एकटेपणा - थिंक पॉझिटिव्ह-२०१८

एकटेपणा - थिंक पॉझिटिव्ह-२०१८

या वेळचा थिंक पॉझिटिव्हचा दिवाळी अंक 'एकटेपणा' या विषयावर आहे. जवळजवळ ६ महिने आधीपासून प्रभाकरच्या मनात हा विषय घोळत असावा. असंच एकदा बोलताना हा विषय काढून त्यानं विचारलं, मॅडम हा विषय दिवाळी अंकासाठी कसा राहील? म्हटलं, उत्तम! मग आम्ही या एकटेपणावर बोलत राहिलो. मी सकारात्मक विचारांना घेऊन चालणारी असल्यामुळे मला या एकटेपणातल्या सगळ्या चांगल्या बाजू डोळ्यांसमोर येत होत्या. गंमत म्हणजे त्याच दरम्यान सहजपणे माझ्याही मनात हा विषय आल्यामुळे या विषयावरचा माझा ‘एकटेपणातली मौज’ हा लेखही तयारच होता. प्रभाकरकडे माझा लेख गेला....कामाच्या गडबडीत मी नंतर विसरून गेले. 

थिंक पॉझिटिव्हचा दिवाळी अंक मिळाल्याबद्दल प्रभाकरनं विचारणा केली आणि प्रतिक्रिया अवश्य पाठवा, वाट बघतोय असं म्हटलं आणि अंक कम्प्यूटरच्या समोरच दिसेल असा ठेवला...जेणेकरून मला सतत आठवण राहिली पाहिजे. 

प्रभाकर गेली चार वर्षं थिंक पॉझिटिव्ह हा दिवाळी अंका काढतोय. या अंकाला दरवर्षी अनेक पुरस्कारही मिळताहेत. विक्री देखील चांगली होते आहे. मुळातच अंक खूपच देखणा आणि सकस मजकुराचा असल्यानं हातात घेतला की वाचलाच पाहिजे असं वाटायला लागतं. अंकाचं मुखपृष्ठ दरवर्षी कायम असतं. फक्त बॅकग्राउंडचा रंग बदलला जातो. सुखदुःखाच्या छटा चेहर्‍यावर उमटलेला एक मुखवटा या मुखपृष्ठावर विराजमान झालेला आहे. आपण जसं बघू तसा तो भासतो. 

या वेळच्या एकटेपणाच्या अंकाचे अतिथी संपादक यमाजी मालकर असं नाव वाचलं. मात्र त्याआधी प्रभाकरचं संपादकीय वाचलं. एक चित्रकार आतमध्ये चांगल्या लेखकाला घेऊन फिरतोय की, असं मन म्हणालं. खूप प्रामाणिक, मनातून आलेल्या भावना संपादकीय मध्ये आहेत. 

यमाजी मालकर हा माझा गेली अनेक वर्षं - म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून - आकाशवाणी औरंगाबादवर एकत्र काम करायचो - तेव्हापासूनचा मित्र! ‘एकटेपणाच्या मुळांचे उत्खनन’ या शीर्षकाचा त्याचा लेख वाचायला सुरुवात केली. शीर्षक वाचल्यावर मनाशी म्हटलं, याच्या व्यक्तिमत्वाला साजेसंच गंभीर शीर्षक आहे. पण लेखाची सुरुवातच इतकी झकास होती की.....म्हणजे उडणारा पक्ष्यांचा थवा...त्यात मागे राहिलेला एखादा पक्षी....आणि मग कधी कुणास ठाऊक पण त्या सगळ्यांचं त्याच्यासाठी थांबणं असेल किंवा त्यानं त्यांना गाठणं असेल....त्या सगळ्यांचं एकमेकांत मिसळलं जाणं....अख्खं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. लेख वाचत असताना माझ्या एका मनातून दोन मनं तयार झाली आणि दोन्हीही मनं एकाच वेळी बोलत लेखाबरोबर चालू लागली. एक मन उत्कंठेनं लेख वाचत होतं, तर दुसरं मन यमाजी अशाही प्रकारचं लेखन करतो असं आश्चर्यानं मला विचारत होतं. थोडा ललित अंगानं जाणारा, संवेदनशीलतेनं भावनेला स्पर्श करत जाणारा लेख वाचताना एक वेगळाच यमाजी मला सापडला. मला हा लेख खूपच आवडला. मी एकदम खुश झाले. खरंच माणूस कधी एकटा नसतो...मिसळण्याची प्रक्रिया एकदम भावली. आणि हे मिसळणं किती सोपंय, हे यमाजी या लेखातून सांगतोच. बस्स एक स्मित, एक हस्तांदोलन, एक नजर, एक स्पर्श बस्स! परस्परावलंबन! जुग जुग जियो देास्त असं काहीसं म्हणत मी पुढला लेख वाचायला सुरुवात केली. 

