सोबत

सोबत

ही नोकरी फिरतीची होती…आज पुणे, उद्या मुंबई, तर परवा सांगली. ती आपल्या कामात रमली होती. तिचे वरिष्‍ठ अधिकारी तिच्‍या कामाबाबत समाधानी होते. कधी कधी तर ती सॅटडरडे, सनडे आपला ऑफ असतो हेही ती विसरुन जाई. प्रवासात तिला आवडीची पुस्‍तकं वाचता येत असत.

आजही मुंबईहून पुण्‍याकडे येताना तिनं हायवेवरुन नेहमीच्‍या जागेवरुन शेअर टॅक्‍सी पकडली. 5-10 मिनिटात टॅक्‍सी भरली मागच्‍या बाजूला तिघेजण बसले आणि टॅक्‍सी सुरु झाली. धारावी, चेंबुर, वाशी, पनवेल करत टॅक्‍सी धावू लागली. पावसाळी हवा असल्‍यामुळे सगळं वातावरण कसं हिरवंगार झालेलं, भुरभुरता पाऊस आणि स्‍वच्‍छ आंघोळ केल्‍यासारखे रस्‍ते..तिनं बॅगेतनं नुकतंच विकत घेतलेलं पुस्तक  काढलं..तेवढ्यात मागनं आवाज आला,’ ओ भैया, टॅक्‍सी किसी मॉलपे खाने के लिए रोकना’ टॅक्‍सी चालकानं “हॉं” करत उत्तर दिलं. मागच्‍या  गप्‍पांचा जराही अडथळा न मानता तिनं आपलं वाचन सुरु केलं.
मॉलजवळ टॅक्‍सी थांबली. सगळीजणं उतरली.
“मॅडम तुम्‍ही जेवणार नाही?” बाजूनं प्रश्‍न आला.‍..

तिनं आवाजाच्‍या दिशेनं बघितलं..मागचे बसलेले तिघे तर केंव्‍हाच उतरुन मॉलमध्‍ये गेलेले. हा बहुदा टॅक्‍सीड्रायव्‍हर असावा. तिच्‍याएवढाच किंवा कदाचित थोडा लहानही असेल..वय 27-28.. रंगानं काळा-सावळा, चेह-यावर बिनधास्‍तपणा..

तिला त्‍याच्‍याकडे बघून मध्‍यंतरी पुण्‍यात घडलेली बलात्‍काराची घटना आठवली. “सारखा प्रवास करतेस, प्रवासात काळजी घेत जा, लोकांशी फार बोलत जाऊ नकोस, त्‍यांनी काही दिलं तर खाऊ नकोस,” अशा कितीतरी मिळालेल्‍या सूचना तिला आठवल्‍या. एकदा गाडी सुरु झाली की वारंवार मध्‍ये उतरणं तर तिनं सोडूनच दिलं होतं. आज निघताना खरंतर ती उपाशीपोटी निघाली होती…पुणे मुंबई..तीन-साडेतीन तासांचं अंतर.... पोहोचल्‍यावर बघू असा विचार तिनं केला होता..तिनं मानेनंच आपण उतरणार नसल्‍याचं टॅक्‍सी ड्रायव्‍हरला सांगितलं. त्‍यावर तो म्‍हणाला,’ मॅडम तुम्‍हा चहा आणू का?”
ती म्‍हणाली, “मी चहा पीत नाही मला काहीच नको, तुम्‍हीच लवकर चला मला पुण्‍याला मिटिंगसाठी वेळेत पोहोचायचं आहे”

तो गेला पण पाचच मिनिटात परतला त्‍याच्‍या हातात दोन कप होते. ‘मॅडम मी कॉफी आणलीय, घ्‍या ना..कँटिनवाला आपल्‍या ओळखीचा आहे..गाववाला..तो कधीच पैसे घेत नाही. वाटलं..आम्‍ही सगळे खाऊनपिऊन निघणार..तुम्‍ही मात्र तशाच उपाशी, मनाला बरं वाटेना बघा..मग पो-याला म्‍हटलं, चहा नको देऊस, दोन कप कॉफीच दे.. घ्‍या ना मॅडम..” तो म्‍हणाला.
त्‍यानं पुढे केलेला कॉफीचा कप तिनं काशीशा नाराजीनं हातात घेतल. त्‍याचा हा चोंबडेपणा तिला जराही आवडला नाही. 

