ओम मणि पद्मे हूम - लेह-लडाख

ओम मणि पद्मे हूम - लेह-लडाख

ओम मणि पद्मे हूम - लेह-लडाख
प्रत्यक्ष प्रवासाच्या एक दिवस आधी डॉ. महेश गायकवाड यांच्याशी बोलून ठरलं, की आपल्याला लेह-लडाखला जायचं आहे. फारशी कुठलीही तयारी न करता, ताबडतोब बॅग भरून ठरलेल्या वेळी पुणे विमानतळावर पोहोचले. पुण्याहून दिल्ली आणि दिल्लीहून लेहला सकाळी सकाळी विमान उतरणार होतं. 
लेहला पोहोचण्यापूर्वी सगळी नजर विमानाच्या इवल्याशा खिडकीतून खालचं दृश्य बघण्यात गेली. सुरुवातीला निळंशार आकाश आणि इकडून तिकडे हळुवार फिरणारे पांढरेशुभ्र ढग दिसत होते, पण त्यानंतर हिमालयाचे अजस्त्र, असे वाळुंचे ढिगारे निपचित पडलेले दिसायला लागले. कुठेच हिरवळ नाही, पाणी नाही. आम्ही ठरलेल्या वेळी लेहच्या विमानतळावर उतरलोच नाहीत. कारण कुठलंतरी लष्कराचं विमान आधी उतरणार असल्यामुळे आमच्या वैमानिकाने अर्धा तास आकाशातच आमच्या विमानाला घिरट्या घालायला लावल्या. वर्गाबाहेर शिक्षा केल्यासारखं विमान निमूटपणे गोल गोल घिरट्या घालत राहिलं. 
हिमालयाच्या कुशीत लेहचं साधंसं विमानतळ विसावलं होतं. आम्हाला घेण्यासाठी ताशी हा गुटगुटीत व्‍यक्‍ती आपल्या स्कॉर्पियो गाडीसह आला होता. त्याने आमच्या गळ्यात पांढरे पंचे घालून आमचं स्वागत केलं. आम्ही एकदम खुश झालो. मला तर आपण बाणेर-औंध संस्थानच्या महाराणी असून आपलं लेहमध्ये जंगी स्वागत होत आहे असा फील आला. अवघ्या पाच किलोमीटर वर असलेल्या ड्रीम व्‍हिला या बंगलो टाईप होम स्टेमध्ये आम्ही प्रवेश केला. सुरेंद्र कौल आणि त्याची पत्नी या काश्मिरी पंडित् जोडप्याने आमचं स्वागत केलं. वाड्यासारखी रचना असलेला हा ड्रीम व्‍हीला होता. चहूबाजूंनी खोल्या आणि मध्ये मोठं अंगण. आम्ही नाश्ता केला की गुपचूप झोपेच्या स्वाधीन व्‍हायचं आणि जेवणाच्या वेळेला उठून जेवण करून पुनश्च न बोलता आराम करायचा असं डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितलं. त्यांचा आदेश आम्ही तंतोतंत पाळायचा ठरवलं. याचं कारण खूप उंचीवर आम्ही जात असल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी कमी होत जाणार होती आणि आम्हाला अशा वातावरणाशी जुळवून घ्यायचं होतं.
यानंतरचे आठ-दहा दिवस आम्ही रोजचं नियोजन रोज करून मनसोक्‍त फिरणार होतो. लोकांना भेटणार होतो, लडाखमधलं लोकजीवन, संस्कृती आणि निसर्ग न्याहाळणार होतो. 
लेहला आम्ही दिवसभर आराम केला. शरीर थकलेलं नसूनही सतत झोप येत होती. संध्याकाळी मात्र आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडलो. काही अंतरावर मशीद दिसत होती. निघताना कोपऱ्यावरच लेहच्या उपायुक्तांचा बंगला लागला. त्याच्यासमोर एक तलाव होता. इथूनच उंच पर्वतावर मोनेस्ट्री दिसत होती. राजवाडा दिसत होता. चालतच आम्ही लेहच्या स्थानिक बाजारात पोहोचलो. विविधरंगी वस्तूंनी बाजार सजलेला होता. लोक इकडून तिकडून मजेत फिरत होते. आमच्यातली ऋतुजा ही कॅम्प्युटर सायन्स विषयाची प्राध्यापक असून तिने आपण सर्वांनी एक दिवस सारखे टी-शर्ट घालायचे असं सांगितल्यामुळे एका दुकानातून आम्ही सगळ्यांनी लडाखचं वैशिष्ट्यं दर्शवणारी टी-शर्ट्स विकत घेतली. तिथून मग तांब्यापितळेच्या विविध वस्तू, गळ्यातल्या माळा, गरम कपडे, स्कार्फ, ड्रेसेस यांनी डोळ्यांना आणि मनाला भुरळ पाडली. मनाला ‘नो मिन्स नो’ असं बजावत मोह आवरत परत ड्रीम व्‍हीलाकडे पावलं वळवली.
पहाटे लवकरच तयार होऊन तुर्तूक या गावाकडे लेहहून आम्ही कूच केलं. गाडीचा ड्रायव्‍हर श्वांस ने गाडी सुरू करताच ‘ओम मणि पद्मे हूम’ हा एक अतिशय सुरेल असा मंत्र सुरू केला. संपूर्ण प्रवासात या एका मंत्राने आमचं मन व्‍यापलं होतं. 'ओम मणि पद्मे हूँ' हा एक बौद्ध मंत्र असून हा मंत्र तिबेटी बौद्ध धर्माचा एक भाग आहे. त्याचं गायन किंवा पठण करताना शांत आणि ध्यानपूर्ण वातावरण तयार करण्यावर जास्त लक्ष दिलं जातं. 
खरं तर मला लेह-लडाख कधीच प्रवास करायचा नव्‍हता. स्पिती व्‍हॅली करून आल्यावर हाही प्रदेश तसाच कठीण, रूक्ष, ओसाड असा पूर्वग्रह मी करून घेतला होता. स्पिती व्‍हॅलीच्या कठीण रस्त्यांनी, खोलवर दरीतून वाहणाऱ्या सिमेंटसदृश्य कळकट नदीने, आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणाऱ्या त्या हिमालयाच्या रूक्ष दर्शनाने मन नकळत घाबरून गेलं होतं. आताही स्पिती व्‍हॅलीची आठवण होत होती. एका बाजूने नदी वाहत होती, तर दुसऱ्या बाजूने हिमालयाचे वाळूचे पर्वत. बघता बघता आम्ही खरदुंगला पास या जगातल्या दुसऱ्या सर्वाधिक उंचावरच्या ठिकाणावर पोहोचलो होतो. उंचीच्या वातावरणाशी ॲक्युमलेट झाल्यामुळे आम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवत नव्‍हती. थंडी प्रचंड होती, पण अंगात थर्मल घालून कडेकोट बंदोबस्त केल्यामुळे आम्ही तिच्याशी मुकाबला करू शकत होतो. सर्वत्र अतिशय सुंदर दृश्य दिसत होतं. डोळ्यांचं पारणं फिटणं वगैरे म्हणतात तसंच काहीसं वाटत होतं. आता या उंचीवरून गाडी उताराला लागली होती. विशेष म्हणजे आता अंगातले थर्मल काढून फेकून द्यावेसे वाटत होते इतकं उकडायला लागलं होतं. बघता बघता डिस्किट हे गाव लागलं. छानसं उन्ह पडलं होतं. 
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. आसाम-मेघालयप्रमाणेच इकडेही स्त्रियांचं राज्य दिसत होतं. काउंटरवर, वेटर म्हणून सर्वत्र खंबीर चेहऱ्याच्या स्त्रियाच दिसत होत्या. अर्थात पुरूष त्यांचे मदतनीस म्हणून इकडे तिकडे वावरताना दिसत होते. जेवण करून पुन्हा रस्त्याला लागलो. काही अंतरावर असलेली भव्‍य अशी बुद्धाची बसलेली मूर्ती खुणावत होती. लेहपासून 19 किमी अंतरावर सिंधू नदीच्या काळी ही डिस्कीट मॉनेस्ट्री वसलेली असून तिबेटमधल्या पोटाला पॅलेससारखीच ती भासली. ही मॉनेस्ट्री 12 मजली असून यात अनेक स्तूप आहेत. 
