाकणार्या १०० लोकांच्या यादीत मुरुगनंथमचं नाव सामील केलं. २०१६ साली भारत सरकारनं त्याला पद्मश्री देऊन गौरवलं आणि हा पॅडमॅन भारतासाठीच नव्हे तर जगासाठी एक अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय बनला.
पॅडमॅनवरचा लोकसत्ता मध्ये आलेला लेख पूर्वीच वाचला होता. तसंच अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित ‘रक्त’ या पुस्तकातही अरुणालचम मुरुगनंथमविषयी विस्तारानं लिहिलं आहेच. तरीही आज हा विषय बोलायचं कारण म्हणजे माझी मैत्रीण आसावरी हिला कबूल केल्यानुसार आज वेस्टएंडला ‘पॅडमॅन’ बघायला दोघी गेलो. 'पॅडमॅन’ हा चित्रपट आर. बाल्की यानं दिग्दर्शित केला असून निर्मात्यांमध्ये ठळकपणे ट्विंकल खन्नाचं नाव वाचलं. पटकथा लेखनात स्वानंद किरकिरे नाव दिसलं आणि पडद्यावर अक्षय कुमार आणि राधिका आपटे जोडी बघायला मिळाली. मी लहान असताना....मीच का, प्रत्येकच मुलगी वयात येताना तिच्या मनाचा, शरीराचा जो गोंधळ उडतो तो समजून न घेतला तर मन किती किती न्यूनगंडांशी झगडत राहतं हे मी अनुभवलं आहे, आसपास बघितलं आहे. त्यातूनच माझी 'एकाक्ष' ही कथाही आकाराला आली. ती अनेक किशोरी शिबिरांमधून गटचर्चेसाठी उपयोगात आली. मानसिकच नव्हे तर शारीरिक पातळीवर देखील मासिक पाळीतले गैरसमज, रुढी, परंपरा, गोष्ट दडवून ठेवण्याकडे असलेला कल.....हे सगळं असंच असतं म्हणून नाईलाजानं स्वीकारणार्या स्त्रिया.....पुरुषांनी तर त्यात बोलायचंच नसतं हा एक आणखी मोठा गैरसमज! या सगळ्या पातळ्यांवर एक संवेदनशील पुरुष आपल्या बायकोला समजून घेत असतानाच समस्त स्त्रीजातीसाठी किती भरीव कामगिरी करतो हे या चित्रपटात बघण्यासारखं आहे.
चित्रपटाला उत्तम गती आहे. अक्षयकुमार आणि राधिका आपटे ‘वा, क्या बात है’ असं काम केलंय. सोनम कपूरनंही आपली भूमिका चांगली केलीय. या चित्रपटात लहानशा भूमिकेत ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले बघायला मिळाल्या. चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. अतिशय संवेदनशीलतेनं हाताळला आहे. खरं सांगायचं झालं तर ही एक सत्यकथा असताना चित्रपट काढताना अनेक धोके होते. मुख्य धोका हा की इतका नाजूक विषय नीट हाताळला गेला नाही तर चित्रपट कोसळण्याचा संभव होता. मात्र हा धोका पूर्णपणे टळला असून आर. बाल्की, पटकथालेखन, अभिनेते सगळेच यात उत्तम आणि उत्तम! मला हा चित्रपट खूप आवडला. अक्षयकुमार आणि राधिका आपटेवर आपण फिदा झालो! असे अनेक विषय चित्रपट माध्यमातून वारंवार समोर आले पाहिजेत. जरूर बघा.
जरूर बघा आणि जरूर बघा!
दीपा देशमुख
१४ फेब्रुवारी २०१८.
Add new comment