टॅक्‍सी सुरु झाली. मागच्‍या बाजूनं गप्‍पा पुन्‍हा रंगल्‍या... टॅक्‍सी चालकाचा मोबाईल वाजत होता..त्‍यानं गाडी चालवत असतानाच तो घेतला. चिडूनच बोलत होता, ‘अरे, मी आत्ता मुंबईत आहे. हजार रुपये पाहिजेत?..तू गेलासच कशाला तिथे?, थांब मी आल्‍यावर बघतो तुला..”
मोबाईल बंद करत तो तिला म्‍हणाला, “तुम्‍ही म्‍हणाल, हेड फोन लावून बोलायचं, गाडी चालवताना कशाला रिस्‍क घ्‍यायची, आणि अक्सिडेंट झाला तर….बरोबर ना?, हो, आहेत माझ्याकडे एकदम ओरिजनल हेडफोन, पण गाडी चालवताना लक्षातच रहात नाही बघा.. “
तिनं त्‍याच्‍या गप्‍पात रस घ्‍यायचा नाही असं ठरवलं. कसलीही उत्‍सुकता न दाखवता ती समोर बघत राहिली…..त्‍याला तिच्‍या प्रतिक्रियेची फारशी आवश्‍यकता वाटत नसावी. तो म्‍हणाला, “तुम्‍हाला माहिती, आत्ता आलेला हा फोन कोणाचा होता?”

तिला ते कसं माहीत असणार होतं? आणि तिला ते ऐकून काय करायचं होतं? तिच्‍या पुस्‍तक वाचनात त्‍याचा येणारा व्‍यत्‍यय तिला आवडेना. त्‍याला कसं थांबवावं तेच तिला कळेना. तो बोलतच होता, “माझ्या लहान भावाचा फोन होता बघा आत्ताचा..काही कामधंदा करत नाही..आता बघा ना, मी झोपडपट्टीत राहिलो, वयाच्‍या आठव्‍या वर्षापासून लहान-मोठी कामं सुरु केली… करावीच लागली. आपण शिकलो नाही पण आपल्‍या लहान बहीण आणि भावाला शिकवू म्‍हटलं..बहीण जातेय कॉलेजला..पण हा जातच नाही... मी सांगवीला छोटासा फ्लॅट घेतलाय. आई-वडील, बहीण, भाऊ सगळे आम्‍ही फ्लॅटमध्‍ये रहातो, कष्‍टाचे दिवस संपलेत..पण हा त्‍या तिकडंच झोपडपट्टीत जातो, आता बघा, त्‍याच्‍या त्‍या उनाड मित्रांबरोबर काहीतरी पंगा घेतलाय..हजार रुपये पाहिजेत त्‍याला..पैसे काय असे झाडाला लागतात?" 
तिचा चेहरा त्रासिक झाला..तेवढ्यात मागनं आवाज आला, “भैया, जरा चाय के लिए टॅक्‍सी रोको यार…” त्यानं टॅक्‍सी काही वेळातच थांबवली....10 मिनिटात सगळीजणं चहा पिऊन आली पुनश्‍च टॅक्‍सी सुरु झाली.. मागचे तिघे आणि तो गप्‍पात रंगले. मागचे तिघे- देशविदेश फिरणारे, तीस-बत्‍तीशीचे युवक होते..उच्‍चशिक्षित..आणि हा असा बिनशिकलेला युवक..पण याला तशी ब-यापैकी माहिती होती..तो त्‍यांच्‍या प्रत्‍येक चर्चेत आपल्‍या टपोरी हिन्‍दीतून भाग घेऊन बोलत होता. दहा मिनिटांच्‍या चहाच्‍या ब्रेकमध्‍ये त्‍यानं त्‍यांच्‍याशी चांगली दोस्‍ती जमवली होती.
मागच्‍या एकाचा मोबाईल वाजला आणि त्‍यांच्‍या आपसातल्‍या गप्‍पांना खंड पडला..तेवढ्यात हा म्‍हणाला, “मॅडम तुम्‍ही काहीच बोलत नाही.. तुम्‍ही पार्ल्‍यात रहाता का…”
ती मानेनंच “हो” म्‍हणाली..”
तो पुढं म्‍हणाला, “किती चांगल्‍या एरियात रहाता तुम्‍ही..हिरव्‍यागार भाज्‍या, फळं, घरगुती पदार्थ, आणि गाडीवरचा तो रवा डोसा, पनीर डोसा किती मस्‍त मिळतो नाही?…आणि स्‍वस्‍त पण..”
ती तुटकपणे “हं” म्‍हणाली…तिला त्‍याचा खूपच राग येऊ लागला..चार ओळीही धडपणे तो वाचू देत नव्‍हता.