हिमालयाच्या त्या वालुकामय-खडकमिश्रीत पर्वतावर जाऊन त्या बुद्धमूर्तीला डोळे भरून बघितलं. इतर बुद्धमूर्तींपेक्षा ही मूर्ती 49 फूट उंच असून लडाखमधला सर्वात मोठा बसलेला बुद्ध पुतळा आहे. हा पुतळा रंगीत आणि वेगळीच भावमुद्रा लेवून बसलेला होता. वरतून सर्वत्र सुरेख दृश्य दिसत होतं. तिथून निघायला मन करत नव्‍हतं. काही वेळ बसून आम्ही भारत-पाक सीमेवरचं शेवटचं गाव थांग इथे जाण्याचं ठरवलं.
एका बाजूला सियाचीन, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि मधल्या चिंचोळ्या भागातून आमची गाडी धावत होती. पाकिस्तान तर अवघ्या 20 किमीवर अंतर दूर होता. मात्र भारताच्या संरक्षणासाठी उंचच उंच हिमालय एका सरळ रेषीय पर्वताने सिद्ध झालेला होता. त्याचं हे कठीण रूप बघून मन अचंबित झालं. कारण इतका वेळ असणारे वाळूचे ढिगारे, चिखलमातीचे ढिगारे अशाच रुपात त्याला बघितलं होतं. इथे मात्र त्याने आपलं सौम्य रूप बाजूला ठेवून त्याने जणूकाही धारदार तळपती तलवार उपसली होती. माझ्या देशाच्या वाटेला जाल तर चिंधड्या चिंधड्या उडविन असं तो म्हणत असावा. तिथूनच श्योक नदी नेमून दिलेल्या मार्गावरून शिस्तीचं पालन करत धावत होती. हिमालयाचं हे रूप बघून हे खरं की आसाम-मेघालयामधलं त्याचं हिरवं रूपडं खरं, की स्पिती व्‍हॅलीतून दिसणारा हिमालय खरा की हा खरा असा संभ्रम मनाला सारखा पडत होता.
बघता बघता तॅक्सी गावही मागे पडलं आणि थांगमध्ये दिसणाऱ्या भारताच्या तिरंग्याने आमचं स्वागत केलं. थांग, तॅक्सी, तुर्तूक ही गावं खरं तर 31 डिसेंबर 1971 पर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात होती. तो दिवस त्यांनी पाकिस्तानी नागरिक म्हणून काढला, पण दुसरा दिवस उजाडताच ते भारताचे नागरिक बनले होते. याचं कारण भारताने बांगला देशासाठी लढलेल्या या युद्घात विजय मिळवून या गावांना भारतात आणलं होतं. इथली लोक अत्यंत शांतताप्रिय, भारतावर अलोट प्रेम करणारी, साधी माणसं. 
आम्ही तुर्तूक गावात प्रवेश करण्याआधी लष्कराच्या अनेक गाड्या दिसत होत्या. आश्चर्य म्हणजे या गाड्यांमध्ये छोटछोटी मुलं-मुली बसलेली दिसत होती. मग लक्षात आलं, इथल्या गावांमध्ये सगळीकडे भारतीय लष्कराच्या शाळा असून मुलांची ने-आण करणं हीदेखील त्यांचीच जबाबदारी आहे. लेह-लडाख या भागात हे जवान गावचे पालनहार किंवा दोस्त आहेत. या गावातली लोक भारतीय जवानांना काय हवं नको ते पोहोचवण्याचं म्हणजे रसद पोहोचवण्याचं कामही आनंदाने करतात. आपण आपल्या देशासाठी काहीतरी करतोय ही भावना त्यांना सुखावणारी वाटते. 
आमची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली, तिथे गुलाम बेग नावाचा हसऱ्या चेहऱ्याचा तरूण आमच्या स्वागताला उभा होता. त्याचं स्वागत स्वीकारून आम्ही त्याच्या मागोमाग चालू लागलो. आम्हाला एक डोंगरच चढायचा होता. ना पायऱ्या होत्या, ना गाडी जाईल असा रस्ता. दमछाक होत होत चढायला सुरुवात केली. डॉ. महेश गायकवाड यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे आपण घसरून खोलवर पडू ही भीती दूर झाली. वर पोहोचताच ‘द स्टोन पॅलेस’ नावाच्या टुमदार इमारतीने आम्हाला ‘या’ असं अगत्याने म्हटलं. या इमारतीच्या एका खिडकीवर द्राक्षाचा वेल, त्याच्याच बाजूला हिरवे टोमॅटो, मिरची, फ्लॉवर अशा भाज्यांची लागवड केलेली दिसत होती. तर दुसऱ्या बाजूला रंगिबेरंगी फुलांचे ताटवे वाऱ्याबरोबर डोलत होते. त्याच्यापाठोपाठ ‘मै हूं ना’ असं म्हणत उंचच उंच हिमालय आपलं अस्तित्व दाखवत होता, तर खाली श्योक नदी वाहत होती. तिच्या बाजूला शेतं लहरत होती. हे सगळं दृश्य बघून मन आनंदाने हरखून गेलं.
डोळ्यात सर्वत्र फुललेले जांभळट गुलाबी रंगांचे फुलांचे ताटवे साठवत झोपी गेले. सकाळी उठून तयार होउन फुलांमध्ये फिरत असतानाच ब्रेकफास्ट तयार असल्याची सूचना मिळाली. बार्ली आणि गहू यांचं पिक इथे घेतलं जातं. त्यामुळे बार्लींचा डोसा, दह्याची चटणी, कॉफी असा नाश्ता केला.
नाश्ता करताच गुलाम बेगने आम्हाला तुर्तूक गावाचा इतिहास सांगितला. लडाखच्या नुब्रा खोऱ्यात श्योक नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गाव असून त्यांच्या संस्कृतीत बौद्ध, तिबेटी आणि मुस्लिम समाजाच्या छटा दिसतात. त्याच्या म्हणण्यानुसार इथे राहणारे लोक इस्लाम धर्मीय असले, तरी त्यांच्यावर सुफी पंथाचा प्रभाव आहे. ते अतिशय साधे आणि शांतताप्रिय असून देशभक्‍त आहेत. तुर्तूक गावातले लोक मासांहार न करणारे. निसर्गाला, पर्वताला देव मानणारे. प्रत्येक घराभोवती परसबाग करणारे, स्वच्छतेला नितांत महत्व देणारे. बाल्टिस्तानचं प्रवेशद्वार म्हणजे तुर्तूक गाव असं इथले लोक मानतात. 
श्योक नदीमुळे तुर्तूक लोकांचा मुख्य व्‍यवसाय शेती असून गहू, बटाटे आणि वाटाणा ही मुख्य पिकं असून गाजर, टोमॅटो, या भाज्याही ते पिकवतात. इथला ॲप्रिकॉट खूप प्रसिद्ध आहे. इथे ड्रायफ्रूट्स आणि ॲप्रिकॉटचं तेल खूप चांगलं मिळतं. 
माहिती सांगणारा गुलाम बेग आम्हाला खूपच आवडला. त्याचा निरोप घेत आम्ही आता तुर्तूक गावातला दगडी फ्रिज बघायला जाणार होतो. इथला राजवाडा बघणार होतो. अरूंद रस्त्यातून वाट काढत् असताना ‘छ्सेर मोरे’ म्हणजे नमस्कार असं सगळे एकमेकांना म्हणत होते. थोडक्यात तुम्ही कसे आहात असं म्हणत असावेत. काहीच वेळात जे लोक भेटत ते आम्हाला ‘जुलाय, जुलाय’ असं म्हणायला लागले. ते आम्हाला नमस्कार, रामराम करत असावेत. मग आम्ही दिसेल त्याला आणि भेटेल तिला ‘जुलाय, जुलाय’ असं करायला लागलो. तेही तितक्याच आनंदाने प्रतिसाद देत होते.
गुलाम बेगने आपल्या डोक्यावर एक अतिशय सुरेख अशी पांढऱ्या रंगांची गोलाकार टोपी घातली होती. ही टोपी तुर्तूक गावाची शान होती. मलाही तशीच टोपी हवी म्हणताच ती मिळेल असं आश्वासन त्याने दिलं. 
