आदर्श मराठी शाळा, दहिवडी, जिल्हा सातारा 

आदर्श मराठी शाळा, दहिवडी, जिल्हा सातारा 

तारीख
-
स्थळ
आदर्श मराठी शाळा, दहिवडी, जिल्हा सातारा 

सकाळी सकाळी एक अनोळखी कॉल आला, तिकडून आवाज आला, दीपा मॅडम, मी मगर सर बोलतोय. आपला धडा आमच्या आठवीतल्या मुलांना आहे आणि आज तो मी ऑनलाईन शिकवणार आहे. धडा शिकवल्यानंतर मुलांना सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज म्हणजे प्रत्यक्ष धड्याच्या लेखिकेची आणि मुलांची भेट. तुम्ही बोलाल का आमच्या मुलांशी? मी विचारलं, केव्हा, तर ते म्हणाले, हे काय आत्ताच, साडेनऊ वाजता. मी बरं म्हटलं आणि तयार होवून गूगलमीटला जॉईन झाले.

मनात वेगवेगळे विचार येत होते. सातार्‍या जिल्ह्यातलं दहिवडी एक छोटसं गाव, त्या गावातल्या मुलांकडे कम्प्युटर्स, स्मार्ट फोन्स, इंटरनेट या सगळ्यांची सुविधा असेल का, शिक्षक आणि मुलं यांच्यातलं कम्युनिकेशन कसं होत असेल आणि दोघांनाही ते व्यवस्थित कळत असेल का, अनेक प्रश्नांना घेवून मी मुलांशी गप्पा मारायला सज्ज झाले.

मगरसरांनी माझी ओळख करून दिली, खरं तर ती धड्याच्या माध्यमातून झालीच होती. मी मुलांशी गप्पा मारल्या. धडयाला अनुसरून अवांतर वाचनाविषयी, जगभरातले कलाकार, साहित्यिक, वैज्ञानिक आणि त्यांचा संघर्ष, त्यांचं कार्य आणि त्यातून त्यांचं घडलेलं जीवन...असं खूप काही बोलत होते....मुलांनीही मला प्रश्न विचारले, मी लिहिते कशी, प्रक्रिया.... मला काय आवडतं, माझे छंद.... माझे आदिवासी भागातले काम करतानाचे अनुभव... प्रश्नोत्तरानंतर मुलांनीच माझे आभार मानले.

मगरसरांना वाटत होतं, इतकं अचानक विचारल्यावर मी होकार देईन का नाही...पण नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते माझं कर्तव्यच आहे असं मला वाटतं. नव्या गावाची ओळख, नवीन मुलांशी ओळख आणि कला आणि विज्ञान यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान गप्पांतून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी करायचा प्रयत्न...खूप मजा आली..क्षणभर मी विसरूनच गेले, मला ती सगळी वेगवेगळ्या घरांतून, ठिकाणांहून ऑनलाईन एकत्र आलेली मुलं एकाच वर्गात एकाच शाळेतून बोलताहेत असा भास झाला. या मुलांचा फोटो शेअर करण्याची इच्छा होती, पण ते असे आज तरी विखुरलेले....कोरोनाचं संकट टळलं की प्रत्यक्ष भेटण्याचं मी कबूल केलेलं आहे.

कोरोनाच्या संकटाशी सामना करत मुलं आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत, शिकताहेत, बघून खूप बरं वाटलं. या सगळ्यांत येणार्‍या अडचणी, अडथळे किती असतील याची पूर्ण जाणीव मला आहेच, पण तरीही असे प्रसंग घडले की आशेचे किरण जास्त प्रकाशमान होत जातात.

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो