प्रबोधन व्याख्यानमाला, श्रीगोंदा, अहमदनगर

प्रबोधन व्याख्यानमाला, श्रीगोंदा, अहमदनगर

तारीख
-
स्थळ
श्रीगोंदा, अहमदनगर

आज दौंडमार्गे श्रीगोंदा इथं व्याख्यानमालेसाठी मी आणि अभिजीत पुण्याहून निघालो असता, दौंडला फ्रॅक्चर पेशंट डॉ. अमित बिडवेला भेटलो. अमित, त्याची गोड बायको आणि त्या दोघांपेक्षाही जास्त त्यांचा गोड मुलगा, प्रेमळ आणि लाघवी आई-वडील या सगळ्यांना भेटून प्रवासाचा शीण क्षणात दूर झाला. त्यांचा जॅकीही त्या सगळ्यांइतकाच देखणा! रुग्णाची चौकशी करून पाहुणचार घेऊन आम्ही अर्ध्या तासात श्रीगोंदा इथं पोहोचलो. पोहोचेपर्यंत अनंताचे सारखे 'कुठपर्यंत पोहोचलात?' चे फोन सुरू होतेच......

गेस्ट हाऊसला कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच पोहोचलो. तिथे मुंबईवरून खास व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले डॉ. कृष्णा सपाटे भेटले. ‘मनात’ या पुस्तकाविषयी ते खूप भरभरून बोलले. आम्ही लिखाणाला कसा वेळ देतो, दोन लेखक असताना कामाचा समन्वय कसा साधतो असे अनेक प्रश्‍न त्यांना पडलेले होते.....त्यानंतर तिथे आलेले शेतीत वाहून घेतलेले रोडे यांची भेट झाली. रोडे यांना भेटून रॉबर्ट कॉख या शास्त्रज्ञाची आठवण आली. पोलिस अधिकारी झालेला आणखी एक तरुण भेटला. गप्पा मारून आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो. 

सभागृह पूर्ण भरलेलं.....इतक्या लहान गावात व्याख्यानमालेसाठी लोटलेली अलोट गर्दी बघून गावाचं, लोकांचं आणि आयोजकाचं कौतुक वाटलं. बाबा आमटे आणि गाडगेबाबा यांच्या प्रतिमा व्यासपीठाजवळ ठेवलेल्या होत्या. त्यांना पुष्पांजली वाहून आम्ही स्थानापन्न झालो. मी अभ्यासिकेसाठी नेलेली पुस्तकं ज्ञानेश्‍वर या तरुणाच्या हाती सुपूर्त केली. अभिजीतनेही 'स्लमडॉग सीए' वाचनालयाला भेट दिलं. अनंतच्या प्रास्ताविकानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

मी माझ्या प्रवासाविषयी आणि लेखनाविषयी उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला. आज मला खूप खूप छान वाटलं. याचं कारण इतक्या लहान गावातला श्रोतृवर्ग खूप सुजाण होता. पुरुषांइतक्याच मोठ्या संख्येनं स्त्रिया उपस्थित होत्या. संपूर्ण व्याख्यान होईपर्यंत सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.....ही माझी प्रशंसा मुळीच नाही, तर माझ्या व्याख्यानातून मायकेलअँजेलो, पिकासो, विश्वेश्वरैया, लॉरी बेकर, स्वामीनाथन, लुई पाश्चर, रिचर्ड फाईनमन त्यांच्यापर्यंत पोहोचले होते....त्यांच्या हृदयाची तार त्यांनी छेडली होती. माझ्या आवडत्या फाईनमन विषयी बोलताना मी नेहमीच भावूक होते, पण आज आख्ख सभागृह डोळे टिपत होतं....आज खरोखरंच आमच्या लिखाणाचं चीज झालं असं मला वाटलं. कारण कार्यक्रम संपल्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी भेटून त्यांना मिळालेल्या प्रेरणेविषयी सांगितलं. आसपासच्या गावातून आलेले तरुण काय आवडलं याविषयी भरभरून बोलत राहिले. स्त्रिया आणि मुलीं यांनी आवर्जून जवळ येऊन भेट घेतली. इतकंच नाही तर शालेय वयोगटातल्या मुलांनीही आपल्याला व्याख्यान आवडल्याची पावती दिली. 
अनंत झेंडे आयोजक म्हणून खुश झाला होता. पहिल्याच दिवशीचा इतका अप्रतिम प्रतिसाद त्याला खूप उत्साह देऊन गेला होता. आज खर्‍या अर्थानं मला समाधान मिळालं. कारण वाचनाची गोडी निर्माण करण्यात, वाचनाचा प्रसार करण्यात आपण किंचित का होईना वाटा उचलू शकतोय याचा आनंद झाला. 

तिथे भेटलेले प्रा. जनार्दन पाटील यांनी त्यांच्या कवितेचं पुस्तक भेट दिलं. त्यांनी अप्रतिम असं सूत्रसंचलन केलं....त्यांची भाषाशैली खूपच ओघवती होती. माझा परिचय करून देणार्‍या देखील लेखिका होत्या. त्यांनीही नेमक्या शब्दांत परिचय मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव कदम हे क्रीडा प्राध्यापक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून ते लक्षातही येत होतं. त्यांनी आपल्या दमदार आणि अतिशय सुरेख वक्तृर्त्वशैलीत अध्यक्षीय समारोप केला.

नेहमीप्रमाणे अनंत झेंडें इतकं मोठं काम करूनही व्यासपीठापासून दूर होता. इतक्या लहान वयात प्रसिद्धीपासून दूर राहणं, कामात यश मिळत असतानाही ना पेहरावात बदल ना स्वभावात बदल....मला अनंतचं खूप खूप कौतुक करावंसं वाटलं. त्यानं खूप प्रेमानं आणि अगत्यानं स्वागत तर केलंच, पण शुभांगीनं अतिशय सुग्रास असं जेवू घातलं. तिथेच संतोष, शिरीष, ज्ञानेश्‍वर, आमच्या व्याख्यानाचा फ्लेक्स टेम्पोला लावून दिवसभर प्रचार करणारे मि. एक्स या सगळ्यांच्या भेटीनं खूप खूप आनंद झाला. ज्ञानेश्‍वरने खूप प्रेमानं अभ्यासिका दाखवली.....तिचा लाभ घेत आज अनेक मुलं उच्च शिक्षणासाठी तयार होतायेत, तर अनेकजण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न करताहेत. 

अनंत, शुभांगी, मुकुल आणि सगळी टीम यांचा निरोप घेत आम्ही पावणेदोन वाजता (रात्रीच्या किंवा मध्यरात्रीच्या) पुण्यात खूप खूप समाधान घेऊन पोहोचलो. अनंत, व्याख्यानमालेच्या उर्वरित दोन दिवसांसाठी खूप खूप शुभेच्छा!

दीपा देशमुख

१७ डिसेंबर २०१७.

कार्यक्रमाचे फोटो