इथलं प्राचीन असं गावातल्या मुखियाचं घर आम्ही बघितलं. या घरात प्राचीन काळातल्या वस्तू जतन करून ठेवल्या होत्या. त्यांचे गरम कपडे, शस्त्रं, स्वयंपाकाची मातीची भांडी, चूल, पायातले बूट असं सर्वकाही. एका वेगळ्या जगात गेल्याचा तो अनुभव होता. तिथूनच गावचा इतिहास सांगणारं एक म्युझियमही बघितलं. त्यानंतर आलं ते कोल्ड स्टोरेज किंवा दगडी फ्रिजची वास्तू. ही एक मोठा पोकळ दगड किंवा दगडांच्या थरांनी बांधलेली खोली होती. या वास्तूत प्रवेश करताच रेफ्रिजरेटरचा थंडावा अनुभवायला मिळाला. गावातल्या लोकांचा हा सामूहिक फ्रिज होता. इथे वर्षभराचे साठवून ठेवायचे अन्नपदार्थ, धान्य, गरम कपडे असं बरंच काही ठेवण्याची व्‍यवस्था केलेली होती. इथे थंडी, वारा, उन्ह पाऊस यापासून संरक्षण होतं. इथे दिवसा सूर्यप्रकाश कमी पोहोचतो आणि दगडाची उष्णता शोषण्याची क्षमता कमी असल्याने आतलं तापमान थंड राहतं. इथे ॲप्रिकॉट, लोणी, दही, मांस असे पदार्थ अनेक आठवडे चांगले राहतात. रात्री श्योक नदीच्या थंड वाऱ्यामुळे रेफ्रिजरेटरच्या खोलीचा दगड जास्तच थंड राहतो. या दगडी फ्रीजचा वापर बाल्टी लोक शेकडो वर्षांपासून वापरत आहेत. नोव्‍हेंबर ते मार्च या महिन्यांत तुर्तूक गाव पूर्णपणे बर्फाखाली दडलेलं असतं, त्या काळात तर अन्नसाठा टिकवणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी हा फ्रीज खूप उपयोगी पडतो. विशेष म्हणजे आजही हे दगडी फ्रीज वापरले जातात. तुर्तूकचा दगडी फ्रीज हा मानवाने निसर्गाशी जुळवून घेऊन तयार केलेल्या एका अनोख्या आणि टिकाऊ तंत्रज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे.
आता आम्ही श्योक नदीचा खळखळता प्रवाह आणि पूल ओलांडून चालायला लागलो. बघता बघता आम्ही एका राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वाराच्या वर गरूडाची प्रतिकृती स्वागत करत होती. राजाचा तरूण मुलगा माहिती देत होता. लाकडी कोरीव काम केलेला हा राजवाडा आगळावेगळा होता. आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना. एका दालनात चक्‍क सिंहासनावर राजा बसलेला होता. त्याचं नाव याब्गो मोहम्मद खान काचो. त्याने आम्हाला याब्गो घराण्याची माहिती दिली. अर्थातच या माहितीची वंशवेल एका भिंतीवर लिखित स्वरूपात होतीच. याब्गो घराण्याने बाल्टिस्तानवर राज्य केलं. त्यांचा इतिहास 9 व्‍या शतकापासून सुरू होतो. त्यामुळेच त्यांचा राजवाडा तुर्तूक गावात आपल्या वैभवाची साक्ष देत उभा होता. या राजांच्या काळात बाल्टिस्तानची संस्कृती, व्‍यापार आणि कला विकसित झाली. 14 व्‍या शतकात बाल्टिस्तानमध्ये इस्लामचा प्रवेश झाला. खरं तर सुरुवातीला सुफी संतांच्या माध्यमातून शिया इस्लामचा प्रसार झाला, त्यामुळे आजही इथल्या लोकांचा प्रमुख धर्म तोच आहे. त्यानंतर 19 व्‍या शतकात जम्मूचा डोगरा राजा गुलाबसिंग याने बाल्टिस्तानवर आक्रमण केलं आणि तिथे डोगरा राजवट इथे आली. बाल्टिस्तान मग जम्मू-काश्मीर संस्थानाचा एक भाग बनला. डोगराच्या राजवटीतच बाल्टिस्तान, लडाख आणि गिलगिट हे भाग जम्मू-काश्मीरमध्ये एकत्र आले. राजा जेव्‍हा आम्हाला हा इतिहास सांगत होता, तेव्‍हा त्या वेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचं नेतृत्व, स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती सारं काही डोळ्यासमोरून गेलं. आपल्या तत्कालीन पंतप्रधानांमुळे आज तुर्तूक आणि आसपासची गावं भारताचा भाग आहेत. तुर्तूक बघताना नुब्रा खोऱ्यातलं हे किती सुंदर गाव आहे याची कल्पना आली. इथली बाल्टी भाषा, त्यांची परंपरा, त्यांचं संगीत आणि खाद्यसंस्कृती खूप वेगळी आहे. आज तुर्तूकचे लोक मुस्लिम धर्माचं पालन करतात. मात्र ते बाल्टी भाषा बोलतात. ते मांसाहार करत नाहीत. प्रत्येक घराभोवती त्यांनी फुलझाडं, भाज्या लावल्या आहेत. निसर्गाचं संवर्धन करणं ते आपलं कर्तव्‍य समजतात.
तुर्तूक गाव 2010 पर्यंत लष्करी क्षेत्रात असल्याने सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद होतं. पण त्यानंतर ते पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. शांतता आणि वेगळा अनुभव घेण्यासाठी तुर्तूक गाव बघायलाच हवं. खळाळत वाहणारी श्योक, तिच्या बाजूने उंचच उंच हिमालयाचे पर्वत, आसपास हिरवीगार शेतं आणि ॲप्रिकॉटची जिकडे तिकडे फळांनी लगडलेली झाडं बघून मन तिथेच गुंतून जातं. बाल्टी पुलाव, थुपका आणि वेगवेगळ्या प्रकारचा ब्रेड इथलं प्रसिद्ध अन्न आहे.
याब्गो मोहम्मद खान काचो या राजाला भेटून आम्हाला एकदम खास वाटलं. राजाबरोबर फोटो काढून आम्ही तिथून निघालो. राजाचा तरूण मुलगा यानेकी राजपुत्र तिथेच खाली भेटला. त्याने आम्हाला राजवाड्याची खूप चांगली माहिती दिली. दोन मजली असलेला हा राजवाडा माती आणि लाकूड यांचा वापर करून बाल्टी शैलीत बांधलेला आहे. आता राजवाड्याचा काही भाग म्युझियम म्हणून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे आणि इथे याब्गो घराण्याचे जुने पोशाख, भांडी, शस्त्रं अशा काही वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. काही लोकांच्या मते राजवाड्याच्या खाली एक बोगदा असून तो थेट पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात पोहोचतो. हा बोगदा युद्धकाळात राजघराण्यातल्या लोकांना सुरक्षितपणे पलायन करण्यासाठी आणि व्‍यापारासाठी वापरला जात असे. आज तो बंद आहे.
आताचा राजा याब्गो मोहम्मद खान काचो आणि त्यांचं कुटुंब याच राजवाड्यात राहत असून त्यांना आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान आहे. राजवाडा बघण्यासाठी किरकोळ शुल्क आकारण्यात येतं. पण त्याचा उपयोग राजवाड्याची दुरूस्ती आणि देखभाल करण्यासाठी होतो. याब्गो मोहम्मद खान काचो आता अधिकृत राजा नाहीत आणि त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकार नाहीत. परंतु स्थानिक लोक आजही त्यांचा राजा म्हणूनच आदर करतात आणि त्यांना 'राजा' मानतात. याब्गो मोहम्मद खान काचो आणि त्यांचा मुलगा पर्यटकांना भेटतात आणि त्यांना त्यांच्या राजघराण्याचा इतिहास, गावाचा इतिहास आणि बाल्टी संस्कृतीबद्दल माहिती देतात. त्यांच्याकडून थेट माहिती ऐकणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
राजवाड्यातून समाधानी होऊन आम्ही बाहेर पडलो आणि आधी जेवण केलं. थूपका खाल्ला. इथे अंड्याचे कुठलेली पदार्थ असोत, त्यांना ते शाकाहारात मोडतात. कारण आम्ही व्‍हेज ऑमलेट मागताच आमच्यासमोर गाजर, टोमॅटो, कांदा घातलेलं अंडा ऑमलेट समोर आलं, त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघताच त्याने व्‍हेज ऑमलेट म्हणत टोमॅटो, गाजर, कांदा, मिरची यांच्याकडे बोट दाखवलं.
