आपलं गंमतघर पुणे

आपलं गंमतघर पुणे

तारीख
-
स्थळ
आपलं गंमतघर पुणे

राजीव तांबे या माझ्या मित्राचा फोन आला, '७ जुलैला सकाळी ‘आपलं गंमतघर’ या उपक्रमाचं उद्घाटन करायला तुला यायचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या गमतीजमतीवर मुलांशी बोलायचं आहे.’ अर्थातच मी होकार दिला. मला मासवणचे दिवस आठवले. शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यासाठी त्या वेळी राजीव तांबे या मुलांसाठी लिखाण करणार्‍या आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेणार्‍या व्यक्तीला मी बोलावलं होतं. कितीही द्वाड, खट्याळ शिक्षक असू देत, राजीव त्याला आपल्या मिश्कील शैलीनं सरळ करत असे. एकूणच या कार्यशाळा म्हणजे सगळ्यांसाठीच एक धमाल वातावरण असे. यात शिक्षकांची बलस्थानं, उणिवा सगळं काही लक्षात येई आणि मग तिथून राजीव तांबेचं खरं काम सुरू होई. खेळातून, गाण्यातून, हसतखेळत गणित आणि विज्ञान मुलांना कसं शिकवावं याचे पाठच तो शिक्षकांना देत असे. 

मासवणनंतर विरार, मुंबई, वाशी असं करत मी पुण्यात येऊन स्थायिक झाले. अधूनमधून राजीवची भेट होत असे. त्याची बायको शुभा देखील चांगली मैत्रीण झाली. एक दोन उपक्रमाच्या वेळी तर मुंबईत डोंबिवलीत कुठे राहायचं असा प्रश्न उपस्थित झाला, त्या वेळी राजीव-शुभा यांनी त्यांच्या घरी आग्रहानं बोलावून घेतलं. शुभा बँकेत अधिकारी होती, तिनं स्वेच्छानिवृत्ती घेतली असून तिचं वाचन अफाट आहे! असो. 

तर राजीवच्या उपक्रमासाठी न जाण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. काल रात्रभर मुसळधार पाऊस आणि आजही सकाळपासून पावसानं जोर धरलेलाच....अशा वातावरणात मी अगदी वेळेवर अपूर्वकृपेनं नियोजित ठिकाणी (मयूर कॉलनी) पोहोचले. गेटजवळच योगेश ढगे आणि राजीव तांबे यांनी हसून स्वागत केलं. आम्ही दुसर्‍या मजल्यावरच्या हॉलमध्ये पोहोचलो. छान ऐसपैस हवेशीर हॉल....काही मुलं आलेली, तर काही वाटेवर....पावसामुळे निम्मी मुलं गळाली आणि निम्मी मुलं चिकाटीनं आली. राजीवनं माझी ओळख करून दिली आणि मी बोलायला सुरुवात केली. कलेचं आपल्या आयुष्यात असलेलं स्थान सांगत मायकेलअँजेलो, पिकासो आणि पॉल गोगँ या चित्रकार-शिल्पकार यांच्याविषयी गमतीजमती सांगितल्या. आपल्या रोजच्या जगण्यात कला कुठे कुठे दिसते हे सांगितलं. 

कलेकडून विज्ञानाकडे वळल्यावर लक्षात आलं, समोर बसलेली मुलं खूपच चुणचुणीत आहेत. जेवढा लहान वयोगट तेवढं माझ्यासाठी एक आव्हान असतं. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्याला बोलता येईल का, ते आपल्याला स्वीकारतील का असे अनेक प्रश्न मनात असतात. ही सगळीच मुलं-मुली कुतूहल असणारी होती, त्यांना अनेक प्रश्न पडले होते. साबणाचे रंग वेगवेगळे असतात, पण मग निघणारा फेस पांढराच का असतो असे प्रश्न त्यांना पडले होते. त्यामागचं विज्ञान त्यांना समजून घ्यायचं होतं. मी सांगत असलेल्या बहुतांश शास्त्रज्ञांनी लावलेले शोध त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्या शास्त्रज्ञांविषयी आणखी गोष्टी सांगण्यात खूपच मजा आली. सोबतीला राजीव होताच. राजीव कुठल्याही वयोगटात सहज मिसळू शकतो हे त्याचं वैशिष्ट्य!

दोन-अडीच तासांचा वेळ मुलांबरोबर कसा संपला कळलंच नाही. संवाद संपल्यावर मुलांना कोण आवडला, का आवडला अशा गप्पा झाल्या. मुलांना या शास्त्रज्ञांमधली चिकाटी, चित्रकारांमधलं झपाटलेपण खूप आवडलं होतं. 
मुलांचा आणि मोठ्यांचा निरोप घेऊन मी गंमतघरातून बाहेर पडले! थँक्यू आपलं गंमतघर टीम!

दीपा देशमुख, पुणे. 
 

कार्यक्रमाचे फोटो