'व्यक्ती' चं शिबीर

'व्यक्ती' चं शिबीर

तारीख
-
स्थळ
पुणे

१७ एप्रिल ते २१ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत पुण्यात व्यक्ती नाट्यसंस्थेतर्फे धनंजय सरदेशपांडे आणि सुयश झुंझुर्के यांनी ९ ते १६ वयोगटासाठी शिबीर आयोजित केलं होतं. हे शिबीर विनामूल्य होतं. शिबिरात एकूण ६० मूलं सामील झाली होती. मी एक दिवस शिबिरात येऊन जावं असं धनूनं मला सांगितलं आणि मी होकार दिला होता. नेहमीप्रमाणेच मी चक्क विसरून गेले आणि काल २० एप्रिलला सकाळी धनूचा मेसेज आला, 'तू येणार होतीस ना, काय झालं?' मला एकदमच ओशाळल्यागत झालं आणि मी त्याला फोन लावला. फोनवरून त्याला पत्ता पाठवायला सांगितला आणि मी आज येते असं सांगितलं. 
चारला पाच मिनिटं कमी असताना मी शिबिराच्या ठिकाणी म्हणजेच पुण्यातल्या श्री श्री रविशंकर शाळेत पोहोचले. सुयश, धनू आणि शरद यांनी माझं हसून स्वागत केलं. मुलं मेकअप शिकत होती. पाचच मिनिटांत त्यांचं सत्र संपलं आणि धनूनं मला बोलावलं. अतिशय अनौपचारिक पद्धतीनं माझी ओळख करून दिली. धनू, शरद आणि मी अकरावीपासून एकाच वर्गात होतो. अनेक  नाटकांत एकत्रित कामंही केली. त्यामुळे आपल्याच मित्राकडून आपलं कौतुक ऐकताना संकोचल्यासारखं झालं. या शिबिरासाठी स्वयंसेवक म्हणून आलेल्या कार्यकर्त्याही मला दिसत होत्या. त्यांनी गुलाबाची फुलं देऊन माझं स्वागत केलं. मी आणि धनूनं मुलांसाठी सुबोध जावडेकर यांची ‘माणसांची भाषा’ या कथेचं अभिवाचन करायला सुरुवात केली. 

साधारणपणे पाच-सहा वर्षांपूर्वी सुबोध जावडेकर यांच्या ‘माणसांची भाषा’ या विज्ञानकथेचं संवादात रुपांतर करण्याचं काम मी केलं होतं. त्यांच्या कथेची मी केलेली ही तोडफोड त्यांच्या कानावरही घातली होती आणि पहिल्याच प्रयोगाला त्यांना बोलावलं होतं. आणि ते पुण्यात आमच्या कार्यक्रमाला आले. धनू आणि मी ‘माणसांची भाषा’ सादर केली. त्यानंतर आम्ही औरंगाबाद, नगर आणि पुण्यातल्या अनेक शाळांमधून, संस्थांमधून आणि शिबिरांमधून या कथेचं अभिवाचन केलं. त्यानंतर आमचं एकत्रित येणं आपापल्या व्यस्ततेमुळे थांबलं.

कालच्या शिबिरात ती संधी धनूनं पुन्हा एकदा मला दिली आणि आम्ही ‘माणसांची भाषा’ मुलांपर्यंत पोहोचवत होतो. समोर शरद तटस्थपणे निरीक्षकाचं काम करत होता. आम्ही सादर करत असलेली ही कथा तो प्रथमच ऐकत होता.  

‘माणसांची भाषा’ या कथेत सुबोध जावडेकरांनी डॉल्फिनविषयी तर सांगितलं आहेच, पण या कथेत माणसांत भिनत चाललेला स्वार्थ, लबाडी, श्रेयासाठीची धडपड तसंच प्राण्यांकडे केवळ गिनिपिग्ज म्हणून बघण्याचा दृष्टिकोन याविषयीही लिहिलेलं आहे. ही कथा उत्कंठा वाढवत, चेहर्‍यावर हासू पेरत घेऊन जाते आणि अखेर मनावर अनेक गोष्टी बिंबवून जाते. कथा वाचताना मी मुलांकडे बघत होते. मागच्या भागात बसलेली मोठी मुलं-मुली त्यांना ही कथा समजेल, पण समोरच्या ९ वर्षाच्या मुला-मुलींना ती कितपत समजेल याबद्दल मी साशंक होते. कथा संपली. 

मुलांना कथा आवडली का, असं धनूनं शिबिरार्थीना विचारलं आणि एकेकानं आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी हात वर करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे समोरची चिमुरडी, ज्यांच्याबद्दल मी साशंक झाले होते, त्यांचे हात वर होते. त्यांना गोष्टीत सांगितल्यापेक्षाही डॉल्फिनची विस्तृत माहिती होती. डॉल्फिनबद्दल सांगत सांगत त्यांनी आम्हाला देखील माणसांची ही भाषा शिकायची नाही असं स्पष्टपणे सांगितलं. कथा सर्वांपर्यंत पोहोचली होती. सुबोध जावडेकरांच्या विज्ञानकथा, इतरांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि या लिहिण्यामागचा हेतू काय असतो यावर मी मुलांशी संवाद साधला. गोष्टीत गुंफून सांगितलेलं विज्ञान किती सहजपणे मुलांपर्यंत पोहोचतं यावर बोलत असताना जगदीशचंद्र बोस यांच्याविषयी मी मुलांशी बोलत गेले. मुलंच नाही, तर सगळे कार्यकर्ते देखील ऐकताना समरस होऊन गेले. 
मी थांबले, तेव्हा आवर्जून सगळ्यांनी आपल्याला जगदीशचंद्र बोसविषयी सांगितलेल्या गोष्टी आवडल्याचं सांगितलं. श्रेयानं तर आपण आता तुमची सगळी पुस्तकं वाचणार असल्याचं जाहीर केलं. 

लहान मुलं असोत, वा तरूण, प्रौढ असोत वा वृद्ध अशा सगळ्या वयोगटांतल्या लोकांशी संवाद साधल्यानं त्यांच्या मनातली खळबळ तर समजतेच, पण आपणही अपडेट राहायला मदत होते. मी मुलांचा निरोप घेतला खरं, पण परतीच्या प्रवासात मनात एकच विचार घोळत होता, मी या मुलांएवढी असताना माझं आकलन आणि माहिती इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्याजवळ होती का, उत्तर अर्थातच नकारार्थी होतं. आई-वडिलांची सजगता, उपलब्ध तंत्रज्ञान, त्यांच्यातल्या कुतूहलाला जोपासणारी त्यांच्या अवतीभोवतीची परिस्थिती त्यामुळे ही मुलं इतकी स्मार्ट झालेली बघायला मिळत होती. 
व्यक्ती म्हणून - माणूस म्हणून घडवण्यासाठी शिबीर घेणार्‍या धनू, सुयश, शरद, अमेय आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि अशा सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा!

दीपा देशमुख, पुणे

कार्यक्रमाचे फोटो