जेवण करून आम्ही मार्गस्थ झालो. रस्त्यात चहूबाजूंनी हिमालय सोबत करत होताच. ठिकठिकाणी धबधबेही लागत होते. एका ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याचा मोह होवून आम्ही गाडी थांबवली. या धबधब्याच्या साक्षीने आम्ही सगळेच सैराट झालो आणि मनसोक्त धबधब्याचे तुषार अंगावर झेलत नाचलो. आता आम्ही ऑक्सिजनची कमी वगैरे कशाचीही तमा बाळगली नाही. 
आमचा प्रवास नुब्रा व्‍हॅलीतून सुरू होता. श्योक आणि नुब्रा या नद्यांच्या संगमातून नुब्राचं खोरं तयार झालं असून खारदुंगला या जगातल्या सर्वात उंच खिंडीतून इथे पोहोचता येतं. हा प्राचीन सिल्क रूटचा एक महत्वाचा भाग मानला जातो. इथून मध्य आशिया आणि तिबेटमधले व्‍यापारी या मार्गावरून प्रवास करत असत. नुब्रा व्‍हॅलीत सगळ्यात जुनी मॉनेस्टरी आहे. टेकडीवरच्या या मॉनेस्टरीला डिस्किट मॉनेस्टरी म्हणून ओळखलं जातं. आम्ही या मॉनेस्टरीला भेट देऊन आनंद लुटला.
गाडीतून नुब्राच्या खोऱ्यातून प्रवास करत असतानाच दूरवर पांढऱ्या रंगाचं वाळवंट दिसायला लागलं. याला कोल्ड डेझर्ट म्हणतात असं कळलं. इथले उंट दोन उंचवटे असलेले विचित्र तोंडाचे होते. हे उंट दुहेरी कुबड असलेले असून यांना बॅक्ट्रियन उंट म्हटलं जातं. हे उंट सिल्क रूटवर माल वाहून नेण्यासाठी वापरले जात असत. 500 रुपयांचं तिकीट काढून गमतीदार उंटावर बसले. हुंडर गावाजवळ नुब्रा नदीच्या खोऱ्यात या पांढऱ्याशुभ्र वाळूच्या टेकड्या आहेत. मी, संजय, डॉ. ढोक आणि भार्गव असे आम्ही चारही उंटावर बसून वाळवंटी सफरीवर निघालो. बाजूचा उंट माझ्या पायाला येऊन आपलं तोंड घासू लागला. मी घाबरून गेले. त्याला मी असं करू नकोस हे सांगण्यासाठी ‘नही नही’ करत ओरडले, पण त्याला हिंदी भाषा समजत नसल्यामुळे त्याने माझ्या पोटऱ्यांना आपलं तोंड घासणं तसंच सुरूच ठेवलं. मी हताश होऊन गप्प बसले. एक गोल चक्‍कर मारून आमचं फोटो सेशन करून आम्हाला उतरवण्यात आलं. त्यानंतर पांढऱ्या वाळूत ‘नायक नही खलनायक है तू’ हे गाणं गात आम्हा सगळ्यांचं नाचून झाल. हे सगळं करून डिस्किट गाव गाठलं. रस्त्याच्या कडेला असलेल्या सोनम हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. जेवण करून झोपेच्या स्वाधीन झालो.
सकाळी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून निघालो.
वाटेत चांगला पास लागला. इथे मात्र थंडीने शरीरावर आक्रमण केलं. बोचरे वारे अंगाला झोंबत होते. हिमालयाचे पर्वत आपली भव्‍यता दाखवत होते. अशा परिस्थितीत फट् असा आवाज आला आणि एका गाडीधारकाने आम्हाला आमच्या गाडीचं टायर फुटल्याचं सूचित केलं. सगळेजण गाडीतून पटापटा खाली उतरलो, बघतो तर काय टायर पूर्णपणे फुटून चपटं झालेलं. मग काय रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून फोटो काढले. इतका मोकळा, निसर्गरम्य रस्ता पुन्हा कधी आमच्या तावडीत सापडला असता?
लगेचच मनसोक्‍त फोटो काढून झाले आणि गाडी पेकाँग लेकच्या दिशेने धावू लागली. वळणावळणाचा रस्ता, अत्यंत कठीण, मात्र वाहनचालक श्वांस अतिशय सफाईने गाडी चालवत होता. 
अचानक समोर सोनेरी रंगाचे पर्वत दृष्टीला पडले, जमिनीकडे बघताच तिथेही सोनेरी पाणी दिसलं. हे काय आहे मी आश्चर्याने ओरडले, तेव्‍हा महेश गायकवाड यांनी आपण पेकाँग लेकला पोहोचत आहोत असं सांगितलं. 
पेगाँग त्सो हा लडाखमधला सर्वांगसुंदर असा तलाव असून हे नाव तिबेटी भाषेतून आलं आहे. हा तलाव जगातल्या सर्वात उंच (14270 फूट उंचीवर) खाऱ्या पाण्याच्या तलावापैकी एक आहे. पेगाँग लेकचं वैशिष्ट्य म्हणजे हा 134 किलोमीटर लांब असून याचा एक तृतीयांश भाग भारताच्या लडाख मध्ये आहे, तर शिल्लक दोन तृतीयांश भाग चीनमध्ये आहे. हा लेक भारत-चीन सीमेवर असून नोव्‍हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात ते पूर्णपणे गोठतं. अर्थात इथलं पाणी खारट असूनही बार हेडेड गीज, ब्राह्मीणी बदकं आणि विविध प्रकारचे सीगल्स असे स्थलांतरित पक्षी इथे मोठ्या प्रमाणात दिसतात. तापमान खूप थंड असल्यामुळे या लेकमध्ये मासे नाहीत.
समोर दिसणारं दृश्य अद्भुत होतं. अनाकलनीय होतं. कारण जरा पुढे गाडी होताच निळेशार पर्वत दिसायला लागले, खाली पाण्यात बघितलं, तर वरचे निळेशार पर्वतं जणूकाही त्या पाण्यात उतरले असावेत असा भास होत होता. शिवाय पाणी इतकं नीतळ की अचंबित व्‍हावं. गाडी थांबली. पेकाँग लेक - एक स्वर्गीय अनुभव देणारा लेक. आपण खरोखरंच पृथ्वीवर नसून कुठल्यातरी स्वप्नमय जगात आहोत असा भास आता व्‍हायला लागला. हिमालयाने दोस्तीचा हात पुढे करत सूर्याची सोनेरी, निळीशार किरणं आपल्या अंगाखांद्यावर खेळवत पेकाँग लेकमध्य सोडली असावीत असा भास होत होता. इंद्रधनुष्य बघताच मन खुशीत आलं. या लेकची आणखी एक गंमत म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवामान यानुसार हे पाणी कधी निळ्या रंगाचं दिसतं, तर कधी हिरव्‍या रंगाचं, तर कधी लालसर रंगाचंही दिसतं.
इथे शिस्तीत तंबू, टेन्ट रांगेत उभे होते. आपापल्या टेन्टमध्ये शिरताच, सगळ्या सुखसुविधा इथे उपलब्ध होत्याच. पेगाँग लेकच्या परिसरात प्रचंड गारठा होता. रात्र चढत जाईल तसतशी थंडी वाढत होती. ऑक्सिजनची मात्रा जवळजवळ १२-15 टक्केच होती. श्वास घेण्यास अपार कष्ट करावे लागत होते. रुमालात घातलेला कापूर नाकाजवळ सतत धरल्यामुळे श्वास घेताना थोडा त्रास कमी होत होता. कसंबसं जेवण करून थेट ब्लँकेट अंगावर घेतलं मात्र रात्रभर ऑक्सिजनच्या झटापटीमुळै तासातासाला झोप चाळवत होती. 
सकाळ झाली आणि पेकाँग लेकनेही आपलं रात्रीचं रूप बदललं. थंडी कमी झाली होती. कमी ऑक्सिजनमध्येही सहजपणे सामावनू जाण्याची ताकद त्याने दिली. आता आम्ही काही अंतरावर असलेल्या पेकाँग लेकचा किनारा गाठला. इथेच आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’चं चित्रीकरण झालेलं होतं. चित्रपटाच्या शेवटी असलेली दृश्य त्यांनी कशी चित्रीत केली असतील या कल्पनेने अंगाला कापरं सुटलं. एकतर ऑक्सिजनची कमी, त्यामुळै होणारा त्रास आणि अशा अवस्थेत अत्यंत सहजपणे चित्रीकरण पूर्ण करायचं? मला तर आमीर खानच नव्‍हे, तर अभिनेत्यांपासून सगळ्याच तंत्रज्ञ टीमचं कौतुक वाटलं, अभिमान वाटला. मग करीना कपूर बसलेल्या पिवळ्या स्कुटरवर, ड्रममध्ये आणि पार्श्वभागाच्या आकाराच्या खुर्च्यांवर बसून ऑल इज वेल म्हटलं. नीतळ निळशार पाणी, स्वच्छ वाळू, उंचच उंच हिमालयाची सोबत यामुळे एकटेपण, एकाकीपण असे शब्द शब्दकोषातून देखील काढून टाकावेत असं वाटायला लागलं.
