दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी - बालाजी सुतार

दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी - बालाजी सुतार

लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे सगळे कथांचे प्रकार वाचताना त्या त्या प्रकारांची वैशिष्ट्यं, त्यांच्यातलं सौदर्यं, त्यांच्यातली बलस्थानं,  तर लक्षात येतात आणि वाचक आपापल्या पिंडाप्रमाणे एका विशिष्ट प्रकाराकडे जास्त खेचला जातो. मला स्वत:ला कथा हा प्रकार आवडतो, याचं कारण तो नेमका आणि सुटसुटीत असून तो वाचकाच्या सगळ्या अपेक्षाही पूर्ण करतो, असं मला वाटतं.

ज्या वेळी रोहन प्रकाशनाकडून मला आवडलेल्या कथेबद्दल लिहिण्याचा प्रस्ताव आला, त्या वेळी यात काय विशेष आपण सहजपणे एखादी आपल्याला आवडलेली कथा घेऊन त्यावर लिहू असं मला वाटलं. पण त्याच वेळी, या २० वर्षांमध्ये प्रसिद्घ झालेल्या कथेवरच लिहायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग मी विचारात पडले. चटकन डोळ्यासमोर मनाला भिडलेली एकही कथा आठवेना. ज्या कथा आठवत होत्या, त्या सगळ्या अनुवादित होत्या. इथे तर अनुवादित कथा नको होती, अस्सल बाजाची कथा हवी होती आणि मग लख्ख वीज चमकून जावी, तशी एक कथा डोळ्यांसमोर आली आणि माझा शोध तिनं थांबवला. तुला हवं ते सगळं माझ्यात आहे असं तिनं समोर येऊन सांगितलं. खरंच होतं ते ..मला जे जे हवं ते या कथेत सापडलं. कथा आहे ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ आणि लेखक बालाजी सुतार.
बालाती सुतार हा नव्‍या दमाचा नव्‍या ताकदीचा आणि आसपासचं वास्तव वेगळ्या शैलीत मांडणारा तरूण लेखक आहे. राजन गवस यांनी म्हटल्याप्रमाणे, उद्या कथासाहित्याचा इतिहास लिहिताना बालाजी सुतार या लेखकाला वगळून पुढे जाताच येणार नाही. नुकताच बालाजी सुतार यांना बी. रघुनाथ पुरस्कारानं गौरवलं गेलं, त्या वेळी 'सरलेले शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरचा हा अस्वस्थ करणारा कालखंड आहे. या काळाला शब्दबद्ध करण्याचा लेखक म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतो,' असे उद्गगार त्यानं काढले होते. एक संवेदनशील लेखक आणि एक जिज्ञासू वाचक, विचारवंत, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, जागतिक सिनेमा, संगीत, साहित्य, नाटक, कविता या सगळ्याचं क्षेत्राचं बारकाईनं अवलोकन करणारा असा हा लेखक आहे.

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेची सुरुवात होते ती २००० सालातल्या एका दिवसापासून, तो दिवस असतो ८ डिसेंबर १९९२. खरं तर दोन दिवस आधीच म्हणजे ६ डिसेंबरला बाबरी मज्जिद पाडली गेली असते आणि त्यामुळे संपूर्ण देशभर दहशतीचं वातावरण तयार झालेलं असतं. देशभरात सगळीकडे संचारबंदी, हिंसा, दंगे, जाळपोळ, लुटालूट होत असताना बिलाल नावाचा एक गुंड दंग्यात मारला गेल्याचं वृत्त कथानायकाच्या कानावर येऊन पडतं. या बिलालनं नायकाला देखील तू मज्जिदीच्या कुंपणाबाहेर का मुतलास म्हणून दम देऊन कानशीलात लगावलेली असते. त्या वेळी संताप झाला असला, तरी प्रत्यक्षात नायक काहीही करू शकत नाही. त्यामुळे दंगा होणं, जातिधर्मावरून तेढ वाढणं हे पसंत  नसलेला नायक बिलालच्या मृत्यूनं मात्र सुखावतो. मात्र हे सुखही क्षणिकच टिकतं. कारण याच बिलालची वृद्घ आई, आजारी बायको आणि चिमुकली तीन मुलं रस्त्यावर आलीत हे कळताच त्याच्यातला माणूस हेलावतो. ही घटना लिहीत असतानाच नायक या काळात जातिधर्मातली तेढ कशी वाढली गेली तेही वास्तव नोंदवून जातो. तत्पूर्वी वेगवेगळ्या जातिधर्माची लोक गावांत असो की शहरात गुण्या गोविंदानं राहत होती, जातिच्या नावावरून एकमेकांना हाका मारत होती. पण त्या वेळी असं संबोधताना आपण चुकीचं काहीतरी करतोय याचं भानही त्यांना नव्‍हतं. पण नंतर ते बदलत गेलेलं चित्र आणि त्या बदलाचे उमटलेले पडसाद लेखक सुरुवातीलाच नोंदवतो. धर्माविषयी, जातिविषयी अनेक प्रश्न लेखकाच्या मनात निर्माण होतात आणि तेच प्रश्न कुठल्याही निर्मळ मनाच्या व्‍यक्‍तीला, स्वच्छ दृष्टीच्या व्‍यक्‍तीला पडलेले असतात. ‘पूर्वी द्वंद्वयुद्घाच्या गोष्टी लिहिल्या गेल्या जायच्या, आता द्वंद्वंयुगाच्या लिहाव्‍या लागतील’ असंही लेखक म्हणतो. ‘भिकारचोट धंदा आहे धर्म म्हणजे’ असं उद्विग्न होत यातला नायक आपलं मत मांडतो.

