जाने चले जाते है कहाँ दुनियासे जानेवाले....
अर्चनाची पोस्ट ‘मिस यू अनिता’ वाचली आणि हिला तिची आठवण का येतेय असं वाटून अर्चनाला फोन केला, तर ‘अनिता, आपली अनिता पगारे कोरोनानं गेली, आता ती नाही’ असं म्हणून अर्चना रडायला लागली.
अनिता पगारे! एक खंदी कार्यकर्ती...अर्चनामुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मुळे, माझी आणि तिची ओळख झाली. जास्त सहवास लाभला तो मी औरंगाबाद मध्ये केलेल्य युवती महोत्सवाच्या निमित्ताने...हा युवती महोत्सव औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात आयोजित केला होता. शहरातल्या अनेक महाविद्यालयातल्या युवतींनी त्यात सहभाग घेतला होता. या तरुणींच्या सबलीकरणासाठी मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरातल्या सामाजिक संस्थांनी सहभाग दिला होता. नाशिकची अभिव्यक्ती संस्था असेल आणि इतर अनेक.... आपापले स्टॉल लावून या सहयोगी संस्थांनी खूप सहकार्य केलं होतं. त्यात शैला लोहिया, स्नेहजा रुपवते, विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर, सुजाता बाबर, अर्चना झेंडे, जनार्दन, ललित, मनोज, सुरज भोईर, दिपाली मानकर आणि अनिता पगारे ही नावं ठळकपणे आठवताहेत...तीन दिवसांच्या या युवती मेळाव्यात दिवसाअखेरी आम्ही दिवसभराचा कामाचा आढावा घेण्यासाठी जमत असू. त्या वेळी अनिताचं सडेतोड, स्पष्ट बोलणं आठवतंय...कधी कधी तिच्या बोलण्यानं समोरचा दुखावलाही जात असे, पण तिच्या ते गावीही नसायचं. काही वेळातच ती त्याच व्यक्तीशी पुन्हा जणू काही घडलंच नाही इतकं मोकळेपणानं वागायची. मला तर त्या वेळी तिची भीतीच वाटायची. कारण तिचा दादागिरी करण्याचा स्वभाव, टॉमबॉयसारखं बोलणं, राहणं, वागणं, कुठल्याही गोष्टीत जोखीम पत्करायची तयारी....काहीच काळात मीही पूर्ण वेळ सामाजिक कामात आले आणि मग अनिताशी जास्त वेळा भेट होत गेली. अनिताची भीती नाहिशी झाली आणि तिच्याविषयी जिव्हाळा, प्रेम वाटायला लागलं...आताच्या अनिताच्या स्वभावात सौम्यपणा आला होता. तिच्याशी बोलताना तिचा बिनधास्तपणा, प्रश्नाबद्दलची तळमळ आपल्याही अंगी यावी वाटायचं. खरोखरंच ती हिरोच होती...मासवणला असताना माझं तिच्याशी नातं आणखीनच बहरलं...तिच्याशी बोलताना तिने लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर बोलताना त्यातले अनेक प्रसंग आठवून हसू यायचं, तर कधी त्या चढउतारांबद्दल वाचताना अंतर्मुख व्हायला व्हायचं. तिने सांगितलेले किस्से अशा वेळी चेहऱ्यावर हसू पेरायचे. आपल्याला जन्म घातलाय म्हणजे आपल्याला पाहिजे ते आपल्या आई-वडिलांनी दिलंच पाहिजे अशी आपली त्या कळत्या-नकळत्या वयात कशी भावना होती आणि विनायकदादा पाटील यांच्यामुळे कशी बदलली...हे ती नि:संकोचपणे सांगायची. आज विनायदादा पाटीलही नाहीत आणि त्यांची ल्येक अनिताही नाही....अनिता, अग माझ्या नाशिकला झालेल्या कार्यक्रमात तू आवर्जून आली होतीस, माझ्या व्याख्यानाचं भरभरून कौतुक केलं होतंस....आणि परवाच तर मी तुला आपल्या युवती महोत्सवाची आठवण असलेला फोटो पाठवला आणि तुला किती आनंद झाला होता.....तू पुण्याला आली की माझ्याघरीच राहायला येणार होतीस, खूप गप्पा मारू, मजा करू म्हणाली होतीस. कशी ग अचानक गेलीस?
नेमकं माझ्या भावाने मुकेशचं गाणं गावून मला पाठवलं आणि त्या गाण्याचे बोल माझं अंत:करण कापत गेलेत, माझा भाऊ गातोय, ‘जाने चले जाते है कहाँ दुनियासे जानेवाले...’
हा कोरोना आणखी किती लोकांचे बळी घेऊन शांत बसणार आहे, कुणी सांगेल का?
दीपा देशमुख, पुणे
Add new comment