पेकाँग लेकवर मनसोक्त वेळ घालवून आम्ही परत लेहच्या प्रवासास लागलो, तेवढ्यात चक्‍क उजव्‍या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा दिसला. त्यांच्या मागे हिमालय उभा. मराठा इन्फ्रट्री तुकडीने बर्फात लढताना बळ मिळावं म्हणून हा पुतळा उभारला आहे. आम्ही सर्वजण महाराजांची भेट घेण्यासाठी धावलो. महाराजांना मुजरा करून आम्ही निघालो. 
आमीर खानने फंडिंग केलेल्या रँचो स्कूललाही आम्ही भेट दिली. सर्वत्र स्वच्छता आणि विस्तीर्ण असं पटांगण. थ्री इडियट्समध्ये संदेश दिलेल्या पद्धतीनुसार तयार केलेलं वातावरण. शांतपणे जरा वेळ या वातावरणात घालवून आम्ही लेहच्या राजवाड्याच्या दिशेने कूच केलं.
प्रवास करताना मनात येत होतं, हा हिमालय किती वेगवेगळी रूपं दाखवतो आहे. आपल्या आयुष्याचं सारच जणू त्याच्यामध्ये दडलेलं आहे असं वाटावं असा. कुठे रस्त्यात रिमझिम पाण्याचे फवारे, तर कुठे वरतून अचानक दरड कोसळावी तसे कोसळणारे मोठमोठे दगड. कुठे अशा रूक्ष, कन्स्ट्रक्शन साईटसारख्या भासणाऱ्या वातावरणात हिरवळच हिरवळ आणि तिला जम्पिंग ग्रास म्हणतात हे कळल्यावर आमचं त्यावरून उड्या मारत फिरणं...कुठे खळखळता पाण्याचा प्रवाह आणि सर्वत्र पिवळीधम्मक रानफुलं, तर कुठे जांभळट राणी कलरच्या फुलांनी जमिनीवर आच्छादलेली चादर. बालकवींच्या कवितांना साथ देणारं सगळं वातावरण आणि त्यात आमचं बागडणं. या सगळ्यात लेह कधी आलं कळलंच नाही.
चिखलामातीच्या विटांनी उभारलेला 9 मजली राजवाडा बघून डोळेच दीपले. हा राजवाडा माती, लाकडू आणि दगड वापरून पारंपरिक लडाखी-तिबेटीयन शैलीत बांधलेला आहे. राजवाड्यामध्ये थंका चित्रकला आणि शिल्पं बघायला मिळतात. हा राजवाडा भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. इथे स्थानिक सण, बौद्ध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. खरं तर राजवाडा म्हटलं, की संगमरवर, किंवा पांढराशुभ्र चुना वगैरे डोळ्यासमोर दृश्य येतं. इथे मात्र सारवलेल्या वास्तूंची आठवण यावी आणि आपलंच गावातलं घर वाटावं अशी वास्तू. पण तिची भव्‍यता मनाला ओढ लावणारी होती. खिडक्या-दारांची लाकडी कोरीव कामाची शैली तिचं वेगळेपण दाखवत होती. हा राजवाडा 17 व्‍या शतकात लडाखचा राजा सेंग्गे नामग्याल यानं बांधला. त्याला लॉयन किंग असंही म्हटलं जात असे. तो एक अत्यंत पराक्रमी योद्धा होता, पण त्याचबरोबर वास्तुशास्त्र आणि संस्कृती यांचाही चाहता होता. तिबेटमधल्या ल्हासा इथल्या पोटाला पॅलेसवरून प्रेरित होऊन हा 9 मजली राजवाडा त्याने बांधला असं म्हटलं जातं. हिमालयातल्या कडाक्याच्या थंडीतही या राजवाड्याने तोंड दिलं पाहिजे, लष्करी दृष्टीने तो सुरक्षित हवा आणि कुठूनही तो नजरेला पडावा अशी राजाची इच्छा होती. सगळ्यात वरच्या मजल्यावर राजाचं निवासस्थान असून खालच्या मजल्यांवर घोड्यांचे तबेले आणि गोदामं यांची व्‍यवस्था त्याने केली होती. या राजवाड्यातून संपूर्ण लेह शहराचं आणि झांस्कर पर्वतरांगांचं दर्शन घडतं. 19 व्‍या शतकात डोग्रा सैन्याच्या आक्रमणानंतर इथल्या राजाने इथून स्थलांतर केलं. लेहला आलेला पर्यटक राजवाडा बघितल्याशिवाय जात नाही हेही तितकंच खरं. जेव्‍हा लेह फेस्टिव्‍हल साजरं होतं, तेव्‍हा राजवाड्याच्या पाश्वर्भूमीवर नृत्य, संगीत आणि मिरवणुका असे जंगी कार्यक्रम होतात. हा राजवाडा लडाखच्या समृद्ध इतिहासाची आणि स्थापत्यशैलीची साक्ष देतो.
थकलेल्या अवस्थेत तक्षशिला नावाच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. परसबागेत विसावलेलं तक्षशिला अतिशय सुंदर होतं. आतली सजावट, फर्निचर, भांडी, सगळं काही प्रेमात पाडणारं. विशेषत: जेवायला बसायची व्‍यवस्था आणि तिथले टीपॉय. खोलीतून शेती, ॲप्रिकॉट-सफरचंदांची झाडं इकडे या असं खुणावत होती, तर हॉटेलच्या चहूबाजूंनी लावलेली सूर्यफूल, आणि इतर रंगिबेंरंगी फुलझाडं वास्तूच्या सौंदर्यात हातभार लावत होती. फ्रेश होऊन गरमागरम जेवणावर ताव मारला आणि मस्त झोप काढली.
सकाळ होताच प्रवास सुरू झाला. रस्त्यात एक मॅग्नेटिक हिल लागली. इथे चढ असला आणि गाडी बंद केली तरी ती पुढे सरकते असा एक समज आहे. हा एक ऑप्टिकल इल्यूजनचा प्रकार आहे. मात्र गंमत म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी आपली गाडी बंद करून अनुभव घेतो हे विशेष. तिथून पुढे जाताच आम्हाला गुरूद्वारा पत्थर साहिब हा एक गुरूद्वारा लागला. डोक्यावर ओढणी घेऊन माझी पावलं आत पडत राहिली. गुरूवाणी कानावर पडत होती. इथे एक मोठ्ठी शिळा होती. गुरूनानक यांच्याबद्दलची एक दंतकथा आहे. या ठिकाणी एक उन्मत्त राक्षस प्रजेला खूप त्रास देत होता. जेव्‍हा गुरूनानक यांनी त्याला जाब विचारला, तेव्‍हा त्याने त्यांना एक लाथ मारत ठार मारायचा प्रयत्न केला. पण गुरूनानकांना तर काहीच झालं नाही, पण त्याचा पाय ज्या शिळेवर पडला, ती शिळा त्या पायाचा ठसा उमटवून गेली. इथे सर्वत्र स्वच्छता आणि एक शांत वातावरण होतं. साजुक तुपातला चवदार शिरा, ब्रेडचे समोसे आणि चहा असा फक्कडसा बेत तिथे होता. प्रसाद रुपात त्याचा स्वाद चाखत आम्ही तिथून बाहेर पडलो. या वातावरणात कितीही अस्वस्थ असलेला मनुष्य आला, तर तोही गुरूनानकांचं हे स्थान पाहून शांत आणि स्वस्थ होईल.