त्यानंतर २००८ उजाडतो आणि त्यातला एखादा दिवस, ज्या दिवशी कथेतला नायक भर उन्हात पाण्यासाठी वणवण करत असलेल्या मायलेकींना बघतो. शहरातल्या लोकांना मिळणारं मुबलक पाणी आणि आजही खेड्यापाड्यातली पाण्यावाचून होणारी दैना या नायकाला विचार करायला लावते. या स्त्रीची असहाय अवस्था बघणाऱ्याच्या लक्षात येत नाही, तर तिचं बाई असणं मात्र पटकन त्याच्या नजरेत भरतं ही गोष्ट कथानायकाला बोचते. याच दरम्यान नायकानं गावात जाऊन भाजप या पक्षाची शाखाही उघडलेली असते. (पुढे हाच नायक ‘ज्या शाखांना साध्या सरळ माणुसकीची फळं लागत नाहीत, त्या शाखा किंवा ती झाडं रोपून काय उपयोग? असा प्रश्नही विचारतो.) गावातले राजकारणातले पक्ष आणि त्यांची दादागिरी, जात आणि पक्षातलं आपलं स्थान यांचा घेतलेला फायदा, एकमेकांवरच्या कुरघोडी आणि चढलेला माज हेही त्या त्या प्रसंगातून अनुभवायला मिळतं. गावातलं जातीचं, निवडणुकीचं, आरक्षणाचं राजकारण, आणि तिथेही स्वार्थासाठी उपयोग करून कोणालातरी निवडून आणणं आणि आपलं इप्सित साध्य होईपर्यंत त्याचा ऱ्हास करणं...या सगळ्यांमध्ये पाण्याचा प्रश्न तसाच राहतो. मुबलक मिळणाऱ्या पाण्यापासून बिसलेरी वॉटरच्या बाटल्यांपर्यंत आपण कसे आलो हेही कळत जातं. 

त्यानंतर उगवतं ते २०१३ साल! गावातला शेतमळा, विहीर असलेला शेतकरी...त्याच्या बद्दलच्या नायकाच्या मनात कोरलेल्या आठवणी आणि एकाएकी त्यानं गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची बातमी नायकाला कळते. या आत्महत्येची मुळं शोधताना बदलत गेलेली परिस्थिती, पाण्याचं आटणं, सगळं काही खर्चून केलेले प्रयत्न, हाती आलेलं अपयश आणि मग मुलाबाळांचंही संगोपण, लग्न आपण करू शकणार नाही, सावकाराचं देणं फेडू शकत नाही, त्याच्याकडून पदोपदी होणाऱ्या अपमानाला सहन करू शकत नाही यामुळे गळ्यात फास घेऊन त्या शेतकऱ्यानं केलेली आत्महत्या नायकाला दिसते/कळते. या आत्महत्येमुळे सरकारकडून कुटुंबाच्या हातात पडणारे नेमके तुटपुंजे पैसे, त्याचा विनियोग कसा करायचा, थोडक्यात, फाटलेल्या आभाळाला ठिगळ कसं जोडायचं हा प्रश्न नायकाला पडतो. एका शिक्षकाला चारचाकी खरेदी करायची असेल तर काहीच मिनिटांत बँक कर्ज देते, पण शेतकऱ्याला मात्र वारंवार चकरा मारायला लावून शेवटी कर्ज देण्यास नकार देते ही परिस्थितीही नायक आपल्यासमोर आणून दाखवतो. 