पुढल्या पानावर संतोष देशपांडे उभा होता. आम्ही पत्रकारांसाठी युनिकोडच्या कार्यशाळा घेत असू तेव्हाची आमची टीम आठवली. त्यात संतोष देशपांडे, प्रभाकर भोसले, यमाजी मालकर, दीपा देशमुख, शुभानन गांगल....त्या प्रवासात आम्ही इतके हसलेलो आहोत की आठवलं तरी आजही  गाडीतून फेकलेली गांगलांची ती तुटलेली चप्पल आठवते. बहुतेक वेळा संतोषचं लिखाण वाचता वाचता कोपरखळी मारणारं, मिश्कील असं असतं. संतोषच्याही लिखाणात 'एकटेपणा असतोच कुठे, सतत मन आपल्याशी संवाद करत आपल्याबरोबर असतंच की' असा विचार मांडणारा होता. त्याचा लेख वाचून मी समाधान पावले. कारण मला नकारात्मक विचार आणि त्या प्रकारे जगणारी माणसं फारशी आवडत नाहीत. ती कधी नैराश्याच्या खाईत स्वतः जातील आणि दुसर्‍यालाही खेचून घेतील सांगता येत नाही. 'थँक्स संतोष', मन म्हणालं आणि पुढे गेलं. 

या अंकात उत्स्फूर्तपणे लिहिले गेलेले लेख मला जास्त भावले. ठरवून लिहिलेले, माहितीपूर्ण लेख चांगले आहेतच. पण माझ्या मनाला ते फारसे भिडले नाहीत. 
शीतल भांगरे, सुनिल गोडसे, ऐश्वर्य पाटेकर, प्राजक्ता कुंभार, केशव देशमुख, ऋता बावडेकर, स्नेहा अवसरीकर, प्रदीप निफाडकर, निखील घाणेकर, निर्मिती कोलते, महावीर जोंधळे, अरूण खोरे यांच्या लेखांविषयी 'प्रतिक्रिया - भाग दुसरा' असं म्हणत स्वतंत्रपणे लिहाव्या लागणार आहेत. या सगळ्यांचे लेखही आवडले. खर तर सगळ्यांचीच नावं आवर्जून घ्यायला हवीत. राजू देसलेंच्या लेखात स्वतःवर प्रेम करणं आणि आयुष्य समरसतेनं जगणं हे सांगणं भावलं. या लेखाचं शीर्षक ‘एकांताची गर्द धुन मला ओढत नेते...’ लैच भारी वाटलं. 

राजीव तांबे हा माझा चांगला मित्र आहे. मात्र त्यानं त्याचा नेहमीचा गोष्टरूप साचा सोडून हा लेख लिहायला हवा होता असं मन म्हणालं. अर्थात स्वातंत्र्य ज्याचं त्याचं....तो त्याच्या एकटेपणाविषयी जास्त खोलात जाऊन बोलू शकला असता!

थिंक पॉझिटिव्ह या दिवाळीअंकाचे सहा भाग आहेत. पहिला एकटेपणाशी गूज, दुसरा मै और मेरी तनहाई, तिसरा क्षण एक मना बैसोनी एकांती, चौथा अकेली अकेली तनहाई, पाचवा उड जा हंस अकेला, सहावा पालवी....या भागांमुळे एकटेपणाचा सगळ्या छटा सगळ्याच लेखांमधून व्यक्त झालेल्या आहेत. यात अनेक मानसशास्त्रज्ञांनीही अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. रेणू दांडेकर, रेणू गावस्कर यासारखे कार्यकर्ते लेखकही आपले अनुभव घेऊन सामील झाले आहेत.  मधून मधून येणार्‍या कविताही (विशेषतः सुनील गोडसे) सुखावणार्‍या आहेत. तसंच मधूनच भेटणार्‍या दिग्गज शायरांच्या एकटेपणावरच्या ओळी आकर्षक चौकटींमधून लक्ष वेधून घेणार्‍या आहेत. लेखांना अनुरूप चित्रंही लेखाबद्दल बरंच काही बोलून जातात. चारही चित्रकारांचं अभिनंदन. अभिजीत सोनवणे, स्वप्नील धर्मे, ममता, पप्पू, आणि एकूण सगळीच थिंक पॉझिटिव्हची टीम यांनी दिवाळी अंकासाठी घेतलेले परिश्रम जाणवतात. 

अभिनंदन प्रभाकर! याही वेळी ‘थिंक पॉझिटिव्ह’ दिवाळी अंकाला अनेक पुरस्कार मिळतीलच. ‘थिंक पॉझिटिव्ह’ संग्रही ठेवावा असा अंक, जरूर वाचा.

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.