जरा पुढे जाताच लडाखमधली सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री लागली. सतराव्‍या शतकात राजा सेंग्गे नामग्याल याने ही मॉनेस्ट्री बांधल्याचं समजलं. मानली जाते. इथे तर तीन वर्षांनी हेमिस महोत्सव होतो. मुखवटा घालून आणि रंगिबेरंगी पोशाख घालून पद्मसंभव यांना समर्पित नृत्याचं सादरीकरण केलं जातं. पद्मसंभव हे 8 व्‍या शतकातले बौद्ध गुरू असून त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माची पायाभरणी केली. हेमिस मठ त्यांनाच समर्पित आहे. असं म्हटलं जातं की पद्मसंभवांनी हेमिस मॉनेस्ट्रीच्या परिसरात ध्यानधारणा केली आणि तिबेटी संस्कृतीत परिवर्तन घडवलं. बौद्ध धर्माचा प्रसार करत पद्मसंभव अचानक तिबेटमधून अदृश्य झाल्याचं लोक मानतात. त्यांनी बौद्ध धर्मातल्या काही ध्यानपद्धती विकसित केल्या असून त्या काही निवडक अशा भिक्खूंनाच शिकवल्या जातात अशी समजूत आहे. पद्वसंभव यांची मूर्ती आणि तिथे ध्यानधारणा करत असलेले भिक्‍खू यांना तिथले लोक अलौकिक शक्‍तींचे रक्षणकर्ते मानतात. 
इथे बरेच स्त्री-पुरूष आणि मुलं आपल्या पारंपरिक वेषभुषेत या मॉनेस्ट्रीत जाताना दिसत होते. आम्हीही पायऱ्या चढून वर पोहोचलो. बघतो तर काय, भिंतींच्या कडेवर अनेकजण बसलेले, मधोमध अनेक स्त्रिया आपापल्या मुलांना घेऊन खाली बसल्या होत्या. उन् लागू नये यासाठी प्रत्येकीच्या हातात रंगीत छत्र्या होत्या. एका बाजूला बौद्ध भिख्खू बसलेले होते, तर त्यांच्या बाजूला वाद्यवृंद वाद्य वाजवत होता. मधोमध देवीदेवता आणि असूर यांचे मुखवटे धारण केलेली, तसा वेष परिधान केलेली पात्रं नृत्यातून कथा सादर करत होती. इतर नृत्यापेक्षा हा नृत्यप्रकार वेगळाच होता. फक्‍त वाद्यांच्या तालावर त्यांच्या हालचाली होत होत्या आणि कुठल्याही शब्दांशिवाय कथा पुढे सरकत होती. नर्तक बौद्ध तत्वज्ञानातल्या अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचं प्रतिकात्मक दर्शन आपल्या चाम नृत्यातून घडवतात. हा उत्सव वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टी कशा विजय मिळवतात ते सांगण्यासाठी केला जातो. 
तिथे काही वेळ घालवून आम्ही वरती जंगलाच्या दिशेने निघालो. तिथे काही स्वयंसेवक आलेल्या सर्व लोकांसाठी चूलीवर जेवण बनवत होती. डाळ, भात, भाजी असं गरमागरम जेवण आम्ही वनराईत बसून केलं. आलेल्या लोकांमध्ये अनेक परदेशी भाविक होते. सारं काही शांततेत कुठेही गोंधळ नाही की गडबड नाही. इतकी लहान मुलं असूनही कोलाहल नाही. काहीतरी विलक्षण भारलेलं वातावरण होतं. मनात उमटलेले तरंग देखील आता शांत झालेले होते.
लेहजवळच स्पितुक मॉनेस्ट्री, शेय मॉनेस्ट्री आणि पॅलेस, 11 व्‍या शतकात बांधलेली लिकीर, अलचि आणि लामायुरू मॉनेस्ट्री होत्या. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कुठल्याही मॉनेस्ट्रीज असोत, तिथे एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. तिथल्या मंत्रोच्चाराचा निनाद वातावरणावर आणि मनावर खोल प्रभाव पाडतो. त्या शांततेला सोबत घेऊन आम्ही निघालो. खरं तर संपूर्ण प्रवासात किशोरकुमारची, गाणी साथ देत होती. किशोरकुमार किती प्रदेशांमध्ये, किती लोकांच्या मनात, किती रस्त्यांवरून, पर्वतांमधून, नद्यांबरोबर गातोय असं वाटलं. त्याच्या आवाजाने सारा आसमंत व्‍यापलेला होता. 
रस्त्यातच श्वांस या ड्रायव्‍हरचे वडील भेटले. त्यांनी घरी चलण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर म्हणजे एक अतिशय सुंदर बंगला होता. तिथे होम स्टे उभारलेलं होतं. नेहमीप्रमाणे सर्वत्र ॲप्रिकॉटच्या झाडांनी आपलं अस्तित्व अबाधित राखलं होतं. ॲप्रिकॉटनी झाड असंख्य ॲप्रिकॉट्सनी डवरलेलं होतं. श्वांसच्या वडलांनी एका स्टूलवर चढून ॲप्रिकॉट तोडली. एक वाडगाभर ॲप्रिकॉट आम्हाला खायला दिली. सोबत भाजलेल्या गव्‍हाचा एक पदार्थही दिला. सगळ्यांनी चहा घेतला आणि आम्ही परत इथे राहायला नक्‍की येऊ असा वादा करत त्या सुंदर वास्तूमधून निघालो.
काही वेळ आम्ही आम्हाला सोबत करणाऱ्या नदीकाठी विसावलो. लेह-लडाखमध्ये सिंधू, झांस्कर, श्योक, नुब्रा अशा अनेक नद्या आहेत, ज्या इथल्या जीवनशैलीचा आणि भूगोलाचा अविभाज्य भाग आहेत. या नद्या मुख्यतः हिमनदी वितळल्यामुळे तयार होतात आणि लडाखच्या 'शीत वाळवंट' प्रदेशाला जीवन देतात. सिंधूला तर लडाखची जीवनवाहिनी मानलं जातं. 
झांस्कर नदी ही तिच्या वेगळ्या रंगासाठी आणि हिवाळ्यातल्या ‘चादर ट्रेक’साठी ओळखली जाते. हिवाळ्यात जेव्‍हा तापमान खूप खाली जातं, तेव्‍हा झांस्कर नदी पूर्णपणे गोठून जाते आणि या गोठलेल्या नदीवरून चालत जाण्याचा ट्रेक खूप साहसी आणि जगप्रसिद्ध आहे. डोडा आणि लुंगनाक या दोन नद्यांच्या संगमातून झांस्कर नदी उदयाला आली आहे. ती खोल आणि अरूंद घळईतून वाहते आणि निमू गावाजवळ सिंधू नदीला येऊन मिळते. हा पॉइंटही आम्ही बघितला. जिथे झांस्कर आणि सिंधू यांचा संगम होतो, तिथे या दोन्ही नद्यांचं पाणी, रंग चक्‍क वेगवेगळं दिसतं. श्योक नदी म्हणजे तिबेटी भाषेत हिला मृत्यूची नदी म्हटलं जातं. प्राचीन काळी श्योक नदीचा मार्ग खूप धोकादायक असल्याने तिला हे नाव मिळालं असावं. ही नदी काराकोरम पर्वतरांगेतल्या रिमो या हिमनदीतून उगम पावते. श्योक नदीने आम्हाला नुब्रा व्‍हॅलीतून जात असताना सोबत केली. नंतर ती पाकिस्तानच्या गिलगिट- बाल्टिस्थानमध्ये जाऊन सिंधू नदीला मिळते. श्योक नदीमुळे जागोजागी अनेक हिरवीगार शेतं आणि ओॲसिस बघायला मिळाली. तर नुब्रा ही श्योक नदीची एक प्रमुख उपनदी आहे. हिचा उगम सियाचीन हिमनदीतून होतो. ही नदी नुब्रा व्‍हॅलीतल्या हुंडर आणि डिस्किट गावांजवळ श्योक नदीला येऊन मिळते. नुब्रा नदीचं पाणी नुब्रा व्‍हॅलीतल्या शेतीसाठी आणि ॲप्रिकॉटच्या बागांसाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. खरं तर या नद्यांमुळे लडाखसारखा रूक्ष, कोरडा भाग सुंदर बनला आहे. या नद्या लडाखची समृद्ध संस्कृती, व्‍यापार आणि दैनंदिन जीवन यांचा आधारस्तंभ आहेत. 
