समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती

समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती

तारीख
-
स्थळ
फरांदे नगर, निंबूत, बारामती

समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती
समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती परभणी ‘वेध’हून ट्रेननं पुण्यात घरी सव्वा अकरा वाजता पोहोचले आणि काहीच वेळात सायंकाळी होणार्‍या व्याख्यानासाठी फरांदे नगरकडे निघाले. माझ्याबरोबर प्रवासात व्याख्यानमालेचं अध्यक्षपद भूषवणार्‍या भारती फरांदे होत्या. प्रवासात या व्याख्यानमालेची सविस्तर माहिती जाणून घेता आली.

फरांदे नगर हे चाळीस घरं किंवा कुटुंबं असलेलं छोटंसं गाव! २२ वर्षांपूर्वी फरांदे कुटुंबीयांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची आठवण तेवत ठेवण्यासाठी - गावासाठी, गावातल्या घडणार्‍या तरुणांसाठी, गावकर्‍यांसाठी चांगलं काही तरी केलं पाहिजे या भावनेतून ही व्याख्यानमाला सुरू केली. मुख्य म्हणजे तीन दिवसांची ही व्याख्यानमाला असून २२ वर्षांपासून एकदाही खंड न पडू देता अविरतपणे चालू आहे. हे तीन दिवस प्रत्येक वर्षी तेच ठरलेले असतात आणि यातला मधला दिवस हा स्त्री व्याख्यातीसाठी राखून ठेवलेला असतो.

व्याख्यानमालेशिवाय गावातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उभारणी केली आहे. व्याख्यानमालेचा परिसर खूप सुरेख तयार केला असून आजूबाजूला हिरवीगारं शेतं आणि मधोमध हनुमान, राम,सीता आणि लक्ष्मण यांचं मंदिर! मंदिरासमोर व्यासपीठ आणि मध्ये मोकळं पटांगण...जिथे श्रोत्यांसाठी आसनस्थ होण्याची केलेली सोय....एकूणच हे वातावरण इतकं शांत, निसर्गरम्य, आल्हाददायक आणि शांतता देणारं होतं की व्याख्यात्याला संवाद साधायला खूप अनुकूल व्हावं.....त्यात आश्‍चर्य म्हणजे चाळीस कुटुंबं असलेलं हे गाव, पण व्याख्यानाला मात्र गर्दी झालेली.....ही गर्दी कुठली या प्रश्‍नाचं उत्तर असं होतं की आजूबाजूच्या गावातूनही श्रोते आवर्जून येतात आणि ते आलेले होते. यात आठ वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांचे श्रोते सामील होते.

जनार्दनभाऊ फरांदे यांनी रुजवलेलं रोपटं आज चांगलंच वाढलं आहे. कारण तरुण पिढीनं या व्याख्यानमालेची जोपासना अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केली आहे किंवा करत आहेत. चालू जगाबरोबर चालणारे हे तरूण प्रत्येक प्रश्‍नाविषयी सजग असलेले मला जाणवले. त्यांची मतं स्पष्ट होती. विक्रम, रणजीत या तरुणांबरोबर बोलून मला खूप छान वाटलं. इथे कुठलीही फारशी औपचारिकता न करता सरळ व्याख्यानाला सुरुवात केली जाते हे विशेष! त्यातच अध्यक्ष आणि व्याख्याता या दोनच व्यक्ती व्यासपीठावर असतात....त्यातही अध्यक्ष आधीच बोलतात आणि प्रमुख वक्त्याचं व्याख्यान होताच कार्यक्रम संपतो. त्या व्याख्यानाचा परिणाम घेऊनच श्रोत्यांनी घरी जावं असा त्यामागचा हेतू!

२२ वर्षांपासून तयार झालेले उत्तम श्रोते आणि सुजाण अध्यक्ष भारती फरांदे यामुळे मला व्याख्यान देताना खूप आनंद मिळाला. तसंच आदल्या दिवशी विश्‍वास पाटील यांचं व्याख्यान रंगलं होतंच आणि माझ्यानंतर तिसर्‍या दिवशी सदानंद मोरे यांचं व्याख्यान असणार होतं. दोन दिग्गज मंडळींबरोबर मला व्याख्यानाची संधी मिळाल्याबद्दल मनापासून आनंद आणि समाधान वाटलं. या प्रवासात भारती फरांदे यांच्या शेतातल्या घराला भेट दिली. शेतातल्या ऊसाचा ताजा रस प्यायला मिळाला. अतिशय सुरेख टुमदार घर....लिखाण करतच राहावं असं वातावरण....त्यांच्या रुपानं एक बुद्धिमान, प्रेमळ छान मैत्रीण मिळाली. बारामतीहून खास योगिता आणि सीमा या मैत्रिणी बसने धडपडत आल्या होत्या. त्यांचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. माझ्या व्याख्यानानिमित्त एका शाळकरी छोटुश्या मैत्रिणीनं काढलेली पुस्तकाची रांगोळी देखील स्वागत करत होती.....! इतक्या छोट्याश्या गावात इतकं सुरेख आयोजन पाहून खूप छान वाटलं. माझ्या जवळ असलेले थिंक positive आणि पुरुष उवाच हे दिवाळी अंक मी ग्रंथालयासाठी भेट दिले. या व्याख्यानाच्या निमित्ताने भेटलेली माणसं, त्यांच्याबरोबरचा संवाद खूप खूप ऊर्जा देऊन जातो आणि वाटतं...........बहोत खुबसुरत है ये जिंदगी! 
दीपा देशमुख 
२८ नोव्हेंबर २०१७.

कार्यक्रमाचे फोटो