तो म्‍हणाला,”मला पण लहानपणी वाटायचं, आपलं चांगलं साफसुथरं लहानसं का होईना घर असावं…एका खोलीचं असलं तरी चालेल…मॅडम, झोपडपट्टीत फार वाईट दिवस काढले आम्‍ही …रोजची नळावरची भांडणं, मारामारी, शिवीगाळ, पावसात गळणारा, उन्‍हात तापणारा आणि थंडीनं गारठून टाकणारा झोपडीचा पत्रा..बाहेरची कावकाव, घरातही साली तीच कटकट, कायम पैशांवरनं होणारी हाणामारी..आता नीट आहे बघा सगळं.. …परवाच राखी झाली ना, बहीण म्‍हणाली, आख्‍खी मुंबई फिरतोस, मला कधीच काही आणत नाहीस…मग तिला लिंकिंग रोडवरनं एक झकास जिन्‍स आणि टॉप घेतला बघा. जाम खूष झाली ती..सगळ्यांना दाखवत सुटली…पण हा भाऊ रागावून बसला..त्‍याला काही आणलं नाही म्‍हणून..तुम्‍हाला सांगू..या घरच्‍यांसाठी कितीपण करा…यांची नाराजी आहे ती आहेच..आता बघा, मी रोज पाचला उठतो…सहाला निघावं लागतं मॅडम…एअरपोर्टची कस्‍टमरची वेळ चुकवून चालत नाही. कस्‍टमर वेट करण्‍याआधी जावं लागतं..सकाळी नाश्‍त्‍याचा प्रश्‍न येतच नाही..सहाला काय खाणार? … पण मग दिवसभर असाच बाहेर…मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई…खाउन घेतो कुठेही..काहीही..मॅडम, आपल्‍या ओळखी भारी आहेत हॉं..एकदम दोस्‍ती होऊन जाते बघा कोणाशीपण… ….मॅडम,  शाळेत शिकू शकलो नाही…काय पण डोक्‍यात घुसायचं नाही..ना इतिहास, ना गणित…पण व्‍यवहार शिकत गेलो अनुभवातून..लहानपणी गॅरेजात काम करु लागलो, काम करतच मोठा झालो…तिथंच गाडीही शिकलो..मग टॅक्‍सीचं काम करु लागलो…टॅक्‍सीत बसलेल्‍यांच्‍या गप्‍पा ऐकू लागलो..त्‍यांच्‍यातल्‍या गप्‍पांमधून कितीतरी गोष्‍टी नव्‍यानं शिकू लागलो…कधी करुन बघू लागलो…मॅडम, बहिणीला 17 हजाराचा छोटा लॅपटॉप घेऊन दिलाय मागच्‍या वर्षी…या भावासाठी पण खूप प्रयत्‍न करतो पण त्‍याचं वळण वेगळचं आहे बघा, सुधरायचं नाव घेत नाही….वडिलांची दारु सुटता सुटत नाही..आईची झोपडपट्टीतली भांडणाची सवय इथं फ्लॅटमध्‍ये येऊनही जात नाही…काहीतरी कुरापत काढून ती भांडतच रहाते…जराही शांती नाही. आता सांगा घर कशाला म्‍हणायचं, पैसे द्यायला फक्‍त?…माझा काय त्रास आहे या लोकांना सांगा ना?…दिवस उजाडण्‍याआधीच घराबाहेर जातो, रात्री 10-11 ला घरी झोपण्‍यापुरता येतो. घरही मीच चालवतो…..तरीही हे समाधानी नाहीत….पण जाऊ द्या …आहे ते बरंय म्‍हणायचं…
तुमचं काय मॅडम..तुम्‍ही मॅरिड आहात का…आणि मिस्‍टर पुण्‍यात की मुंबईत? ”
तिनं नकारार्थी मान हलवली. तो आश्‍चर्यानं म्‍हणाला “नाहीत? नाहीत म्‍हणजे काय…?”

तिला काय उत्तर द्यावं तेच कळेना.. “अजून लग्‍न झालं नाही” असं म्‍हणण्‍याऐवजी तिनं नकारार्थी मान हलवली होती…पण आता जास्‍त लांबलेली उत्तरं देण्‍यापेक्षा ती झटकन तुटकपणे म्‍हणाली, “वारले ते ….”
टॅक्‍सीला एकदम ब्रेक लागला…मागची माणसं जागेवरच आदळली. तो म्‍हणाला, “सॉरी मॅडम, उगीच असा प्रश्‍न विचारला तुम्‍हाला……पण वाईट वाटून घ्‍यायचं नाही बरं कधीच..आपल्‍या माणसाची सोबत फार महत्‍वाची असते आयुष्‍यात…पण एक सांगू? पावलोपावली कोणीतरी सोबत करीतच असतं बघा….आपण कुठे एकटे असतो?…
टॅक्‍सी थांबली. सगळीजणं उतरली…त्याचा मोबाईल नम्‍बर घेत त्‍या तिघांनी “परसो तुम्‍हारे साथही मुंबई रिटर्न जाना है” असं म्‍हणत त्‍याला बाय केलं. तिनं हातातलं पुस्‍तक बॅगेत सरकवत सामानाची बॅग खांद्याला लटकावली आणि रिक्षाला हात केला…..

निरोपासाठी नकळत तिनं त्‍याच्‍याकडे बघितलं, तो तिच्‍याकडेच बघत होता. तो म्‍हणाला, “मॅडम पूर्ण प्रवासात तुम्‍हाला खूप त्रास दिला… बोलून बोअर केलं…खूप रागही आला असेल माझा तुम्‍हाला…पण वाटलं…सोबत करु आहे तेवढा वेळ…फक्‍त तुम्‍हाला ती हवी का नको हेही विचारलं नाही मी …”
तिनं त्‍याला बाय केलं..तिच्‍या रिक्षानं वेग घेतला…एक अदृष्य सोबत घेऊन!

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.