आता इथून आम्हाला सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या ‘धा’ नावाच्या गावात जायचं होतं. कच्चा वळणावळणाचा घाटातला रस्ता पार करत आम्ही धा गावाच्या दिशेने जात होतो. धा गाव अशा ठिकाणी आहे, की हिमालयाच्या पर्वतांमध्ये ते सापडणार देखील नाही. महत्प्रयासाने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. धा गावाला आर्यन व्‍हिलेज म्हणून ओळखलं जातं. इथे मोजकी 45 घरं असून एकूण 300 लोकांचं हे गाव आहे. इथले लोक स्वत:ला आर्यन म्हणजे जगातले शेवटचे शुद्ध आर्य आहोत असं समजतात. हे लोक ब्रोक्पा समुदायाचे आहेत. ब्रोक्पा समुदाय म्हणजे हे लोक ॲलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज समजतात. जेव्‍हा ॲलेक्झांडर भारत सोडून गेला, तेव्‍हा त्याचं काही सैन्य याच भागात स्थायिक झालं आणि नंतर ते ब्रोक्पा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आपण जगातले सर्वात सुंदर स्त्री-पुरूष आहोत असं त्यांचं मत आहे. लडाखमधल्या आणि तिबेटी लोकांपेक्षा हे लोक वेगळे दिसतात. त्यांची उंची, त्यांचे निळसर डोळे आणि धारदार नाक कोणालाही आकर्षित करतं. 
आम्ही गावात प्रवेश करताच पारंपरिक वेषभूषेतल्या वृद्घ स्त्रिया रस्त्याच्या कडेला बसलेल्या दिसल्या. त्यांना आम्ही आमच्या होम स्टेचा पत्ता विचारला, तर त्या इतक्या अगम्य भाषेत उत्तर देत होत्या की काहीही कळलं नाही. मात्र तिथे असलेल्या एका बंगल्यातून एक देखणा तरूण मुलगा बाहेर आला आणि आमचं राहण्याचं ठिकाण तेच असल्याचं आम्हाला कळलं. या तरुणाचं नाव ताशी नामग्याल. इथल्या गावात सगळेच नामग्याल आहेत.
धा या गावात जागोजागी द्राक्षांनी लगडलेले वेल, ॲप्रिकॉट आणि ॲपलची झाडं, आणखी बरीच फळांची झाडं, ज्यांची नावंही मला ठाऊक नाहीत अशी बघितली. आम्ही जंगलमय भागातल्या सफरचंदाच्या झाडाची खूप सफरचंद तोडली. आम्ही तिथे अशा दगडांच्या शिळा बघितल्या की त्यावर दगड वाजवताच संगीताचे नाद निर्माण होत होते. ते दगड नसून लोखंड असावं असा भास होत होता. मात्र काही ठरावीक दगडच तसे होते. बाकी सर्वसामान्य दगड होते. तिथली पीएचसी, जुनी चारपाचशे वर्षांपूर्वीची मातीची घरं बघत आम्ही आमच्या होम स्टेच्या घरात पोहोचलो. घरातही जुनी मातीची, पितळीची भांडी अतिशय कलात्मकरीतीने रचलेली होती. घरात दोन मांजरी होत्या. त्याही खूप जीव लावणाऱ्या प्रेमळ होत्या. मी सोडून बाकी सगळे आणखी उंच अशा पर्वतावर चढून गेले आणि तिथून सगळ्यांनी धा गावाचा नजारा बघितला.
धा या गावातलं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्वयंपाक करणं ही घरातल्या एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही, तर घरातली सगळीच मंडळी स्वयंपाकात हातभार लावतात. प्रत्येक काम वाटून घेतात आणि सगळे मिळून ते काम पूर्ण करतात. स्त्री-पुरूष समता, समानता असे शब्द त्यांना ठाऊक नाहीत, पण त्याची अंमलबजावणी आपोआपच तिथे होते. जीवन एकदम शांत आहे. शहरातला कुठलाही गोंगाट, कुठल्याही शहरी सुविधा तिथे नाहीत. आणि त्याची त्यांना गरजही भासत नाही. घरातल्या स्त्रिया फारशा शिकलेल्या नाहीत, पण औपचारिक शिक्षणाविना त्यांचं काही अडलेलं दिसलं नाही. त्या खूप कष्टाळू आहेत. शेती करतात. रोजचं जगणंच खूप कष्टाचं आहे, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर त्या कष्टाचा लवलेश दिसत नाही. धा गावातल्या लोकांची भाषा ब्रोक्सकट असून तिला स्वत:ची लिपी नाही. त्यामुळे ती फक्‍त बोलली जाते. आपली अनुवंशिकता जपण्यासाठी हे लोक आपल्याच समाजात विवाह करतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक, स्त्रिया आणि पुरुष दोघंही विशिष्ट फुलांनी सजवलेली टोपी घालतात. आम्ही फिरत असताना झाडाला टपोऱ्या लाल मिरच्या दिसल्या. याच मिरच्या ते टोप्यांमध्ये वापरतात आणि गंमतीची गोष्ट म्हणजे त्या 20 वर्षं टिकतात. धा आणि आसपासची गावं यांना आर्यन व्‍हॅली म्हणूनच ओळखलं जातं.
सायंकाळी ताशी नामग्याल यांच्या घरातल्या सर्वांनी मिळून आमच्यासाठी थुपका केला. तिथे तयार झालेली अस्सल द्राक्षाची वाईन आम्हाला कपातून प्यायला दिली. घरातल्या वयोवृद्घ आजोबांनी आम्हाला कंपनी दिली. वाईनचा परिणाम असा झाला की आम्ही सगळेच खूपच आनंदित झालो. मग आम्ही मोठ्या आवाजात गाणी लावली, गायली, ताशी नामग्याल याने गिटार वाजवलं. आम्ही सगळे नाचलो. मला तर धा गावात आम्ही ज्यांच्याकडे उतरलो, त्यांची मुलं इतकी आवडली, की त्यांना आपल्यासोबत पुण्याला आणावं असं वाटलं.
वाईन आणि थुपका यांचा अंमल होताच आम्ही गाढ झोपलो. 
सकाळी तयार होऊन निघण्यापूर्वी धा गावातलं म्युझियम बघितलं. या गावचा इतिहास सांगणाऱ्या प्राचीन वस्तू इथे बघितल्या. जड अंत:करणाने धा या गावाचा निरोप घेतला. आणखी एक गंमत म्हणजे धा गावच्याबाहेर गावातली तीन-चार चार ते पाच वर्षं वयोगटातली इटुकली पिटुकली मुलंमुली हातात हात घालून दरीच्या कडेने मजेत चालली होती. त्यांना किंवा त्यांच्या पालकांना ती दरीत कोसळतील का किंवा त्यांना काही अपाय होईल का याचं कुठलंही भय नव्‍हतं.
इथून कारगिलच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कारगिलचं भौगोलिक स्थान लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. कारगिल पूर्वी तिबेटच्या लाडकी राज्याचा भाग होता. या प्रदेशावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता. 15 व्‍या शतकात कारगिलमध्ये इस्लामचा प्रवेश झाला. तसंच कारगिल आणि आसपासच्या प्रदेशावर बाल्टी राजघराण्याचं वर्चस्व होतं. त्यानंतर 19 व्‍या शतकात जम्मूचा डोगरा राजा गुलाबसिंग याने कारगिलला आपल्या राजवटीत सामील केलं. त्यामुळे कारगिल जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा एक भाग बनला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि भारत पाकिस्तान दोन देश निर्माण झाल्याने जम्मू काश्मीर संस्थानात अस्थिरता निर्माण झाली. 1947 मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं, या युद्धात कारगिलच्या काही भागावर पाकिस्तानने कब्जा केला, अर्थात भारतीय सैन्याने तो भूभाग परत मिळवला. 1965 आणि 1971 या युद्धांतही कारगिलने महत्वाची भूमिका बजावली. 1998-99 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करून कारगिलच्या काही भागावर कब्जा केला होता. त्यामुळे भारताने ऑपरेशन विजय द्वारा पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावलं. 26 जुलै 1999 या दिवशी भारताने या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला, पण त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. आजही हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारगिलमध्ये उभारलेलं शहीद सैनिकांचं स्मारक आणि इतिहास बघून आम्ही तिथून निघालो.
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साध्या हॉटेलमध्ये राजमाराईस खाल्ला. रस्त्याला रिव्‍हर राफ्टिंगची लगबग दिसत होती. आम्ही श्रीनगरच्या दिशेने निघालो होतो.
श्रीनगर नजरेच्या टप्प्यात येताच सफरचंदाने लगडलेली झाडं, चिनारने बहरलेले वृक्ष आणि सर्वत्र हिरवाई असं दृश्य दिसायला लागलं. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिथून फ्रेश होऊन चालतच म्हणजे पाय मोकळे करत श्रीनगरचं मार्केट मध्ये फेरफटका मारला. थकून परतल्यावर जेवणावर आडवा हात मारत झोप काढली.
