माझी व्यसनं......

माझी व्यसनं......

तारीख

लहानपणी मला माझी आई ‘नादिष्टये कार्टी’ असं म्हणायची. एखाद्या गोष्टीचा नाद लागला की लागलाच.....कितीतरी दिवस मग त्यातच बुडून जायला व्हायचं. तेव्हाही आणि आताही. अनेकदा हाच नाद मात्र व्यसनात बदलत जाताना मला दिसतो आणि अतिरेक झाला की माझी मीच व्यसनमुक्ती केंद्र बनून त्यातून बाहेर निघते. 

कष्टकरी जसे तंबाखू खातात, तसा मध्यंतरी मला कम्प्युटरवर काम करताना पान खाण्याचा नाद लागला होता. बाणेर भागातल्या झाडून सगळ्या पानपट्या ओळखीच्या झाल्या होत्या. रोजचे पंधरा रुपये फिक्स असायचे. पानात सुपारी नाही, खोबरं नाही, थोडा गुलकंद, चुना आणि काथ संपलं......पण छान वाटायचं. रोजचा हा प्रकार बघून अपूर्वला आपली आई बिघडली असं वाटायला लागलं. एके दिवशी पानाशिवाय आपलं पान हलत नाहीये ही गोष्ट लक्षात येताच मी ते त्याच क्षणी बंद करून टाकलं. 

नंतर कम्प्युटरवर काम करताना बडीशोप, ओवा, लवंग खाणं असाही नाद लागला. इतका की १०० रुपयांचा ओवा मी दोन दिवसांत फस्त करू लागले. तोही कच्चा! तो नसेल तर अस्वस्थ व्हायचं. मग एके दिवशी जाऊ द्या सोडू हे व्यसन म्हणत, मी ओवा खाणं बंद केलं. 

सध्या लागलेलं व्यसन किंवा नाद म्हणजे .........क्राईम पेट्रोल मालिका! अनेक दिवस मी माझ्या मित्राला तो क्राईम पेट्रोल एकामागून एक सतत बघतो म्हणून चिडवायची, रागही व्यक्त करायची. पण हेच व्यसन मलाही लागलं आणि मग आम्ही दोघं व्यसनी ‘पेगवर पेग मारावेत’ तसे या बघितलेल्या एपिसोड्सविषयी चर्चा करायला लागलो. 'खुनी कोण?' हे अचूकपणे ओळखून एकमेकांची पाठ थोपटायला लागलो .....अर्थात, आजपासून हाही नाद बंद करतेय. 

क्राईम पेट्रोलचे एपिसोड्स बघताना, चंगळवाद, स्वार्थ, क्रूरता, अमानुषता, विकृती असे अनेक पैलू बघायला मिळत होते. सत्य घटनेवर मालिका आधारित असल्यामुळे माणूस असा का वागतो यामुळे मन खंतावतही असायचं. मात्र आज मुलांच्या आत्महत्येवरचा एक एपिसोड बघितला आणि डोळ्यातल्या आसवांनी सांगितलं, दीपा आता बस्स!

भारतात रोज १८ वर्षांच्या आतल्या मुलांच्या १२ ते १४ आत्महत्त्या होतात. यातही ८ ते १२ वयोगटातली मुलें जास्त आहेत. अनुप सोनी हा माझा अत्यंत आवडता अभिनेता आणि निवेदक आहे. मुलांच्या मानसिकतेवर त्यानं गंभीर भाष्य केलं. मुलांना वाढवताना अपयश, नकार पचवायची ताकद आपण देत नाही आहोत. मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये संवादाचा अभाव आहे. वस्तू दिल्या की आपलं कर्तव्य संपलं ही आपली भावना आहे. 

नऊ वर्षांची तीन मुलं....त्यापैकी महानगरातली दिया नावाची मुलगी शाळेत आपल्या मैत्रिणीकडून झालेल्या अपमानामुळे इमारतीच्या गच्चीत जाऊन खाली उडी मारून आत्महत्या करते. दुसर्‍या एका शहरातला तिच्याच वयाचा सुखवस्तू घरातला अनमोल नावाचा मुलगा आईने गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून नदीत उडी मारून आत्महत्या करतो. आणि तिसरा बिहारमधल्या एका गावातला संजय नावाचा मुलगा गरिबीमुळे रेल्वेच्या पटरीवर समोरून वेगानं येणार्‍या रेल्वेच्या खाली चिरडून जाण्यासाठी डोळ्यातले ओघळणारे अश्रू पुसत उभा राहतो. 