शेवटाकडे येताना, २०१७ साल उजाडतं. उजाडतं की मावळतीच्या दिशेला जातंय हा  प्रश्न नायक करत नाही, पण वाचकांच्या मनात हा प्रश्न तो पेरून जातो. आरक्षणाच्या मुद्दयाकडेही कथेतला नायक लक्ष वेधतो. शिकणारे जास्त डोकं चालवतात, ते नको म्हणून अडाणी लोकांना राजकारणात जास्तीत जास्त वाव मिळत राहतो. पण त्यांचीही अधोगती ठरलेलीच. तसंच, ‘बाजलं बदलून पोर होत नसतं, तर नवरापण बदलावा लागतो’ या म्हणीनुसार पूर्वीचं वंशपरंपरेनं निवडून आलेलं सरकार नाकारून मोदी सम्राट सत्तेवर येतात. स्वर्गातून जणूकाही प्रेषित अवतरला असं समजून लोक भारावून त्याच्याकडे बघायला लागतात. याच काळात धार्मिक उन्माद देखील वाढतो. ‘आमच्या अटी आणि नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर जा पाकिस्तानात’ अशी भाषा देशभक्‍त करायला लागतात. अरे हो, या दरम्यान देशभक्‍तांचा जिकडे पहावे तिकडे सुळसुळाट होतो. अध्यात्मिक आणि उद्योगी बाबांचाही जन्म होतो. जिथे आपल्याच हातानं आपल्याच पोरी बाबाच्या स्वाधीन मोठ्या भक्तिभावानं केल्या जातात.
नवीन साल येतं, त्या वेळी,  ‘बाजलं बदलून पोर होत नसतं, तर नवरापण बदलावा लागतो यात बदल केला तरी नवरापण बदलून काही होत नाही’ हे वास्तव नायक दाखवतो. गोष्ट म्हटलं तर इथे संपते, पण तशी ती संपतच नाही. कारण हे विदारक वास्तव गोष्टीला संपू देत नाही. 

लेखकाची पाळंमुळं गावच्या मातीत रुजलेली असल्यामुळे ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेतून गावच्या भाषेचा स्वाद आपोआपच येतो. लेखकाचा नायक शिकण्यासाठी जरी शहरात आलेला असला, तरी त्याची मुळं गावात रुजलेली असल्यानं तिथली माणसं, तिथलं जनजीवन यांचं दर्शनही तो या कथेतून वाचकाला घडवतो. खरं तर माणसाची साधी स्वप्नं आता पूर्ण होण्याचे दिवस राहिले नसून त्याच्या आसपासची विदारक परिस्थिती, राजकारण, जात-धर्म यांच्यामुळे पोखरलेली मनं, बोकाळलेला स्वार्थ या सगळ्या तुकड्यांचं कोलाज म्हणजेच ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा आहे.
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा आवडण्याचं कारण म्हणजे लेखक बालाजी सुतार यानं या दोन शतकातल्या वास्तवाचा वेध खूप गांभींर्यानं घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्घतीनं कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे. कथेचं रूपडं प्राप्त झाल्यानं वाचक या वास्तवात गुंतला जातो, ते वास्तव जर सरळ सरळ दाखवलं असतं तर वाचकाला ते तितकंस भिडलं जाणार नाही याची जाणीव लेखकाला असल्यानं त्यानं कथेचा फॉर्म निवडला असावा. अस्वस्थ करणारं वास्तव अशा प्रकारात गोष्टीस्वरूपात वाचकाच्या समोर येतं आणि वाचक त्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. 

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’  ही कथा म्हणजे एक अस्वस्थ करणारं सत्य बरोबर घेऊन पुस्तकाच्या पानापानांवर असलेली ही कथा आपल्या अंत:करणात शिरते आणि तिथे आपलं स्थान शोधत राहते.

दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.