श्रीनगरहून आम्हाला अमृतसरला जायचं होतं. त्यामुळे सकाळी तयार होऊन डललेकभोवती सैर केली. डललेकचा परिसर बघून मन, डोळे, तृप्त झाले. अचानकपणे मी दुसऱ्यांदा श्रीनगरमध्ये आले होते. श्रीनगरचं वैशिष्ट्य म्हणजे ते परकं वाटत नाही. आपलंच गाव असल्याचा आपुलकीचा, ओळखीचा फिल देतं. मागच्या वेळी आलेल्या ओळखीच्या खुणां तपासत पुढे जात राहिलो. मग बोटॅनिकल गार्डनला गेलो. तिथे निवांतपणे वेळ घालवला. आणि अचानक आठवलं, मागच्या वेळी आपण मूनलाईटचं वॉलनट फज खरेदी केलं होतं. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या फर्माइशनुसार ड्रायव्‍हरने गाडी मूनलाईट इथे वळवली. तिथून एअरपोर्ट, तपासण्या आणि अमृतसरचं एअरपोर्ट गाठलं.
अमृतसरला पोहोचताच टॅक्सी करून आधी अमृतसरची प्रसिद्ध ग्यान दा लस्सी चाखली. दिल खुश होऊन ‘बल्ले बल्ले’ म्हणायला लागलं. अमृतसरला आपण असं मनीध्यानी नसताना धडकू असं कधी वाटलंच नव्‍हतं. शीखांचे चौथे गुरू रामदास यांनी 1577 मध्ये स्थापन केलेलं हे शहर. गुरू रामदास यांनी शहराच्या मधोमध एक अमृत सरोवर नावाचा तलाव खोदला. या तलावासभोवती लोकवस्ती झाली. याच नावामुळे शहरालाही अमृतसर संबोधलं गेलं. 
अमृतसरचं वैशिष्टय म्हणजे हे पाकिस्तानच्या समीजवळ असून वाघा बॉर्डर अमृतसरपासून अवघ्या 30 किमीवर अंतरावर आहे. असं म्हणतात महर्षी वाल्मिकींनी रामायण हे महाकाव्‍य इथेच रचलं आणि इथेच लवकुश यांचा जन्म झाल्याचं मानलं जातं. इथे पाऊल टाकताच सुवर्णमंदिर डोळ्यासमोर आलं. गुरू रामदासांचे उत्तराधिकारी गुरू अर्जुनदेव यांनी 1588 मध्ये सुवर्णमदिराचं बांधकाम सुरू केलं. 1604 मध्ये गुरू गंथ साहिब पहिल्यांदा मंदिरात प्रतिष्ठापित झाला. जगातल्या समस्त शीख धर्मीयांचं पवित्र तीर्थस्थान. इथला मोफत सामूहिक भोजनाचा उपक्रम म्हणजे लंगर, हा जगातला सर्वात मोठा सामूहिक भोजन उपक्रम मानला जातो. रोज किमान एक लाख भाविक इथे जेवणाचा लाभ घेतात. तसंच लाखो लोक रोज सुवर्णमंदिराला भेट देतात.
आम्ही सुवर्णमंदिरात प्रवेश केला आणि मी बघतच राहिले. पांढरीशुभ्र चहूबाजूंनी असलेली राजवाड्यासम वास्तू आणि मधोमध असलेल्या तलावात सोन्याचं मंदिर. या मंदिराची वास्तुकला हिंदू-राजपूत आणि इंडो-इस्लामिक वास्तुकला यांचं मिश्रण आहे. या मंदिराची दारं चारही दिशांना उघडणारी आहेत आणि इथे सर्वधर्मियांना खुला प्रवेश आहे. मंदिराचा वरचा घुमट आणि इतर भाग सुमारे 750 किलो सोन्याने मढवलेले असून हे सोनं पंजाबचा सिंह महाराजा रणजितसिंह यांनी 19 व्‍या शतकात चढवलं. या मंदिराचं वैशिष्टय म्हणजे याची रचना जमिनीच्या पातळीखाली आहे, हे विनम्रतेचं प्रतीक मानलं जातं. 
त्यानंतर सुवर्णमंदिराच्या शेजारीच असलेल्या जालियनवाला बागेत शिरलो. 13 एप्रिल 1919 ही तारीख कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी जालियनवाला बाग इथे भीषण हत्याकांड घडलं होतं. जनरल डायरच्या गोळीबारात शेकडो निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडामुळे देशभरात ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड संताप आणि रोष निर्माण झाला. या घटनेचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर खूप मोठा परिणाम झाला. या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली 'सर' (नाइटहूड) ही पदवी परत केली. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या अनेक तरुणांवर या घटनेचा खूप प्रभाव पडला, ज्यामुळे ते सशस्त्र क्रांतीच्या दिशेने वळले. आज अमृतसरमधलं जालियनवाला बाग एक राष्ट्रीय स्मारक आहे, जेथे या घटनेत शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारले आहे. हे ठिकाण आजही आपल्याला त्या दिवसाची आठवण करून देतं.
जालियनवाला बागेतून बाहेर पडताना मन इतिहासातून बाहेर पडायला तयार होत नव्‍हतं.
मात्र घड्याळाचा काटा वेगाने पुढे धावत होता. रस्त्यातच एका ढाबासदृश हॉटेलमध्ये खास पंजाबी जेवण करून अमृतसर एअरपोर्टवर पोहोचलो. अमृतसरचं विमान पुण्याच्या दिशेने धावू लागलं.
मन पुण्याकडे परतायला तयार नव्‍हतं. सोबतची माणसं लवकर भेटणार नाहीत याची थोडी खंत होतीच. कारण प्रा. ढोक, डॉ. दोशी, प्रा. संजय लकडे, डॉ. महेश गायकवाड, भार्गव, ऋतुजा यांनी ही सफर सुरेल कशी होईल हेच बघितलं होतं. प्रत्येकाला काही ना काही प्रकृतीच्या समस्या होत्या, अनेक विवंचना होत्या. पण त्यांचा कुठलाही बाऊ न करता, आहे त्या परिस्थितीत आनंद घेणं यामुळे प्रवास खूप सुसह्य आणि आनंदाचा झाला. प्रवासात माणसं कळतात म्हणतात, तसं या सगळ्यांबरोबरचा हा पहिलाच प्रवास नव्‍हता, नाही. प्रत्येक प्रवास या सगळ्यांबरोबरचं नातं अधिक दृढ करतो आहे. 
खरं तर डोळे जरी मिटले तरी श्रीनगरचा डल लेक, अमृतसरचं सुवर्ण मंदिर आणि लडाख दिसत होतं. लडाख या भारताच्या केंद्रशासित प्रदेशाचं लेह हे एक महत्वाचं शहर. लडाखवर असलेला तिबेटी बौद्ध, इस्लाम धर्मीयांचा प्रभाव, मॉनेस्टरी, स्तूप, पॅगाँग लेक, नुब्रा व्‍हॅली, खारदुंगला, चांगला पास, कारगिल, रस्त्यावरून धावणारे साहसी बाइकर्स, लेहचा राजवाडा, तुर्तूकचा दगडी फ्रीज, धाची सुंदर देखणी माणसं, लडाखचा निसर्ग, धट्टीकट्टी तगडी गुबगुबीत कुत्री, खळाळत वाहणारी श्योक नदी, सिंधू नदी आणि इतर उपनद्या, त्यांचा खळखळता उत्साह, समोर येत होता. आजवरच्या प्रवासात इतका शांतपणा प्रथमच अनुभवायला आला होता. खरंच इथल्या हिमालयाचं वैशिष्ट्य काही औरच आहे. जीवनातले सगळे रंग त्याने इथे उधळले आहेत. त्यामुळे लेह-लडाखला जो जाणार नाही त्याचं जीवन व्‍यर्थ आहे.
डोळे उघडले, पुणे शहर आलं होतं. डोळ्यात आणि मनात मात्र लेह-लडाख घेऊन.आता आपापल्या घरट्यांकडे परतायचं होतं. आणि त्याच वेळी इतकी असीम उंची ल्यायलेला हिमालय, विनम्रतेचं, विनयाचं देणं देत हृदयाला शांतता प्रदान करत म्हणत होता ‘ओम मणि पद्मे हूम’
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
 

Tags

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.