मी अंजना शिंदे

मी अंजना शिंदे

मी अंजना शिंदे
परिस्थिती कुठलीही असो, एखाद्या व्‍यक्‍तीमध्ये
इतकं सकारात्मक असण्याची ऊर्जा कशी काय असू शकते
असा प्रश्न मला पडला, ‘मी अंजना शिंदे’ हे अंजना या स्त्रीचं 
आत्मकथन वाचताना...
मध्यमवर्गीय घरात जन्म घेतल्यामुळे रोजच्या जगण्याचा
संघर्ष माझ्यासारख्या अनेकींना करावा लागत नाही, 
कुठलंही संकट आलं, अडचणी आल्या, 
तरी काही ना काही पर्याय उपलब्ध असतात, 
मात्र अंजना या मुलीला जन्मापासूनच 
परिस्थितीशी लढावं लागलं आणि
तेही ती लढली हसत हसत, हाती तलवार न घेता,
...परिश्रमाच्या जोरावर, कष्टाची शस्त्रं हाती घेऊन
शेततळ्याचं काम असो, वा मजुरी करणं असो, 
लोकांच्या घरातलं घरकाम असो, वा फूटपाथवर बसून भाजी विकणं असो
अशी कित्येक कामं लहानपणापासून ती करत आली
या कामातच लहानपण कधी आणि कसं संपलं तेही कळलं नसेल
पण त्याही वयात तिनं आपल्या चेहऱ्यावरचं हासू ढळू दिलं नाही
निराशेला जवळपास फिरकू दिलं नाही, 
कपाळावर कधी आठ्या आणल्या नाहीत....
स्वप्नं तर सगळेच बघतात, पण 
अंजनानं बघितलेली स्वप्नं तिने सत्यात उतरवली
अनेक अपमान सहन केले, अनेकदा फसवणूक झाली
तरी कधी कोणाविषयी मनात सूडभावना येऊ दिली नाही
कुठल्या नात्यांपासून कधी फारकत घेतली नाही
प्रत्येक नातं निभावताना तिचा गोतावळा
आणखी आणखी वाढतच गेला...
एक अशिक्षित मुलगी, जिला शिकायचं होतं
शाळेत जायचं होतं, स्वत:ला समृद्ध करायचं होतं
पण परिस्थितीनं तसं होऊ दिलं नाही,
मामा-मामीनं शिकवण्याचा शब्द देऊन
फक्‍त राब राब राबवून घेतलं
अशा वेळी निराश न होता अंजना पुढे चालत राहिली
काट्याकुट्यातून, खाचखळग्यांमधून....
सावित्रीची लेक बनून
पुणे शहर तिला खुणावत होतं..
औंधसारख्या भागात भाजी विकायला सुरुवात केली
अन् आपल्या कष्टातून एक एक पायरी चढत
तिनं चक्‍क बालेवाडी/औंधमध्ये आपलं 
स्वत:चं घर उभं केलं..
दोन्ही मुलांना घडवलं, सुनांनाही आईपण दिलं
अंजनाने आपल्या सुनांना आपल्या कृतीमधून
पुरोगामी असल्याचं दाखवलं, त्यांच्यावर कुठलीही
बंधनं घातली नाहीत, ड्रायव्‍हिंग असो वा
स्विमिंग, त्यांनी त्यात तरबेज व्‍हावं म्हणून
प्रोत्साहन तर दिलंच, उलट
स्वत:ही त्यांचा हात घट्ट पकडून ती अनेक गोष्टी शिकली...
अंजना, शाळेत जाऊ शकली नाही, पण 
तरीही ती लिहायला शिकली, वाचायला शिकली
इतकंच नाही तर इंग्रजी बोलायलाही शिकली
आपल्या परदेशी ग्राहकांशी ती इंग्रजीतून संवाद साधायला लागली
अंजना, संपूर्ण भारतभर फिरली, ताजमहालापासून ते वाघा बॉर्डरपर्यंत
प्रत्येक ठिकाण तिला अचंबित करून गेलं आणि तितकाच 
आनंदही देऊन गेलं...
अंजना आपल्या आयुष्यात कोणाशीही वाईट वागली नाही
इतकी निर्मळ, इतकी प्राजंल माणसं या जगात
कशी असू शकतात, याचं कोडं ती घालून गेली
अंजनाचं आत्मकथन म्हणजे, नामवंत साहित्यिकांनी
शब्दालंकारांनी सजवलेली काल्पनिक कादंबरी नाही,
की अतिशयोक्तीचं लेणं नाही...
तिच्याकडे साहित्यिक भाषा नाही, अनुभव नाही, 
अन काळीज हलवणारे, डोळ्यांतून अश्रू 
काढायला लावणारे शब्दही नाहीत, 
पण तरीही हे आत्मकथन मला खूप महत्वाचं वाटतं
कारण तिचं जगणं, तिचा प्रवास, तिचं प्रामाणिक असणं
हेच या आत्मकथनाचं मूल्य आहे...आज ती असती तर
तिला भेटून, तिच्याशी बोलून, तिच्यातोंडून
पुन्हा त्या रसाळ गोष्टी ऐकल्या असत्या,
तिचं दिलखुलास असणं अनुभवलं असतं
पण उशीर झालाय...
ज्या वेळी आयुष्याला स्थिरता आलीये,
असं वाटत असतानाच, सुख उपभोगायचे
दिवस आले असताना....
भयंकर कोरोनानं अवघ्या 
५८ व्‍या वर्षी अंजनाचा बळी घेतला...
मात्र जाताना कायम राहतील अशा 
अनेक गोष्टी ती तिच्या कुटुंबीयांना देऊन गेली...
तिचं कायम प्रसन्न असणं, तिचा कष्टाळू स्वभाव,
तिच्यातले कलागुण, सतत नवं शिकण्याचा ध्यास,
तिच्यातली सकारात्मक ऊर्जा,
बघितलेली स्वप्नं सत्यात उतरवण्याची ताकद,
माणूस म्हणून गाठलेली उंची, 
हे सगळं सगळं तिनं जाताना आपल्या पतीला, 
मुलांना, सुनांना, नातवंडांना दिलंय, 
तो वारसा घेऊन ती सारीजण
डोळ्यातल्या अश्रूंना परतवून चालताहेत
अशी अंजना, प्रत्येकाच्या घरात जन्म घेवो
तिची ताकद, तिचं बळ सगळ्यांना मिळो
तिचा प्रवास अनुभवण्यासाठी, त्या वाटांना
जाणून घेण्यासाठी, स्वत:ची मरगळ झटकून
पुन्हा ताजंतवानं होण्यासाठी, नवी स्वप्नं बघण्यासाठी
आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी
जरूर वाचा - मी अंजना शिंदे
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
(आत्मकथनातून मला अंजना शिंदेची भेट घडवल्याबद्दल हरी नरके आणि विशाल शिंदे यांची मी अत्यंत आभारी आहे.)

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.