हा तिसरा मुलगा संजय - याचे वडील सायकल रिक्षा चालवणारे....घरात बायको आणि चौदा-पंधरा वर्षांची मुलगी....संजयला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलेलं....घरात कायम मोजून खाणं करायला हवं, साबण इतक्या लवकर संपलाच कसा अशाच विषयांवरचं बोलणं संजय ऐकत असतो. शाळेतली मुलं बर्फाचा गोळा खाताना बघून त्याचं मन त्या छोट्या छोट्या इच्छाही मारायला शिकतं. घर असो की शाळा सतत उपेक्षेचं जगणं वाट्याला.....वडलांजवळ काहीही मागायची सोयच नाही कारण वडील परिस्थितीनं गांजून गेलेले.....संजय मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जवळच्या हॉटेलमध्ये चहा दे, टेबल साफ कर अशी कामं करतो आणि शाळा सुटायच्या वेळी पुन्हा शाळेजवळ वडलांची वाट बघत उभा राहत असतो. तिथेही कित्येक वेळा वाट्याला येणारे अपमान.....एकदा प्राणिसंग्रहालय बघण्यासाठी वर्गाची सहल जाणार असते. शिक्षक मुलांना पन्नास रुपये घेऊन यायला सांगतात. संजय हॉटेलच्या मालकाला पन्नास रुपये मागतो, पण पैसे तर मिळत नाहीतच, उलट उद्यापासून येऊ नकोस मी दुसरा मुलगा ठेवलाय असं मालक सांगतो. हताश होऊन संजय शाळेजवळ येऊन उभा राहतो. 

संजयचे वडील त्याला घ्यायला येतात आणि काही दिवसांपासून तो गप्प का आहे असं विचारतात. तेव्हा तो ‘आपण गरीब का आहोत’ असा प्रश्‍न विचारतो. ज्याचं उत्तर त्याच्या वडलांजवळही नसतं. निराश झालेला हा बाप ठरवतो आणि बायकोला आणि मुलीला बांघून घराला बाहेरून कुलूप लावतो आणि सांगतो, की आता ही परिस्थिती बदलू शकत नाही त्यामुळे आपण सगळेच मरूया. संजयला मी सगळ्यांबरोबर मारू शकणार नाही म्हणून तो शाळेतून संजयला रिक्षात घेतल्यावर तुला काय हवंय असं विचारतो. संजय सांगतो, मला काही नकोय. मला माहीत आहे, तुम्हाला किती कष्ट करावे लागतात. माझी सहल निघणार आहे, गुरुजींनी पन्नास रुपये आणायला सांगितलेत. पण त्यांना काय माहीत पैसे काय झाडाला लागतात का? अकाली प्रौढ भाव चेहर्‍यावर आलेल्या आपल्या चिमुकल्या मुलाचे बोल ऐकून संजयचा बाप आणखीनच खचतो. त्यानं संजयसाठी आग्रहानं कोल्ड ड्रींकची बाटली आणलेली असते. तिच्यात तो विषाची भुकटी मिसळतो आणि संजयला कोल्ड ड्रिंक पिण्याचा आग्रह करतो. संजय समंजसपणे म्हणतो, घरी गेल्यावर आपण सगळे मिळून थोडं थोडं पिऊया. मुलाचा निरागसपणा आणि समंजसपणा पाहून बापाचं हृदय द्रवतं. तो घर जवळ येताच, संजयला आत येऊ देत नाही. तिथेच थांबायला सांगतो. घराचं कुलूप उघडतो आणि आतून दार लावून आधी बायको आणि मुलीला बांधलेलं असतं ....त्यांची सुटका करतो. आणि मी चुकलो असं सांगतो. मी संजयला कोल्ड ड्रिंकमधून विष देणार होतो असंही बोलता बोलता बायकोला सांगतो. मात्र वडील आत काय करताहेत, दार का लावलंय हे न कळून संजय बंद दाराजवळ येऊन त्यांचं आतलं बोलणं ऐकतो. ते बोलणं सहन न होऊन तो तिरासारखा धावत सुटतो आणि रेल्वेच्या पटरीवर समोरून भरधाव वेगानं येणार्‍या रेल्वेला शरण जातो. 

दार उघडून संजयचे आई-वडील आणि बहीण बाहेर येतात तर संजय तिथे नसतो. असतं ते त्याचं दप्तर आणि कोल्ड ड्रिंकची बाटली.....आपलं बोलणं ऐकलं असावं या भीतीनं सगळेच कासावीस होतात आणि त्याला शोधायला वेड्यासारखे धावत सुटतात. हताश होऊन घरी परतात..... तेव्हा एका पोलिसानं संजयचा जीव वाचवलेला असतो आणि तो त्याला घरी घेऊन आलेला असतो. संजयला पाहताच त्याच्या आई-वडलांच्या जिवात जीव येतो. गरिबीनं खचून न जाता, आपण लढू. एक दिवस चांगला येईलच हा आशावाद संजयचा बाप त्याच्या बायकोकडून शिकतो आणि रडतच संजयला जवळ घेतो. 

या एपिसोडनं एका संजयचा वाचलेला जीव बघायला मिळाला. मात्र या घटनेनं मन खूपच अस्वस्थ झालं. वाढत चाललेली गरीब-श्रीमंत दरी.....धर्माच्या-जातीच्या आणि इतर गोष्टीचा आधार घेवून आपसात भांडणारे राजकारणी..... आपल्यातच मग्न असलेला एक ठरावीक वर्ग.....नैराश्याच्या खाईत चाललेली, परिस्थितीशी झगडून संपत चाललेली अनेक कुटुंब..... निरागसता, बालपण हरवत चाललेली कितीतरी मुलं....यांच्यासाठी या व्यवस्थेत उत्तर कुठे शोधायचं? एनजीओंच्या वरवरच्या मलमपट्टयांनी उपाय सापडणार आहे का? प्रश्‍न...........प्रश्‍न आणि प्रश्‍न!

दीपा देशमुख

१ डिसेंबर २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.